"अगं, मूळ साडीचा रंग करडाच आहे ना, त्यावर बाकी सारे रंग आहेत. म्हणजे कसं एका साडीत सर्व नऊ रंग मिळून गेलेत." नवरोजींचा निरागस खुलासा.
" अहो, पण मी तुम्हाला अगदी व्यवस्थित करडा रंग दाखवून तोच आणायला सांगूनही तुम्ही जे करायचे तेच केले. बरोबर आहे, म्हणजे परत काही सांगायलाच नको. मला त्यातले काही कळत नाही म्हणत हात वर करायला मोकळे." सौ. ची बडबड चालू झाली.
" हे बघ साडीचा रंग करडाच आहे. त्यात थोडे इतर रंग असले तरी काय फरक पडतो?" आपली चूक मान्य करून शरणागती पत्करण्याऐवजी नवरोजी आपल्या मतावर ठाम होते. अर्थात चूक नुसती मान्य करून विषय संपला नसता. तर ती साडी परत करायला जावे लागले असते. त्यामुळे नवरा आपल्या परीने खिंड लढवत होता.
" थोडे इतर रंग म्हणतात याला? अहो पूर्ण रंगीबेरंगी साडी आहे ही. ऐन नवरात्रात तुम्ही माझी फजिती केली. जिथे तिथे आपणच जा. आज मला वेळ नव्हता म्हणून कधी नाही ते काम सांगितले.आता उद्या काय करू?" सौ.ची चिडचिड चालू होती.
" काय फरक पडतो प्लेन करडा रंग नसला तर?" नवरोजींचा भोचकप्रश्न.
" वाटलेच मला हा प्रश्न येणार!!! तुम्हाला काय फरक पडणार आहे म्हणा!!! म्हणूनच ही रंगीबेरंगी साडी आणून सगळा बेरंग केला. तरी बरं कधी म्हणून काहीही आणायला सांगत नसते......
( "हो ना, स्वतःच जाऊन पैसे उडवून येत असते." नवर्याचा आतला आवाज.)......
"बाकी बायका बघा.....
("कसे बघणार? तुझी करडी नजर असते न माझ्यावर!!! तू काय सुखासुखी बघू देणार आहेस?" नवर्याचा आतला आवाज)
......नवर्याला घेऊन गावभर फिरवून पाहिजे त्या रंगाची, पाहिजे त्या प्रकारची आणि पाहिजे त्या किंमतीची साडी घेऊन येतात. आजवर मी कधी काही हट्टाने मागितले आहे का?..तुम्हाला माझी काही किंमतच नाही. मी होते म्हणून......सौ. च्या रागाच्या भावनेचा रंग बदलू लागला'
("झालं...आता आजवर आपल्यामुळे कसा संसार झालं ह्याची यादी येणार आता...!!! पटकन विषय बदलला पाहिजे." नवर्याचा आतला आवाज).
" अगं, माझे ऐक ना थोडे, मी खूप डोकं वापरुन ही साडी घेतली आहे ग. ही नौरंगी साडी आहे. नवरात्रीचे नऊ रंग आहेत बघ यात." त्या करड्या साडीपायी नवरोजींचा घसा कोरडा पडायची वेळ आली होती.
" मग काय एकच साडी रोज वापरू???" सौ. अधिकच वैतागली.
" मी काय तुला एवढा बुद्धू वाटलो काय? ही बघ अगदी तशीच दुसरी साडी!!! एक धुतली की दुसरी नेसायची." मोठ्या फुशारकिने नवरोबा म्हणाले.
"अहो, किती वर्षे झालीत आपल्या लग्नाला? अजूनही बायकोला काय आवडते काहीच कळू नये?? हात टेकलेत तुमच्यापुढे. साधी करड्या रंगाची साडी सांगितली होती. कोणी होते नाही तिथे डोके वापरायला??"
" ए, अशी चिडू नकोस ना...चिडल्यावर तर तू अजूनच छान दिसतेस...मग मी परत प्रेमात.....
