Happy Anniversary
“हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?”
ती लगेच म्हणाली, ” काहीही नको मला, सर्व काही आहे माझ्याकडे.” (पण तिचे स्वगत,” अनेक वर्षे झालीत लग्नाला. तरीही सांगावे लागते काय गिफ्ट हवे ते. मनकवडा नाही तर नाही पण जाणकवडा तरी व्हायला हवे ना एवढ्या वर्षांत!! )
” मला हेच पटत नाही तुझे. कधी काही म्हणून काही मागायला नको.” नवरा मनकवडा नव्हताच. त्यामुळे स्वगत कळण्याचा प्रश्नच नव्हता.
” तुम्ही तरी काय मागितले आजवर माझ्याकडे, तरी मला जमेल तसे काहीबाई गिफ्ट देतच होते मी!” तिने टोमणा मारला.
” तुला तर माहिती आहे, मला यातले काही कळत नाही. त्यामुळे मी नाही आणले काही. पण माझं सर्वकाही तुझेच तर आहे.” नवऱ्याचा ठेवणीतला डायलॉग.
” हो, ते तर माहितीच आहे. म्हणूनच नकोय मला काही.” तिचे उत्तर. (स्वगत,” मग द्या सर्व डेबिट कार्डस, क्रेडिट कार्डस माझ्याकडे.”)
” ए बायको, पण तू काय आणलेस आज माझ्यासाठी?”
” मलाही नाही जमले यावेळेस काही आणायला.” बायको उत्तरली . (पण स्वगत,” तुमचाच गुण घेतला. बघा आता कसे वाटते ते.”)
पण नवरा निर्विकार होता. काही नाही आणले म्हटले तरी फार काही फरक पडला नाही. पण शेवटी तिचे प्रेम उतू आले आणि तिने छोटेसे गिफ्ट दिलेच.
नवरा आवरून ऑफिसला गेला. झाली नेहमीप्रमाणे ऍनिव्हर्सरी साजरी असे तिला वाटले.
पण तेवढ्यात लेक आली आणि तिने विचारले,” आज ऍनिव्हर्सरी आहे ना तुमची? मग काय प्लॅन आहे’
“आता काय प्लॅन असणार! ते ऑफिस मध्ये आणि मी घरात”
” काय ग किती अनरोमॅंटिक आहात तुम्ही. काहीच कसे आवडत नाही ग तुम्हाला!!”
आई मनाशीच,” आवडायला काय खूप गोष्टी असतात. पण जबाबदाऱ्यांमुळे प्राधान्यक्रम बदलावे लागतात.”
आई उत्तर देते,” अग, आता खरंच नको वाटते.”
“किती वर्षे झालीत ग तुमच्या लग्नाला?”
“खरं तर मोजतच नाही. पण बरीच वर्षे झालीत.”
” आई, आज इतकी वर्षे तुम्ही एकत्र आहात, कसे काय काढलीत इतकी वर्षे? बोअर नाही झालात? मी तर कल्पनाच नाही करू शकत की एव्हढी वर्षे कसे कोणी एकमेकांबरोबर राहू शकते?”
“अग, तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? कुठे चालली तुमची विचारसरणी.. आज आम्ही एकत्र आहोत म्हणून तुम्हाला आई-बाबा लाभले आहेत. लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला का? ती एक जबाबदारी असते. तुम्ही कितीही मजा करा पण त्या बरोबर जबाबदारीही घेता आली पाहिजे”
“ते ठीक आहे ग.. मी अशीच गंमत केली. लगेच सुरू होऊ नकोस. बाबा किती वाजता येणार आहेत?”
“येतील रोजच्याच वेळेला. का ग, त्यांच्याशी काय काम आहे?”
“काही नाही, असच.”
संध्याकाळी बाबा ऑफिस मधून थकून भागून घरी येतात.
“हॅप्पी ऍनिव्हर्सरी बाबा! चला लवकर तयार व्हा. तुम्हा दोघांना आज रोमॅंटिक डेटवर जायचे आहे. आम्ही मुलांनी सर्व प्लॅन रेडी केला आहे. तुम्ही फक्त तयार व्हा. आईला पण आम्ही तयार व्हायला लावले आहे.”
“झाले, म्हणजे आता जावेच लागणार दिसते.” बाबा स्वतःशी बोलले.
मुलांना उत्साहाच्या भरात दमलेल्या बाबांचा चेहेरा दिसलाच नाही. बाबानीही वरवर उत्साह दाखवत तयारी केली.
“ए, झालीस का तयार, आवर लवकर, पटकन जाऊन येऊ. उद्या ऑफिस आहे माझे. लवकर उठावे लागेल.”
आईला खूप हसू आले. ती मनाशीच म्हणाली, “झाली आमची रोमॅंटिक डेटची सुरुवात.”
“हो, हो, तयार आहे हं मी, चला असे म्हणत ती बाहेर आली.
आता डेट तर ठीक आहे. पण रोमॅंटिक डेट म्हणजे नक्की काय ? असा गोंधळ दोघांच्याही मनात होता. पण कसे असते की रोमान्सची संकल्पनाही व्यक्तिनुसार , वयानुसार बदलत असते.
