लेख मंजुषा

Happy Anniversary “हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?” ती लगेच म्ह...

Thursday, 31 January 2019

नातं मैत्रीचं वयापलिकडचं

जानेवारी महिना म्हणजे संकल्पांच्या गंगेला येणारा महापूर. त्यामुळे ह्या गंगेत हात धूत मी देखील ठरवले कि आपण आता दरमहा एका विषयावर ब्लॉगवर लिहायचे. पण ते लिहायला देखील पंधरा तारीख उजाडून गेली.पण देर से लेकीन दुरुस्त म्हणत ह्या महिन्याचा विषय ठरवला,”नाते मैत्रीचे वयापलीकडचे”. 

खरं तर ब्लॉग सुरु करून बरेच दिवस झाले. पण टायपिंगचा असलेला कंटाळा काही सुचू देत नव्हता.पेन घेऊन कागदावर खरडणे भराभर जमते. किती कागद लिहून होतात ते समजतही नाही. पण शेवटी लक्षात आले कि आता मराठी टायपिंग शिवाय पर्याय नाही. त्यावरूनच ह्या विषयाच्या संदर्भातील एका सखा आणि सखीची ही गोष्ट.                   

नातं मैत्रीचं वयापलिकडचं

तशी अगदी लहानपणापासून म्हणजे त्याला समज आल्यापासून त्याची ही सखी त्याच्या सोबत होती. पण तीच आपली जीवश्च-कंठश्च सखी आहे हे त्याच्या उशीराच लक्षात आले. त्याच्या घरातील ग्रंथालय आणि विविध विषयांवरील पुस्तकांचा खजिना त्या सुकोमल,सदाबहार अशा त्याच्या सखीला बहरण्यास मदत करत होता. ती त्याची अगदी जवळची अशी खास मैत्रीण होती.  ती सखी म्हणजे जणू एक प्रसन्न... चिरतरुण... टवटवीत आणि आनंदी असे सतत भिरभिरणारे फुलपाखरू. त्या सखीला ना वयाचे बंधन ना काळाचे. ना व्यक्त होण्याचे बंधन ना विचारांचे. प्रसंग दुःखाचा असो वा आनंदाचा ह्या सखीचे आपले त्याच्यासोबत उत्साहात बागडणे चालूच असायचे. साधारण सहावी सातवीत असताना त्याने देखील तिच्या रंगात रंगण्याचा प्रयत्न केला होता. पण तिच्याशी मैत्री????.... पात्रता आहे का तुझी? इतकी सोपी नाही आहे तिच्याशी मैत्री!!! असे बोल त्याला सुनावले गेले आणि सखीबरोबर स्वच्छंदीपणे रमण्याच्या  त्याच्या विचारांना पूर्णविराम दिला गेला.

पण ती सखी असामन्य होती. ती अशी सहजासहजी त्याची पाठ सोडणारी नव्हती. शाळेत असताना निबंधलेखन, पत्रलेखन, वाचन यामध्ये कायम त्याच्या हातात हात घालून त्याची सोबत करायची. त्याच्या या सखी मुळेच त्याला परीक्षेत उत्तम गुण आणि स्पर्धेत बक्षिसे मिळायची.

दहावीत देखील टक्केवारी वाढण्यात ह्या सखीचा अनमोल वाटा होता. पण दहावीनंतर मात्र त्याने तिची साथ सोडली. सोडली म्हणण्यापेक्षा त्याला सोडावी लागली. कारण तिच्या सोबत रमून अर्थार्जन होणे मुश्कीलच होते. त्यामुळे त्याने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला आणि तो त्याच्या सहृदय, संवेदनशील, बहुगुणी आणि कालातीत अशा त्याच्या सखीपासून दुरावला गेला. सुरवातीला बँकेत नौकरी, सी.ए अशी मोठमोठी करिअरर्स खुणावत असल्याने सखीला गमावल्याचे त्याला काही विशेष वाटले नाही. पण जसेजसे महाविद्यालयीन शिक्षण सुरु झाले तशी त्याला वाणिज्य शाखेच्या रुक्षतेची जाणीव झाली. मग मात्र वारंवार त्या प्रफुल्लीत, उत्साही अशा सखीची आठवण होऊ लागली. खरं तर त्याच्या महाविद्यालाच्या प्राचार्यानीदेखील त्याचे आणि त्याच्या सखीचे सख्य अचूक ओळखले होते. त्यामुळे त्यांनी त्याला सखी सोबतच राहता येईल अशी शाखा निवडण्याचा सल्लाही दिला होता. पण व्यवहारी जगापुढे त्याने त्या सखीला तुच्छ लेखले आणि तिच्याशी मैत्री सहज तोडून टाकली.

