आयुष्य सुखमय होण्यासाठी सासूला सुनेची आईच व्हावे लागते असे ऐकले होते, पण वास्तविक आयुष्यात हे स्थित्यंतर कसे होते याचा छोटासा अनुभव.
म्हणता म्हणता आज आदित्यच्या म्हणजे माझ्या मुलाच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झालीत. आणि दोन वर्षांपूर्वीचा काळ माझ्या डोळ्यांसमोर आला. वास्तविक तेव्हा त्याच्या लग्नाचे कोणतेही प्रयोजन नव्हते. पण अचानक त्याने मुलगी आमच्या समोर उभी केली आणि पाच सहा महिन्यात तो बोहल्यावर चढला. खरंतर मला एवढ्यात सासुबाई व्हावयाचे नव्हते . सारखे वाटत होते आपण मस्त संपूर्ण घरावर स्वतंत्रपणे राज्य करत आहोत, लग्नानंतर लुडबूड करायला कोणी तरी येणार!!!
बरं मुलाला म्हटले की तुम्हाला वेगळा फ्लॅट घेऊन देतो तिथे तुम्ही संसार थाटा. पण छे! मुलगाही या गोष्टीला तयार झाला नाही आणि त्यापेक्षा जास्त सून म्हणजे अमृता ही तयार नव्हती.
शेवटी मनाची तयारी केली आणि सासूच्या भूमिकेत शिरले. ठरवले होते की मी सुनेला मुलीसारखीच समजेल म्हणजे ती आपोआप सर्वांमध्ये सामावली जाईल.
पण हळूहळू लक्षात आले की सासु होणे म्हणजे देखील एक प्रकारचे प्रशिक्षण असते. आता मुलगी मानणे म्हणजे काय हे मी प्रथम शिकले. शिकले म्हणण्यापेक्षा अजूनही शिकतेच आहे.
कारण होते काय की सुनेला मुलीसारखे वागतो याचा एक वेगळा अभिमान जागृत होतो आणि त्याप्रमाणे आपल्या अपेक्षा वाढतात.
लेकीने काम नाही केले, उशीरा उठली, मूडप्रमाणे वागली तर आपण नरमाईचे धोरण घेतो किंवा तिला समजावून सांगतो.
पण सुनेने असे काही कधी केले तर???
भराभर आपल्या चांगुलपणाची यादी डोक्यात येते. मी तिला मुलीसारखे मानले पण तिला माझी जाणीव नाही, घराविषयी, माझ्याविषयी काहीच वाटत नाही वगैरे वगैरे....
कारण सुनेने हे केलेच पाहिजे अशी समजूत कुठेतरी रुजलेली असते. आपण 'सुन' हया विषयाची एक चौकट बांधलेली असते. त्यातच तिला बसवायचा प्रयत्न करतो. त्यात ती फिट झाली तर ती खूप चांगली आणि थोडीफार चौकटीबाहेर जाऊ लागली की लगेच आपण ती अशीच आहे म्हणून लेबल लावायला मोकळे!!!
पण ती चौकट आपण जोपर्यंत आपल्या लेकीच्या चौकटीसारखी बनवत नाही, तोपर्यंत आपण तिला लेक मानतो असा.आपला गैरसमज असतो.
ही गोष्ट जेव्हा माझ्या लक्षात आली तेव्हापासून मी माझ्या सुनेविषयीच्या चौकटीची डागडुजी सुरू केली आहे. अर्थात यामध्ये मला माझ्या लेकाची म्हणजे आदित्यची खूप मदत होतेय. कारण अमृताने त्याला काहीही सांगू दे किंवा मी त्याला काहीही सांगू दे, तो सरळ आम्हाला दोघींना एकमेकींकडे उभे करतो मी म्हणतो बोला आता काय बोलायचे ते. त्यामुळे नकळत आमच्यात मोकळेपणा येत आहे. पण दोन वर्ष झाली तरीही अजूनही माझी ती चौकट पूर्णत: लेकीसारखी बनत नाहीये.
पण खरं सांगते अमृताने मात्र खरोखर तिच्या आई सारखे मानले आहे. कारण आमचे विचार खूप एक सारखे आहेत, स्वभाव खूप जुळतात असे अजिबात नाही. पण कोणत्याही गोष्टीत आम्ही टोक गाठत नाही. कधीकधी मी तिच्यावर लेकी वर चिडते तसे चिडलीही आहे. पण तिने कधीच राग धरला नाही किंवा उलटून बोलली देखील नाही. विशेषतः तिच्या माहेरच्यांनीही कधीही आमच्यात काय चालले आहे हयात लक्ष घातले नाही. अगदी पूर्णपणे मोठ्या मनाने आमच्यावर विश्वास ठेवून सर्वार्थाने आमच्या स्वाधीन केले हे देखील विशेष आहे.
खरंच खूप अभिमान आहे मला माझ्या सुनेचा आणि अर्थातच लेकाचा!!!
असेच कायम आम्हाला सांभाळून घेवोत आणि सुखाचा संसार करो हीच आज लग्नाच्या वाढदिवशी ईश्वर चरणी प्रार्थना !!!
मंजुषा देशपांडे, पुणे....
Mastch.
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteआपण महान आहात, सासू आणि सून देखिल. आपली भूमिका मला व्यक्तिशः आवडली. आईला मातृत्वाचा अनुभव असतो, सूनेच तस नसतं, एकदमच येतं सगळं.
ReplyDeleteतिला आपलीशी करून घेणं आणि तिने देखिल पुढाकार घेणे हीच मोठी असामान्य गोष्ट आहे. ह्यात आणखी एक महत्त्वाची भूमिका असते ती मुलाची. आणि तो तर ग्रेट च आहे. असा "आनंदी परिवार" च आदर्श असू शकतो.
ReplyDelete