‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करावा की नाही याविषयी बरेच मतभेद आहेत. प्रेम हे अंतरात्म्यातून फुलणारी एक तरल भावना आहे. अशा प्रेमाला व्यक्त होण्यासाठी प्रदर्शनाची किंवा स्पेशल'डे'ची गरज काय ? शिवाय भारतीय संस्कृतीत इतके सणवार असताना अशा पाश्चात्य डे ची आवश्यकताच नाही असे विविध विचार प्रवाह आहेत.
परंतु प्रेमाला फुलण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी जो द्यावा लागतो तो वेळ असायला हवा ना….
आजच्या फास्टफूडच्या जमान्यात जीवन इतके ह गतिमान झाले आहे की, ' लाजून हसणे ते अन हसून ते पहाणे ' अशा गोष्टींसाठी वेळच नाही. त्यामुळे एकमेकांना ओळखायला, प्रेम व्यक्त करायला असे व्हॅलेंटाईन डे चे निमित्त शोधले जाते. या निमित्ताने का होईना पण यंत्रमय व रुक्ष होत चाललेल्या जीवनरुपी वृक्षावर प्रेमाची पालवी फुटत
पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणे किंवा त्यांना तीव्र विरोध करत संस्कृतीची चौकट बंदिस्त करणे या दोन्ही गोष्टी म्हणजे एकदम टोक गाठणे झाले.
अशावेळी अशा नवीन नवीन 'डे'ज ना आपण आपल्या संस्कृतीत सामावून घेऊन आपल्या संस्कारांचा रंग या पिढीच्या संकल्पनांना दिला तर…..
संस्कृतीच्या चौकटीची कक्षा रुंद केली तर….
चला तर मग नवीन पिढीच्या हट्टाखातर जुन्या पिढ्यांनी साजरा केलेला व्हॅलेंटाईन डे आपण पाहूया….
आज सकाळी अगदी लवकर उठून अनन्या आरशासमोर उभी राहून एकेका ड्रेसची ट्रायल घेत होती. तिची आई, सुनंदा दुरूनच लेकीची गंमत पाहत होती.
प्रत्येक ड्रेस अंगावर पांघरत तिचे स्वतःशी बडबडणे चालू होते, “ हा कसा वाटतो??? शी, हा नको.. हा त्याने पहिला आहे, हा.. बरा आहे पण थोडा ओल्ड फॅशन वाटतो. वेस्टर्न लूक कसा वाटेल??? की ट्रेडिशनलच ठीक आहे ....असे म्हणत अनन्याचे दिवाणावर कपड्यांचा ढीग करणे चालू होते.
लेकीचे आज काहीतरी सेलिब्रेशन किंवा पार्टी असणार याचा अंदाज आजवरच्या अनुभवावरून सुनंदाला आला होता. पण ही पोरगी आज कोणाला भेटणार आहे? आवडेल… आवडणार नाही… कोणाला??? नक्की सौरभच्या बाबतीत आहे की अजून कोणी??? या विचारांनी तिच्या पोटात गोळा आला.
" पोरीच्या मनाचा थांगपत्ता लागणं कठीण!!! थेट विचारावे तर नवीन पिढीच्या एटिकेटसप्रमाणे पर्सनल मॅटर्समध्ये इंटरफिअरन्स म्हणजे नाक खुपसल्यासारखे होते आणि बुरसटलेल्या विचारांचे लेबल लावले जाते. बरं, विचारले नाही तर स्वतःहून सांगणे तर कधीच माहिती नाही.” सुनंदाची स्वतःशी चिडचिड चालू होती.
नवीन पिढीशी जुळवून घेताना सुनंदाची खूपदा अशी अवस्था होत होती. जुन्या संस्कारांची, विचारांची मुळे मनावर खोलवर रुजली गेली असल्याने त्यांना थेट उपटून नवीन विचारांचे बीज पेरणे कठीण होत होते. तरीही सुनंदा आपल्या परीने जुन्या विचारांचे नवीन विचारांबरोबर कलम करत संसाराचे रोपटे फुलवत होती.
अनन्याचा ड्रेसचा पसारा वाढतच चाललेला पाहून सुनंदाचे पेशन्स संपले. तरीही स्वतःला सावरत शब्दांची जुळवणी करत तिने लेकीला विचारले," काय मॅडम, आज कुठे दौरा? काही विशेष आहे का? एवढा कपड्यांचा ढीग जमवला आहेस म्हणून विचारते ग... सौरभलाच भेटणार आहेस ना आज???"