नंतर हळूहळू तो वाणिज्य शाखेतील व्यावहारिक विषयांमध्ये रमला आणि बँकेत ऑफिसर होऊन त्याने स्वतःला आर्थिक दृष्टीने स्थिर केले. पण आपल्या प्रिय सखीला गमावल्याची सल त्याच्या मनात खोलवर रुजली गेली होती. पुढे यथावकाश लग्न झाले आणि त्याच्या प्रापंचिक आयुष्यास सुरवात झाली. घरसंसार...मुलंबाळे ह्यात त्याने आपल्या आयुष्यातील “सखी” च्या कप्प्याला पक्के झाकण लावून टाकले. हळूहळू सर्व काही स्थिरस्थावर झाल्यावर त्याला थोडा निवांतपणा मिळू लागला. मग त्याने ग्रंथालयाचे दार ठोठावले. पुस्तकांच्या सहवासात तो परत रमु लागला. त्याला कुठेतरी आशा होती की पुस्तकांच्या सहवासात राहिलो तर आपली ती गमावलेली सखी परत आपल्याला भेटेल. अगदी तसंच घडलं. एकदा अचानक एका लेख स्पर्धेच्या निमित्त्याने दोघांची भेट झाली. दोघे एकमेकांना कडकडून भेटले. आता दोघांनाही कुठलेच भान उरले नव्हते. त्या दोघांची भेट म्हणजे एक अनोखा सोहळा होता. त्याच्या चेहेऱ्यावरील सुरकुत्या,डोळ्यांवर चाळीशीचा चष्मा आणि शरीराचा बेढब आकार अशा वय वाढल्याच्या खुणा त्याच्या शरीरावर स्पष्ट जाणवत होत्या. पण त्याची ती सखी मात्र अजूनही अगदी उत्साही, ताजीतवानी, आनंदी आणि भरभरून गप्पा मारणारी अशीच होती. सखीशी झालेली भेट त्याच्यासाठी खूप आनंददायी ठरली. त्या भेटीने त्याचे नाव लोकांपुढे आले आणि त्यांच्या मैत्री  बद्दल त्याच्यावर खूप अभिनंदनाचा वर्षाव ही झाला. ह्या दोघांची भेट बघून त्याच्या वडिलांचे डोळे पाणावले आणि त्यांनी मुलाला बजावले कि आता त्या अनमोल अशा सखीची साथ कधीच सोडू नको. खरं तर त्याच्या वडिलांची देखील त्याच्यासारखीच एक सखी होती. पण परिस्थतीमुळे त्यांची मैत्री काही फुलू शकली नाही. आता त्याच्या मनाच्या कोपऱ्यात घट्ट बसलेलं सखी विरहाच  दुःख हलकं झालं आणि हातात हात घालून दोघे बागडू लागले. संसार मुलेबाळे ह्यापेक्षा वेगळे असे त्याचे आणि त्याच्या सखीचे नवे विश्व आकार घेऊ लागले.