"ओहोहो , पुरे झाले हं आता. तोंड पाठ झालेत तुमचे सर्व फंडे. काहीही सारवासारव नकोय. आयुष्य घालवले आहे तुमच्यासोबत. काय काय नाटकं सहन केली आहेत माझे मला माहीत.....
( बाप रे!! परत काय काय सहन केले याची यादी.....नको रे बाबा....इति त्याचा आतला आवाज).
"अगं, पण पूर्वी कुठे होते हे सर्व??? आहे त्याच साडीतच नवरात्राची पुजा आणि मजा दोन्ही साधले जायचेच ना???"
" होत होते ना सणवार साजरे.... पण बदलत्या काळाप्रमाणे आपणही थोडे बदललो तर कुठे बिघडले? आता देवीलाही बघा ....देवीला देखील वाराच्या रंगाप्रमाणे साडी नेसवली जाते. पण लक्षं असते कुठे?"
" मंदिरात देवीचे दर्शन घ्यायचे असते की साडी पहायची असते?" नवरोजी पण आज माघार घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.
" कळतात हो मला टोमणे....पण मी म्हणते दर्शन घेताना साडी पण बघितली तर देवीचा कोप होतो का?? जाऊ द्या तुमच्याशी बोलण्यात अर्थच नाही. माझे मीच बघते काय करायचे ते. तुम्ही फक्त ह्या तुमच्या नौरंगी साड्या तेव्हढ्या परत करा." बायकोने फर्मान काढले.
झाले....जे नको होते तेच घडले. आता ह्या साड्या परत करायच्या म्हणजे परत त्या गर्दीत जा...दुकानात थांबा....काय करावे बरे ......अचानक नवरोजींच्या सुपीक डोक्यात एक युक्ति आली. एक प्रयत्न करून बघू या म्हणत ते सौ. ला म्हणाले." तुला अगदी खरं सांगू का मी ही साडी तुझ्यासाठी खूप विचारपूर्वक घेतली आहे ग. ह्या साडीत ना मला तूच दिसलीस."
" पूरे...पूरे ...मखलाशी. जा आधी साड्या परत करा." सौ. काही ऐकत नव्हती.
" अगं माझे बोलणे पूर्ण ऐकून तर घे. मग मी जाईन ना परत करायला. तर ह्या साडीचा मूळ रंग आहे, ग्रे...करडा ..किंवा राखाडी. हा रंग म्हणजे समतोलत्वाचे प्रतीक आहे. हा रंग मला तुझ्या स्वभावाशी खूप मिळताजुळता वाटला. कारण आजवर आयुष्यात जे काही पांढरे आणि काळे दिवस ....सुख आणि दू:खं ....आनंद आणि संकटे ..आलीत, त्या सर्वांमध्ये तू कुठेही न डगमगता आहे ते सर्व स्वीकारत मार्गक्रमण करत असतेस. पण हा समतोल साधताना केशरी रंगाची उत्साही वृत्ती/शूरता/सकारात्मकता, लाल रंगाची स्फूर्ति/आकर्षकता, निळ्या रंगाची शांत संयमी वृत्ती, पांढर्या रंगाची निरागसता/ सर्वसमावेशकता, हिरव्या रंगाची समृद्धी/ प्रगती, पिवळ्या रंगाची प्रखरता/ तेजस्विता आणि गुलाबी रंगाची खेळकर वृत्ती/ रोमांटिकपणा अशा सर्व रंगांची उधळण करत आणि माझ्या सर्व रंगांना स्वीकारत तू स्वतः ही भरभरून जगलीस आणि आम्हालाही भरभरून आनंद दिलास. मग का नाही मी तुला अशी रंगीबेरंगी साडी घेणार??? इति नवरोजी.