" ऑफ कोर्स आई, आज व्हॅलेंटाईन डे आहे. त्यामुळे त्यालाच भेटणार!!! आज आम्ही परत एकमेकांना प्रपोज करणार आहोत; म्हणजे तसे करायचेच असते ग."
" आता परत कसले प्रपोज करणार? मागच्या आठवड्यातच तुमच्या लग्नाची बोलणी करून तुमच्या पसंतीने च लग्न ठरवले आहे ना?? मग आता हे काय नवीन ???” सुनंदातील पालकत्व जागे झाले.
“ तुला नाही कळणार ग आई! हा किनई आमच्या पिढीचा फंडा आहे. अब तो तुम बुढि हो चुकी हो.. पण बाय द वे आई, तू कधी बाबांना किंवा बाबांनी तुला कधी प्रपोज केले आहे का? कोणी आधी केले आणि कसे केले सांग ना..” अनन्या नेहमीप्रमाणे बिनधास्तपणे विचारती झाली.
सुनंदा मात्र अशा अनपेक्षित प्रश्नाच्या गुगलीने पुरती क्लीन बोल्ड झाली. लेकीच्या असे बेधडक बोलणे तिला काही नवीन नव्हते.
“ अनू, आता काहीही विचारतेस का तू? आमच्या वेळी असे प्रपोज बिपोज तर राहू दे पण साधे मुलांशी बोलण्याचीही सोय नव्हती. कॉलेजला जाताना आई वंडिलांपेक्षा बाहेरचे लोकंच लक्ष ठेवून असायचे. मुलांशी कोणी अगदी सहज जरी बोलायला गेले तर लगेच घरी त्याचे रसभरीत वर्णन पोहचलेले असायचे आणि घरून त्यावर एकच पर्याय निघायचा की कॉलेज बंद. मग त्यासाठी कोणतीही शहानिशा केली जायची नाही. त्यामुळे मुलांपासून चार हात दुरुच असायचो आम्ही.” सुनंदा.
“ काय आई किती बोअर होते ग तुमचे आयुष्य.. काही मजाच नाही. पण मग बाबा तुला नक्की कुठे आणि कसे भेटले ते तरी सांग ना.. अनू आपल्या मुद्यावर ठाम होती. आईला या विषयी बोलणे अवघड होत आहे हे कळत असूनही आईची फिरकी घ्यायला तिला नेहमीच मज्जा यायची.
“ अनू अग तुमच्या सारखे तुझे बाबा मला कुठे भेटले बिटले नाही हं! माझ्या मामीने हे स्थळ आणले आणि रितसर दाखवण्याचा कार्यक्रम होऊन आमचे लग्न झाले. लग्नाआधी कधीही भेटलो किंवा बोललो नव्हतो. पण झाला ना संसार व्यवस्थित, मग झाले तर” सुनंदाने विषय संपवण्याचा प्रयत्न केला.
“ पण आई, आयुष्यातील एव्हढी मोठी गोष्टही तुमच्यासाठी किती सरप्रायझिंग होती असे नाही वाटत का? हे म्हणजे लॉटरीसारखे आहे. नवरा किंवा बायको चांगली निघाली तर बंपर ड्रॉ लागला नाहीतर संपले सगळे.. काय हॉरिबल आहे हे!! अनन्याला खूप आश्चर्य वाटले.
“ अग लग्नाआधी मुलगा मुलगी जरी बोलत नसले तरी घरातील मोठी माणसं स्थळाविषयी पूर्ण माहिती घेत असत आणि मगच लग्न ठरवत असत. त्यामुळेच तर आता पंचवीस वर्षे झाली लग्नाला, पण कधी असे उघडपणे प्रेम व्यक्त केले नाही आणि प्रपोज वगैरे न करताही झालाच ना सुखाचा संसार!!! अनू, असे सर्वांसमोर एकमेकांना मिठया मारणे, फुलं देणे आणि आय लव यू म्हणणे म्हणजेच प्रेम असते का? संसारात जोडीदाराच्या शब्दापालिकडच्या भावना समजणे आणि त्या भावनांशी एकरूप होणे हेच खरं प्रेम! खऱ्या प्रेमाला कोणत्याही प्रदर्शनाची गरजच नसते.” सुनंदाने आपले मत मांडण्याची संधी साधली.