त्याच्या बायकोलाही त्या सखीविषयी त्याने लग्नाआधी कल्पना दिली होती. आपल्या नवऱ्याच्या सखीबद्दलच्या भावना ती जाणून होती. त्यामुळे तिलाही त्याच्या आयुष्यात सखी परत आल्याचा आनंदच झाला. आता त्याला परत पूर्वीसारखे उत्साही वाटू लागले. आपली दैनंदिन कामे भराभर उरकवून तो तिच्या सोबत वेळ घालवू लागला. दोघेही कल्पनांचे पंख लावून विविध विषयांची सफर करायचे.  कधी कधी दोघं इतके एकमेकांमध्ये रममाण होऊन जात कि त्यांना वेळे काळाचे भानही उरत नव्हते. मग मात्र सौभाग्यवतीचे ताशेरे त्याला ऐकावे लागायचे. हल्ली तर त्याची बायको त्याच्या ह्या सखीला सवतच म्हणायची. घरातले वातावरण बिघडले कि तो काही दिवस तिच्या पासून दूर राहायचा. पण तिच्याशिवाय जगणे म्हणजे त्याला आयुष्य कंटाळवाणे वाटायचे. ती रंभा तरी कुठे त्याला स्वस्थ बसू देत होती. तिचे आपले सतत त्याच्या मागे मागे बागडणे चालूच. सतत नवनवीन विषय शोधायचे आणि मनोसक्त बोलत बसायचे. प्रसंग अगदी कोणताही असो हिची आपली त्याच्याशी बडबड बडबड चालूच. अगदी कोणी हे जग सोडून गेले म्हणून जरी तो भेटायला गेला असला तरी ही तिथेही हजर राहणार. बरं हिला कधी गांभीर्य नावाची गोष्टच माहित नाही. तिथेही हिचे आपले मुक्तपणे बागडणे चालूच. मग कुणाचे रडणे बघणार, रडण्याच्या प्रकारांवर भाष्य करणार, कोणाला खरं दुःख झाले आहे आणि कोण नाटक करतंय ह्यावर भोचकपणे बोलणार. त्यामुळे त्यालाही ती कधी गंभीर होऊ द्यायची नाही. सार्वजनिक समारंभ असो वा घरगुती कार्यक्रम असो तिची सतत त्याच्या आयुष्यात लुडबुड चालूच असायची. कधी कधी त्याचे मित्रही वैतागून त्याला म्हणायचे कि तुझे हे सखी प्रकरण जरा अतीच होतंय हं! तिच्या सोबत तू कुठेतरी हरवल्यागत असतोस. पण ती त्याची जिवलग मैत्रीण खरंचच त्याला एवढे अनुभवसंपन्न करत होती कि त्यालाही तिचा सहवास कायम हवाहवासा वाटायचा.

अशाप्रकारे तो सखीच्या सोबत सुखासीन आयुष्य जगत होता. त्याला आता जगण्यासाठी कारण मिळाले होते. त्याच्या बायकोलाही त्याचे सखी सोबत भिरभिरणे चालत होते. त्यामुळे तो आता खूप आनंदी, उत्साही आणि प्रसन्न राहू लागला. माणसाला जगण्यासाठी कारण हवे असते. ते जर त्याला मिळाले तर आयुष्य कधीच कंटाळवाणे होत नाही. त्याचे ही तसेच झाले होते.

तरीही त्याच्या ह्या सुखाला कोणाची तरी नजर लागलीच. हल्ली परत तो थोडा उदासीन वाटू लागला. त्याचे त्याच्या सखी बरोबर मुक्तपणे वावरणे कमी होऊ लागले.आला दिवस ढकलणे एवढंच त्याचे आयुष्य चालू होते. नकारार्थी विचारांनी डोक्यात थैमान घातले होते.त्याला काहीही करून ती सखी त्याच्या आयुष्यात परत हवी होती. त्याच्या सौभाग्यवतीच्या धूर्त नजरेलाही ही गोष्ट माहित होती.लक्षात आले. पण नेमकं काय बिनसले होते तेच समजत नव्हते. शेवटी न राहवून तिने त्याला त्या विषयी विचारलेच.

