लेख मंजुषा

Happy Anniversary “हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?” ती लगेच म्ह...

Saturday, 15 September 2018

गौरींचे आगमन

आई आपण गौरी बसवायच्या का? अमृताने म्हणजे
सुनेने विचारले. तिच्या या प्रश्नाला काय आणि कसे उत्तर द्यावे हे समजत नव्हते. अग गौरींचे करणे काही सोप्प नाहीये. त्यांच्यासाठी सोवळ्यात स्वयंपाक, पुरण वरण,दिवे सोळा भाज्या  असं खूप काही करावं लागतं. "म्हणजे देव सुद्धा सर्व काही खात नाही? त्यांची सुद्धा फर्माईश असते? "माझा नास्तिक मुलगा मध्येच पचकला. त्याला गप्प करून मी माझा विषय पुढे नेत म्हणाले, शिवाय एकदा जर घरी बसल्या तर दरवर्षी बसवावे लागतात अर्धवट सोडता येत नाही.
मग काय झाले करू न आपण.दरवर्षी... सून काही माघार घ्यायला तयार नव्हती.  तुझ्या सासर्‍यांशी बोलू नवऱ्याची बोलू आणि मग ठरवू असे म्हणून ती वेळ मारून नेली.
नवऱ्याला तर तिने पटवून ठेवले होते आणि दुसरे करत असतील तर सासऱ्यांना सुरु करायला काहीच हरकत नव्हती. तरीही शेवटी तिला म्हंटले की आपण आपल्या नवीन घर झाल्या वर तिकडे सुरू करू. तिने कसेबसे हो म्हंटलं आणि एवढंसं तोंड करून बसली. पण मीही तिच्या त्या उतरलेल्या चेहऱ्याकडे दुर्लक्षच केले. कारण मला हेच माहिती होते की गौरींचे सर्व साग्रसंगीत करावे लागते. आणि आता ह्या गोष्टीत वेळ घालवावासा वाटत नव्हता.पण ती काही पिच्छा सोडायला तयार नव्हती. मग मला तिने सेव्ह करून ठेवलेले गौरींचे फोटो दाखवले. आणि म्हणते कशी हे बघा हे काढून ठेवले होते फोटो असच मला डेकोरेशन करायचं होतं. करायचे का? ती तिचा लाडिक हट्ट सोडत नव्हती.

या पोरीला कसे समजवावे हेच कळत नव्हते. शेवटी गौरींना शरण जायचे ठरवले. त्यांना विनंती केली एकंदर परिस्थिती बघता तुमचे आगमन आमच्या घरी होणार दिसते. पण मी देखील माझ्या शरीराची,मनाची प्रसन्नता उत्साह,आनंद टिकवून ठेवून जेवढे काय करता येईल तेवढेच करेन. स्वयंपाक सुद्धा जो शक्य होईल तो. मुख्य म्हणजे एखाद्या वर्षी नाही जमलं तर भयंकर काही घडेल यावर माझा विश्वास नाही. कारण तुम्ही देवस्वरूप आहात आणि आमची अडचण समजून घ्याल ह्यावर माझा पूर्ण  विश्वास आहे. देव कोणत्याही परिस्थितीत आपल्या भक्तांना शिक्षा करत  नाही अशी माझी श्रद्धा आहे. त्यामुळे हे गौरीनो, तुम्ही मुलाबाळांसह या वर्षी माझ्या घरी यावे आणि माझी साधी अशी सेवा स्विकार करावीअशी प्रार्थना गौरींना केली.
गौरीने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि अतिशय प्रसन्न चित्ताने मुलाबाळांसह त्यांचे आमच्या घरी आगमन झाले. सुनेचा आनंद आणि उत्साह ओसंडून वाहू लागला. घरातले वातावरण ही खूप आनंदी आणि प्रसन्न झाले. म्हणजे गौरींचे तर काहीच म्हणणे नव्हते. त्यांना फक्त प्रेमाने आणि भक्तिभावाने बोलावणे आवश्यक होते. बाकी जे काही द्याल ते स्वीकारायला त्या तयार होत्या. मला लक्षात आले की आपण उगीचच घाबरत होतो. लहानपणापासून मनावर हेच ठसले होते गौरींचं खूप करावं लागतं एकदा सुरू केल्या की बंद करता येत नाही नाहीतर त्यांचा कोप होतो वगैरे वगैरे वगैरे.... मनात अशी भीती असताना भक्ती भाव जागृत होणार कसा? पण भीती गेली आणि अतिशय प्रेमाने आणि भक्तीने गौरींचे स्वागत केले गेले. आणि असा भोळा भक्तीभाव ठेवल्यानेच घरात गौरी-गणपती असूनही मी मनातले विचार कागदावर उमटवू शकले आहे.
असेच प्रेम आणि हा भक्ती भाव कायम जागृत राहण्यासाठी सर्वांचे मानसिक शारीरिक आणि आर्थिक आरोग्य नीट राहो हीच गौरींच्या चरणी प्रार्थना.
-©मंजुषा देशपांडे, पुणे.