“ पण आई यात काही थ्रिल नाही वाटत. तुम्ही लोकं आमच्या प्रेम व्यक्त करण्याला थिल्लरपणा म्हणत आयुष्यातले थ्रिल हरवून बसतात. तुमचे अव्यक्त असे ईशारों ईशारों में चालणारे प्रेम खरे आणि आमचे खोटे असे काही नसते हं. तू लगेच आपली लेक्चर देण्याची संधी साधू नकोस. प्रत्येक व्यक्तीची आणि पिढीची प्रेमाची भाषा वेगळी असते, फुलणे वेगळे असते. आई, तुझ्या भाषेत एकरूप होणं आणि समरस होणं म्हणजे नक्की काय ग??? नवऱ्याची मर्जी सांभाळणे, त्याची आवड निवड तीच आपली आवड समजणे आणि स्वतःच्या इच्छा आकांक्षाची आहुती देत जगणे .. आई, मला सांग तू आजपर्यंत संसारात स्वतःसाठी अशी किती स्पेस ठेवलीस??? सतत आपले ते दुसऱ्यांसाठी जगणे, स्वतःला काय हवे पेक्षा दुसऱ्यांना काय हवे ते बघणे. अरे, जगा ना दुसऱ्यांसाठी...पण स्वतःचाही विचार असू द्या. आपणच आपल्याला स्पेस ठेवावी लागते. समोरचे कोणी येऊन आपल्याला स्पेस देऊन आपले अस्तित्व निर्माण करणार नसते.” अनन्याने नेहमीप्रमाणे आपली स्पष्ट मतं मांडली.
अनन्याच्या या मतांवर सुनंदा निरुत्तर होई. तिचे म्हणणे तिला मनांत कुठेतरी पटायचे, पण त्यानुसार जगणे तिच्यासाठी आता सोपे नव्हते.
आईचा विचारांत हरवलेला चेहेरा पाहून अनन्या आईला म्हणाली, “आई, आज आपण तुमचा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करू या. तू आज बाबांना प्रपोज करायचेस. मी सौरभला पण घरीच बोलवते. मस्त धमाल करू, पार्टी करू. तुलासुद्धा खूप फ्रेश वाटेल ग.”
“ ए बाई तुझे ते‘व्हॅलेंटाईन डे’ चे फॅड तुमच्यापुरतेच राहू दे. तुझ्या बाबांशी मी असं अचानकपणे वेगळं काही वागले ना तर ते चक्कर येऊन पडतील. शिवाय तुझी आजीही घरात आहे. त्यांचा काही विचार करशील की नाही?” सुनंदाने झुरळ झटकावे तसा हा विषय झटकून टाकला.
“ अरे, आजी.. दी ग्रेट .. थांब आता मी आजीलाच सांगते म्हणजे तुम्ही ऐकाल.” असे म्हणत अनन्याने आजीच्या खोलीकडे धाव घेतली.
“ अनू, अनू, इकडे ये, या पोरीला कधी अक्कल येईल कोण जाणे .. आजोबांना जाऊन जेमतेम वर्ष देखील झाले नाही आणि ही आता आजीशी या विषयावर बोलणार!!” सुनंदाची अस्वस्थता अधिकच वाढली.
तेवढ्यात अनन्या आजीला हाताने धरत जवळ जवळ ओढतच घेऊन आली.
“ अग, सुनंदे, अनू काय म्हणतेय ऐक ना जरा, कधी कधी नवीन पिढीचे ऐकावे लागते बाई, तरच नातेसंबंध टिकून राहतात. उगीच नाही आपण एवढी एकत्र व्यवस्थित नांदत आहोत.” सासूने सुनेला ठेवणीतला शालजोडा मारून घेतला.
“ अहो आई, तुम्हीसुद्धा?? काहीही हं, तुम्ही तरी हिच्या नादी लागू नका .. काहीही काय हट्ट पुरवायचा ..”
“ असू दे ग, आता चार दिवसांची पाहुणी आहे आपली अनू.., अन एखादं भेटकार्ड आणि फूल द्यायला काय मोठेसे लागते .. तेवढाच आपल्या रोजच्या जीवनात थोडा बदल!!! होऊ दे तिच्या मनासारखं!!” असे निक्षून सांगत आजींनी विषय संपवला.
