आत्ता खरं सांगायचे झाले तर आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे अशी काहीशी मनाची अवस्था झाली आहे. का म्हणून विचारता आहात?
त्याला कारणही तसेच आहे.
वाचकहो, माझ्या बेसूर गाण्यावर खुष होऊन दाद देणारा मला चक्क एक श्रोता मिळाला आहे.
त्यामुळे 'आज मै उपर आसमा नीचे, आज मै आगे जमाना है पीछे' असे म्हणत मी वेगळ्याच दुनियेत रमले आहे.
खरे तर आपल्याला चांगले गाणे म्हणता येईल अशी मला का कोण जाणे, पण पक्की खात्री होती.
त्यासाठी मी खरंच खूप धडपड पण केली हो!!!
पण मेलं ते सूर, लय आणि ताल कायम माझ्याशी शत्रूत्व असल्यासारखे माझ्यापासून दूरच राहतात.
छान काहीतरी गुणगुणावे म्हणावे तर एक सुद्द्धा मदतीला येत नाही. मला ते दुरून चांगले दिसत असतात. पण घशाच्या आसपासही फिरकत नाहीत.
खूप राग येऊन मी चिडून त्यांना म्हणायचे, " गद्दारांनो, अरे तुम्हाला आत्मसात करण्यासाठी राब राब राबले रे मी!!! अरे,अनेक हाडाच्या गुरुंनी माझ्यापुढे हार मानून काढता पाय घेतला. मी मात्र अजूनही हार मानायला तयार नाही. हे सुरांनो, थोडी तरी किव करा माझ्या कष्टांची."
पण त्यांनी जणू, " पाषाणाला गाणं येईल पण तुला येणार नाही," हे माझ्या एका गुरूंचे शब्द खरे करण्याचा विडाच उचलला होता.
तेव्हापासून आजतागायत आपल्याला गाणे म्हणता येत नाही ही खंत मनाला होती.
होती....हं ... म्हणजे आता नाहीये बर का...
कारण काय तर माझा तो लाडका श्रोता.
कोण असेल बरर्र्.....
नुकतेच इवल्या इवल्या पावलांच्या रूपांनी घरात चिमुकलीचे आगमन झाले.तिला खेळवताना, झोपवताना नकळत कोणाला ऐकू जाणार नाही अशा हळू आवाजात गाणी गुणगुणू लागले.
अहो, काय आश्चर्य !!! ते इवले इवले डोळे माझ्यावर रोखले गेले. आधी मला वाटले एवढ्याशा जीवालाही माझे बेसुरेल गाणे कळले कि काय???
पण लगेच त्या इवल्याशा ओठांनी हसून दाद दिली.
अहाहा ..... मला झालेला काय तो आनंद ...माझ्यात नसलेल्या सूर-लय-तालाकडे फोकस न करता अगदी निरागस दाद मला मिळाली.
मग काय माझ्या दबल्या गेलेल्या सुप्त इच्छेने परत डोके वर काढले.
चिव चिव ये, इथे इथे बैस रे मोरा पासून सुरु झालेला माझा गाण्यांचा प्रवास थेट सिनेगीतांपर्यंत कसा जाऊन पोहचला कळालेच नाही.आजवर जी गाणी माझ्या घशातून बाहेर पडायला चाचरत होती, ती आता अगदी भरभरून बाहेर येत असतात.
अशा प्रकारे आजवर अनेक चांगल्या चांगल्या गाण्यांची मी मनोसक्त वाट लावली. पण माझ्या प्रिय श्रोत्याकडून येणारा प्रतिसाद मात्र कायम तोच आणि तेच गोड कधी खुदकन तर कधी खळखळून हसणे.
कधी वाटायचे की आपल्या तिला खेळवण्याच्या किंवा झोपावण्याच्या जीव तोडून केलेल्या प्रयत्नांनावर आपली दया येऊन तर ती दाद देत नाही ना???
कधी वाटायचे की आपल्या तिला खेळवण्याच्या किंवा झोपावण्याच्या जीव तोडून केलेल्या प्रयत्नांनावर आपली दया येऊन तर ती दाद देत नाही ना???
पण छे!!! त्या निरागस मनात हे विचार येणार तरी कुठून???
तिचे ते गोड हसणे म्हणजे इनोसन्स ओव्हरलोडेड चा प्रत्यय ...