"इश्य!!! तुमचे आपले काहीतरीच हं !!! असे मी नवी नवरी असते तर तुमच्या बोलण्याला भुलून म्हणाले असते'. आता मात्र तुमचे सर्व रंग चांगलेच ओळखून आहे हो! काही बोलू नका. तरीही आज मात्र तुम्ही जिंकलात बरं का. आवडले मला तुमचे वेळेवर सुचलेले तत्वज्ञान. आज तर मी माझ्या करड्या रंगाचीच साडी आणणार आहे. ह्या नौरंगांचा संगम आपण दसर्याला करू, द्या ते साडीचे बिल माझ्याकडे, निदान एकतरी साडी परत करून माझी करडी साडी आणते." सौ. पारा आता खाली आला होता.
"तुझा हाच समजूतदारपणा मला खूप भावतो. हे मात्र मी अगदी मनापासून बोलतोय हं!!! प्रत्येक रंगाचे योग्य मिश्रण ज्यांना जमते ना, त्यांचे आयुष्य सुखी होते. त्यामुळे रंगांचे गुणधर्म समजले ना की व्यक्तींचे रंग ओळखून त्या प्रमाणे आपला रंग दाखवावा. रंगांप्रमाणे माणसे बघत गेलो ना तर त्या व्यक्तीच्या वागण्याचा अर्थ समजतो आणि मग तिचे वागणे खटकत नाही. उलट तिला समजून घेता येतं आणि कोणत्या रंगांच्या छटा कमी करायच्या, कोणत्या वाढवायच्या यासाठी मदत करता येईल. तुम्हा बायकांचे हे निरीक्षण खरंच खूप चांगले असते. फक्त त्याला रंगांच्या अभ्यासाची जोड हवी. त्यामुळे नवरात्रीत ह्या सर्व रंगांची उधळण तनाप्रमाणे मनावर सुद्धा झाली तर तनाच्या सौंदर्याबरोबर मनाचे सौंदर्यही खुलून येईल आणि सुंदर इंद्रधनुष्यी रंगांचे आयुष्य साकार होईल." नवरोजी जीवनाच्या रंगात गुंगले होते.
" कुठे वाचता तुम्ही हे सर्व? कमाल आहे बाई!!! आता हे रंगांचे तत्वज्ञान सर्वांना सांगायलाच हवे." सौ.चा नवर्यावरील गहिर्या प्रेमाचा रंग बोलू लागला.
शेवटी नेहमीप्रमाणे मनावर करड्या रंगाची शेड पांघरून गुण दोषांसाहित नवरोजींना स्वीकारत आनंदाने सौ ने ती करडी साडी घरात आणली आणि नवरोजींना गृहलक्ष्मी प्रसन्न झाली.
दसर्याच्या दिवशी बाहेर काही चौकस मैत्रीणी सौ. ला विचारत होत्या," अय्या, आज दसर्याला अशी काय साडी नेसलीस तू ?"
सौ. मोठ्या खुशीत सेल्फी काढत त्यांना सांगत होती....आज दसरा....म्हणून सर्व नौरंग असलेली साडी....रंगांचे गुणधर्म.....आयुष्यात असलेले त्यांचे महत्व.....
" साडी भाऊजींनी आणलीय वाटतं.....त्यामागे एवढे तत्वज्ञान चालले आहे म्हणून विचारले." त्यातली एक पचकलीच.
पण सौं. स्वत:च्या रंगात एव्हढी रंगून गेली होती की कोण काय बोलतेय हयाकडे तिचे लक्षच नव्हते.
आयुष्यात पहिल्यांदाच नवरोजींना आपल्या बुध्दिमतेचे सार्थक झाल्यासारखे वाटले.
अशी ही रंगांची कहाणी नवरात्रीत नाही तर संपूर्ण आयुष्यभर मनावर कोरली गेली तर जीवनातल्या सर्व रंगांचा स्थितप्रज्ञतेने अनुभव घेता येईल.
@ सौ. मंजूषा देशपांडे,पुणे.
( पोस्ट बिनधास्त शेअर करा....फक्त नावासहित)॰