चला, आता ठरले तर मग... संध्याकाळी आई-बाबांना प्रपोज करणार!!! आई, तू मस्तपैकी साडी नेस किंवा छानसा ड्रेस घाल...आज एकदम भारी प्रपोज झाले पाहिजे. मी खूप उत्सुक आहे. आई, तुला माहिती नाही पण आजीने मला एक सिक्रेट सांगितले आहे. ती देखील आजोबांना खूप मिस करत असते. आजोबा गेल्यावर त्यांच्या आठवणीत आजीने एक कविता लिहिली आहे. इतके दिवस ती कविता तिने फक्त मलाच दाखवली होती. पण आज ती कविता आजी सर्वांना वाचून दाखवणार आहे.” अनन्याचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता.
अनन्याचे फुलपाखरासारखे स्वच्छंदी जगणे बघून सुनंदाला स्वतःचे जीवन आठवले. आपली पिढी म्हणजे सुरवंटाचे फुलपाखरू होण्याच्या अवस्थेतील..... तर सासूबाईंची पिढी म्हणजे सुरवंटासारखे जगणे ..ना कोणते पंख.. ना बागडणे... ना स्वातंत्र्य.... पण ते जीवन स्वीकारत ती पिढी तशी खूप आनंदात जगली.
आपण मात्र संक्रमण अवस्थेत अडकलो. ना आधीच्या पिढीसारखे आहे ती परिस्थिती स्वीकारत 'पदरी पडलं अन पवित्र झाले' असे म्हणत जगणं जमले आणि ना अनन्या सारखे आपल्या मनाला पटेल असे वागणे जमले.
“जाऊ दे, आपली लेक कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करणार त्यापेक्षा सौरभ आणि अनु घरी आहेत हेच महत्त्वाचे!!!" असा विचार करत सुनंदा उठून पुढील तयारीला सज्ज झाली.
संध्याकाळी सौरभ आणि अनन्या दोघांनी मिळून विविध फुलं, पावभाजी, आईस्क्रीम अशी जोरदार तयारी केली होती. असा उत्साह या मुलांना आपल्या पारंपारिक सणांना का नसतो हे कोडं काही सुनंदाला उलगडत नव्हते.
अनन्याच्या फर्मानानुसार तिचे बाबा म्हणजे अनिल घरी आल्यावर सुनंदाने गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत केले. अनन्या सतत तिला 'आय लव्ह यू' म्हण म्हणून खुणावत होती. पण फुल देतानाच सुनंदाला एव्हढे लाजल्यासारखे अन अवघडल्यासारखे वाटत होते की तिने अनन्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. पण लग्न ठरल्यावर जसे धडधड होणं, रोमांचित होणं किंवा लाजेने चूर होणं वाटले होते अगदी तशीच अनुभूती तिला या क्षणी आली. काय बोलावे, कसे व्यक्त व्हावे समजत नव्हते. पण खूप छान हलकं हलकं वाटत होते.
" वा आई, तू काय सॉलिड दिसतेस ग अशी शाय होताना!!! सौरभ, बघितलेस का तू आईकडे?" लेकीच्या अशा बोलण्याने सुनंदाला अधिकच लाजल्यासारखे झाले.
अनिलला पण हा सुखद धक्का खूप आवडला. आज ते देखील लेकीवर खूप खुश होते.
संध्याकाळी अनुची आजी आपली ठेवणीतील जरीकाठी साडी नेसून, अंबाड्यात फुल माळून अगदी वेळेत तयार होऊन बाहेर येऊन बसली. पती निधनानंतर आजीचे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व आकार घेत असल्याचे जाणवत होते. अर्थात आजोबांच्या आजारपणात त्यांना कधी स्वतःकडे बघणे जमलेच नव्हते. त्यामुळे सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडून आता अपूर्ण राहिलेल्या इच्छा आकांक्षा आणि कालागुणांची पूर्तता करण्यात आजींनी स्वतःला गुंतवून घेतले होते.
आजही अगदी नीटनेटके तयार होऊन हातात कवितेचा कागद घेऊन उत्साहात बाहेर येऊन बसल्या होत्या.
" अरे, आवरता की नाही लवकर , मी केव्हाची तयार होऊन आले आहे" आजींनी सर्वाना आवाज दिला.
“ आलो ग आजी आम्ही, सौरभ पण आला आहे बघ." अनन्या लगेच बाहेर आली.