आईचे विचारचक्र सुरू झाले. तिला आधी रोमॅंटिक शब्दाची पण अलर्जी होती. म्हणजे सगळ्यांसामोर असे काही विषय मोकळेपणे बोलणे नको वाटायचे. पण आज मुलांनी प्लॅन करून घराबाहेर काढलेच होते तर ते सार्थकी लावावे असा विचार तिने केला. मग रोमॅंटिक वाटणे म्हणजे नक्की काय यावर तिचे वैचारिक मंथन झाले. तिला अचानक त्या दोघांमधील आताचे रोमांसचे समीकरण सुटले.
तिची कळी खुलली. अरे, किती सोपे आहे. आपल्याला उगाचच अवघडल्यासारखे होत होते असे वाटून ती नवऱ्याला म्हणाली,” मुलांच्या प्लॅन मध्ये काय काय आहे?”
” कोणत्या तरी सिनेमाची तिकिटे आहेत आणि काय त्या बार्बेक्यू मध्ये जाऊन खायचे आहे.” जड झालेल्या आवाजात नवरोबा बोलले. त्याचे बरोबर होते म्हणा. कारण थकून आलेला जीव आणि परत बाहेर पडण्याची इच्छा नसताना केवळ बायको नाराज होईल म्हणून बाहेर पडलेला!!!
“तुम्हाला आवडणार आहे का सिनेमा?” बायकोला कीव आली.
” तसे काही नाही.. जाऊ आता .. मुलांनी एव्हढा प्लॅन केला आहे तर.”
” माझ्याकडे एक आयडिया आहे. मी सांगते तिथे कार घ्या फक्त.”
“आता तुला कुठे जायचे आहे अजून? मी काही शॉपिंगला येणार नाही बरं का! त्यापेक्षा सिनेमा परवडला. थिएटर मध्ये ताणून तरी देता येईल.. ” नवऱ्याने सिनेमाच्या बाबतीत असलेला उत्साह जाहीर केला.
पण बायको हुशार होती. लग्नाला एव्हढी वर्षे झाली होती . नवऱ्याची नसन् नस जाणून होती.
” शॉपिंग नाही ओ, गंमत आहे, चला.”
त्या उत्सव मूर्ती जोडीने मुलांना कॉल केला,” आम्ही काही त्या थिएटर आणि हॉटेलला जाणार नाही. त्याचे काय करायचे तुम्ही बघा. रात्री उशीरा घरी येऊ,”
” ओहो, अलग प्लॅन.. सरप्रायझिंग .. करो करो मजे करो”, म्हणत मुलांनी चिडवून घेतले.
बायको नवऱ्याला मस्त एका शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला घेऊन गेली . ते संगीत ऐकताना नवरोबाचा शीण, थकवा कुठल्या कुठे पळून गेला.
स्वर जसे कानांवर पडत होते तसे दोघेही रोमांचित होत होते. प्रत्येक आलाप ऐकताना अंगावर शहारे येत होते. आतून आनंदाच्या लहरी जाणवत होत्या. दोघांची ब्रह्मानंदी तंद्री लागली. एका वेगळ्या विश्वात दोघे रममाण झाले. इतके खुश झाले की परत एकमेकांच्या प्रेमात पडले.
आता बोला , यापेक्षा रोमॅंटिक असे काय असू शकते. त्यांनी अगदी समरस होऊन एखाद्या गोष्टीचा आनंद घेतला. ही त्यांच्यासाठी खरी रोमॅंटिक डेट होती.
कार्यक्रम संपेपर्यंत वेळ कुठे गेला कळलेच नाही. नवऱ्याचा सर्व थकवा निघून गेला होता. आता पोटाला भुकेची जाणीव झाली.
“जेवणाचे काय करू या आपण?” त्याने बायकोला विचारले.
” तो ही प्लॅन मी केला आहे, तुम्ही फक्त मी म्हणते तिकडे चला.” बायको जोरात तयारीत होती.
बायको घेऊन गेली त्या ढाब्यावर मस्तपैकी दोघांनी पिठल भाकरी ठेच्यावर ताव मारला. हे जेवण पण त्यांच्यासाठी चेरी ऑन द केक म्हणजे शुद्ध भाषेत दुधात साखर असे होते.
असा थकून आलेला गरीब बिचारा नवरा, तरी बायकोसाठी म्हणून परत डेट जाण्यासाठी बाहेर पडतो आणि थकलेल्या नवऱ्याला काय आवडेल याचा विचार करून बायको पटकन प्लॅन बदलते. हेच असते ते संसारात मुरणे. मुरलेल्या लोणच्याची चव जशी अवीट असते. तसेच मुरलेल्या संसारातील रोमान्स देखील अतूट असतो.
अशाप्रकारे दोघांची रोमॅंटिक डेट साजरी झाली आणि लग्नाच्या वाढदिवसाची कहाणी सुफळ संपन्न झाली.
आपण सगळे मिळून त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या आनंदात सहभागी होऊ यात.
@मंजुषा देशपांडे, पुणे.
तुमची कथा वाचली खूप आवडली मला तुमच्या कथेचे वाचन मी माझ्या यूट्यूब चैनल वर करू शकते का आता नावांनीच वाचन करणार आहे
ReplyDeleteकथा खूपच छान,भावनांना साद घालणारी आहे.
ReplyDelete