यावरून मला निरागसता म्हणजे नक्की काय याची अनुभूती आली.
आपण सर्वसाधारणपणे कोणालाही अमुक खूप निरागस आहे असे म्हणतो.
पण खरी निरागस अवस्था कशी असते हे फक्त अगदी लहान मुलाकडे पाहूनच कळते.
आता तर खूप वेळ या निरागस मनासोबत राहत असल्याने त्याची जाणीव अगदी तीव्रतेने झाली.
कोणी काहीही बोला ... ओरडा... रागवा... गोड बोला..काहीही कळत नाही...
हसू आले कि मनोसक्त हसायचे...रडू आले कि जोरात भोकाड पसरायचे... कोण काय म्हणेल...कोण कोणत्या उद्देशाने बोलतोय ....कसलेच काहीही देणे घेणे नाही....आपल्या दुनियेत मस्त रममाण....
ही अवस्था कायम राहिली तर...
आयुष्य काय धमाल होईल ना....
कोणी काही म्हणा...मला फरक पडणार नाही...मी मस्त स्वतःच्या दुनियेत मशगुल...राग आला तर कसला राग आला सांगून मोकळे...कोणाविषयी काही चांगले वाटले.... मनमोकळे बोलून मोकळे...मनात कोणाविषयी आकस नाही...हेवेदावे नाही... रागलोभ नाही...इर्षा, द्वेष काहीही नाही...
जीवनात उरेल काय ...तर निखळ ...निर्मळ आनंद...
एवढे सोपे असते जगणे???? मग अवघड होण्यास सुरुवात कुठून होते ...शोधलेच पाहिजे...
आपण सर्रास म्हणतो की बालपण आणि म्हातारपण सारखेच असते.
मग म्हातारपण का त्रासदायक वाटत असावे किंवा वृद्ध व्यक्ती का लहान मुलासारख्या वाटत नाही...
म्हातारपणी मन बालिश होते. लहान मुलासारखं हट्ट करणे, मागण्या करणे, न ऐकणे सुरु होते.....
त्यामुळे त्यांचे वागणे लहान मुलासारखे वाटत असावे....पण फरक कुठे असतो...तर तो निरागसपणात...
या निरागसतेमुळे लहान मुल कोणालाही पटकन आपल्याकडे ओढून घेते.
पण सर्व वृद्ध आनंदी का नसतात किंवा लहान बाळाला पहिल्यावरआपल्याला जो आनंद अगदी नेहमीच होतो...तसाच आनंद वृद्ध व्यक्तीकडे पाहून नेहमी नाही होत .......
कारण संसारिक व्यापात आणि भौतिक जगात समजदार..जबाबदार...होण्यात मनाची निरागसता कुठेतरी हरवली जाते....
वास्तविक आयुष्य सुखी समाधानी राहण्यासाठी ती हरवू न देणे ...ती जपणे....खुप महत्वाचे असते.
पण आपणच असं नाही करू...तसं नाही करू...लोकं हसतात...तो अमुक बघ किती छान वागतो...असे करत त्या निरागसतेला सुरुंग लावण्यास सुरुवात करतो.
मग सुरुवात होते जगण्याच्या स्पर्धेच्या तयारीला...त्यातून जन्म घेतात तुलना...इर्षा..आनंद...दु:खं....आशा ...निराशा ...हार ... जीत....
काही लोकं अशा अवस्थेतच शेवटपर्यंत जगतात....तर काही शोध घेतात निखळ न संपणाऱ्या आनंदाचा....
मग शोध सुरु होतो त्या निर्मळ...निरागस मनाचा...
एकूण काय तर जन्म म्हणजे निरागसतेकडून निरागसतेकडे प्रवास...
जो हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करतो किंवा ही निरागसता कायम जपू शकतो त्यालाच enlightenment किंवा आत्मसाक्षात्काराची अनुभती येत असावी असं मला वाटतं.
सद्या तरी मी आता माझ्या घरात वाहणाऱ्या निरागसतेच्या धबधब्यात मनोसक्त भिजतेय....
या भिजण्यातही खरा आनंद गवसतोय .....असेच भिजून भिजून ती निरागसता माझ्यातही झिरपली तर........
- मंजुषा देशपांडे, पुणे.
- मंजुषा देशपांडे, पुणे.