" आजी, तू आधी तयार झाली आहेस ना मग तूच आजोबांसाठी लिहिलेली कविता वाच." अनन्याने सांगितले.
आजीने लगेच चष्मा काढला आणि कविता वाचायला सुरुवात केली,
लग्न ठरले तेव्हा,
संधी नाही मिळाली एकमेकांना बघण्याची
तशीच झाली सुरुवात आपल्या सहजीवनाची
लग्न म्हणजे काय
कळण्यापूर्वीच चाललो आपण सप्तपदी
सुखदुःखात झालो सहभागी आपण पदोपदी
संसार सागराच्या नौकेत,
झाले आरूढ मी अजाणतेपणी
कधी झाले तुमची न कळले मला माझे मनी
अर्धांगिनीचा खरा अर्थ ,
अर्धे अंग निष्प्राण झाल्यावर उमगला
जगणे कोणासाठी होते शोधही लागला
संसारचक्रात एकमेकांसाठी,
नाही काढू शकले कधी उसंत
आज सोबत नसल्याची वाटतेय खंत
पती निधनाचे दुःख,
फक्त त्या 'स्त्री' लाच ठाऊक असते
त्यात कोणीही सहभागी होऊ शकत नसते
दहा दिवसांचा शोक,
मग लागतात सारे आपापल्या उद्योगाला
आठवणींच्या झुल्यावर झुलावे लागते एकटीला
सुखदुःखांची शिदोरी,
जी बांधली होती आपण दोघांनीच
आता कवटाळून बसते माझी मीच
त्या काळात ,
ना जमले कधी प्रेमाने साद घालणे
ना जमले कधी ' आय लव्ह यू' म्हणणे
पण देवाशपथ,
खरं सांगते तुमच्याशिवाय जगणे
अवघड आहे हे शिवधनुष्य पेलणे
आजीची कविता ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावले. अनन्या ‘माझी आजू’ करत आजीच्या गळ्यात पडून रडायला लागली. वातावरणातील तणाव घालवण्यासाठी आपल्या डोळ्यांतील अश्रुना थोपवत हसून आजी अनन्याला म्हणाली, ”काय वेडाबाई? केल की नाही आज ‘व्हॅलेंटाईन डे’ ला तुझ्या आजोबांना प्रपोज? आमच काय जुनं खोड, नवीन पिढी सोबत टिकायचा प्रयत्न.” नंतर सुनेकडे मोर्चा वळवत आजी म्हणाल्या, “ काय ग सुनंदे, तू काही बोलणार आहेस की नाही माझ्या लेकाबद्दल?"
" हो तर आई, आज मी पण अनिलविषयी कवितेतून सांगणार आहे" असे म्हणत सुनंदाने आपली कविता वाचण्यास सुरुवात केली.
प्रिय अनिल,
आपलं प्रेम हे हृदयात फुलणारं
मनावर खोलवर उमटत जाणारं
शब्द नाही आले कधी ओठांवर
पण फुललं आपल्या सहजीवनावर
‘व्हॅलेंटाईन डे' सोहळा प्रेमाचा
पडतो पाऊस सर्वत्र गुलाबांचा
लाल गुलाब प्रतीक गोडीगुलाबीचे
निळा गुलाब सांगे महत्व सामर्थ्याचे
पिवळा गुलाब उधळण सुवर्णक्षणांची
हिरवा सांगे महती दया, क्षमा शांतीची
केशरी गुलाबाचा असे त्यागाशी संग
असती गुलाबाचे असे विविध रंग ढंग
नाही दिला कधी आपण गुलाब हाती
पण जगलो हे सर्व रंग घेऊन सोबती
जीवनाच्या रंगढंगात न्हाऊन निघाले
तू दिलेल्या प्रेमाने सुखावून गेले
आपल्या प्रेमाला उपमा नाही कशाची
व्यक्त करताना भासते उणीव शब्दांची
या अबोल प्रेमाला नको वेसण ते शब्दांचे
त्याला उमगतात अर्थ मुक्या भावनांचे
लेकीचा पुरवताना व्हॅलेंटाईन डे चा हट्ट
करते मी आज माझ्या प्रेमाला व्यक्त
तुझीच सुनंदा
“वाह आई, मस्तच ग, तू इतके सुंदर लिहितेस हे आम्हाला आजच कळले. तुमच्या नि:शब्द प्रेमाचा रंगही आजच पहायला मिळाला .बाबा, आता तुझेही काहीतरी सॉलिड होऊन जाऊ दे बरं” असे म्हणत अनन्याने आपला मोर्चा बाबांकडे वळवला.
“ अरे, बेटा हम भी कुछ काम नही.. मै तो शीघ्रकवी हूं... बघ मी पण आज माझ्या प्रेमाला कागदावर उतरवले आहे” असे म्हणून अनिलने आपल्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली,
प्रिय सुनंदा,
तू आहेस म्हणून मी आहे
तूच माझ्या जीवनाचा आधार आहे
तुझ्यामुळे आहे जीवनाला अर्थ
तुझ्याच साथीने झाला प्रपंच यथार्थ
संसाराच्या गणिताचे आहे अजब तंत्र
व्यक्तिनुसार बदलत जाते याचे सूत्र
‘तू अधिक मी’ बेरीज होते अगणित
तू वजा झाल्यास उरेल मी शून्यातीत
तुझ्यासारखे ‘त’ म्हणता ताकभात ओळखणे
अशक्य आहे बुवा मला ते जमणे
व्यवहार आणि मी असतो छत्तीसचा आकडा
नाती सांभाळताना पडतो ग मी तोकडा
तुला वाटते तुझ्या इच्छा ठेवतो मी खिशात
पण तुझ्याविरुद्ध वागण्याची काय माझी बिशाद
आजवर जगत आलोय ते फक्त तुझ्यासाठी
जे काही करतोय ते आपल्या सहजीवनासाठी
जरी नाही कळत मला गंध अन रंग
तरी जाणला आहे मी तुझ्या प्रेमाचा सुगंध
आज देऊन पुष्प करतो व्यक्त माझ्या प्रेमाला
अशीच कायम सांभाळून घे या बापुड्या जीवाला
तुझाच,
अनिल
आपली कविता वाचून झाल्यावर अनिलने सुनंदाला गुलाबाचे फूल दिले आणि सर्वांसमक्ष लव यू टु मच म्हटले. सुनंदा तर लाजून लाजून चूर झाली. पण आज खूप वर्षांनी तिला तरुण झाल्यासारखे वाटले.
अनन्या तर हे सर्व पाहून भारावल्यासारखी झाली. आपल्या आई बाबांचे असे हे रूप ती प्रथमच पाहत असल्याने तिला त्यांचे खूप कौतुक वाटले आणि त्यांचा अभिमानही वाटला.
नंतर सौरभने त्यांच्या पद्धतीने गूढघ्यावर बसून फूल देत अनन्याला प्रपोज केले. अनन्याने ते प्रपोजल स्वीकारले आणि आय लव यू म्हणत दोघे अगदी सर्वांसमोर एकमेकांच्या गळ्यात पडले.
आज सुनंदाने थोड्याफार प्रमाणात तदनुभूतीचा प्रत्यय घेतलेला असल्याने तिला लेकीच्या वागण्याचा अजिबात त्रास झाला नाही. उलट या पिढीची प्रेमाची भाषा, व्यक्त होण्याची पद्धत आणि विचारसरणी थोडीफार समजल्याचे तिला समाधान वाटले.
आजच्या प्रसंगातून सुनंदाच्या लक्षात आले की या मुलांना कोणत्याही गोष्टीला विरोध करण्याआधी त्यांचे विचार आणि भावना समजून घेतली पाहिजे. त्यांच्या आधुनिक विचारांना आपल्या संस्कृतीचे, संस्कारांचे खतपाणी घातले तर निर्माण होत असलेली जनरेशन गॅप नक्कीच भरली जाऊ शकते. आपल्या सणवारांमध्येही काळानुसार बदल करत त्यातही लवचिकता आणल्यास ही मुलेही आनंदाने सहभागी होतील यात शंकाच नाही.
“ चला, म्हणजे संक्रमण अवस्थेतून सुटका नाही!!!” असे म्हणत सुनंदा स्वयंपाक घराकडे वळाली.
@ सौ. मंजुषा देशपांडे, पुणे.
हे संक्रमण आपण नक्की छान स्वीकारू या 👍आणि हॅप्पी व्हॅलेंटाईन डे, खूप छान लिहिलेस आनंदाचे एक एक पदर छान उघडलेस
ReplyDeleteमनापासून धन्यवाद
Deleteखुपच छान ताई. मनापासून लिहीलेले मनापासून आवडले. ☺👍
ReplyDelete