अतिशय खिन्नतेने त्याने बायकोला सांगितले, ”तुला खरं सांगू का माझ्या त्या सखीला सांभाळायचे म्हणजे सध्या खूप अवघड होऊन बसले होते.तिचे व्यक्त होणे फार आधुनिक झाले आहे आणि मी मात्र आहे तिथेच आहे. तिला घेऊन बागडायचे म्हणजे तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे लागेल.त्यामुळे मी हल्ली तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष्यच करत होतो. वाटले होते जाऊन जाऊन कुठे जाणार आहे...येईल परत आपोआप. पण आता कितीतरी दिवस झाले ती माझ्याकडे फिरकायला तयारच नाही. तुला अगदी प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही सर्व माझ्या आयुष्यात माझ्यासाठी महत्वाचे आहातच; पण ती म्हणजे माझं अस्तित्व,माझा श्वास, माझं विश्व, माझं सर्वकाही होती. ती माझ्याशी बोलतच नाहीये म्हटल्यावर काय करावे तेच समजत नाहीये. ती कायमची तर सोडून गेली नसेल ना मला ....अशा विचारांनी मी खूप अस्वस्थ आहे.

त्याच्या बायकोला त्याची खिन्न अवस्था बघवत नव्हती. मग तिनेच त्याला सांगितले कि तुम्ही बोलावूनही जर ती येत नसेल तर तिला एकदा पत्र लिहून बघा.

बायकोची ही कल्पना त्यालाही आवडली आणि विरहाने व्याकूळ होत त्याने सखीला पत्र लिहावयास घेतले.

माझी प्रिय जिवलग सखी प्रतिभा, 

तू माझ्याशी बोलणे बंद केल्यापासून मी पार उध्वस्त झालो आहे. माझं जगणं निरस झाले आहे. तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. मला माहित आहे कि मी तुला खूप गृहीत धरू लागलो होतो. मला वाटायचे कि ही काय नुसती रिकामटेकडी!!! सतत आपले ह्या विषयावरून त्या विषयावर हुंदडणे चालू. लहानपणी तुला जाणले नाही आणि मोठं झाल्यावर करिअरच्या नावाखाली तुझा नाद सहज सोडून दिला. तरीही तू माझी साथ सोडली नाहीस. माझ्या आयुष्याच्या मध्यावर परत आपण बहरू लागलो होतो. तुझ्याशी जोडलो गेल्याने माझ्या बेचव आयुष्यात रंगांची उधळण सुरु झाली आणि ह्याचसाठी केला होता सारा अटटाहास असे वाटू लागले होते. खरं तर तशी तू सर्वांबरोबर असतेस.ज्याला तू गवसतेस,त्याच्या जगण्याचे सार्थक होत असते.पण फार थोड्या लोकांना ह्याची जाणीव असते. पण माझ्या वडिलांच्या कृपेमुळे म्हणा किंवा त्याच्या सुप्त इच्छेमुळे म्हणा माझी तुझी अगदी सहजच दोस्ती झाली. वडील गेल्यानंतर मला अगदी एकटे पडल्यासारखे वाटत होते, तेंव्हाही तूच माझ्या सोबत होतीस. तू मला समजावले होतेस कि वडिलांचेही तुझ्यावर खुप प्रेम होते. तू माझी साथ कधीच सोडू नकोस म्हणजे वडिलांबरोबर असल्याचे समाधान तुला कायम मिळेल.

पण तरीही आज आपण बोलत नाही आहोत. पण तुला खरं सांगू का? तुझे हे आधुनिक रूप काही मला फारसे रुचले नाही. तुझ्याशी संबंध टिकवायचे म्हणजे मराठी टायपिंग शिका,फेसबुक, ब्लॉग, ई-मेल, ई-पुस्तके ह्या सर्वांशी मैत्री करा हे माझ्यासाठी खूप अवघड होते. आधी आपल्या मैत्रीला कागद पेन पुरायचा; पण आता तुझे व्यक्त होणे खूप आधुनिक झाले आहे. त्यामुळेच आपल्या मैत्रीत खूप तफावत आली .

पण आता जेव्हा तू अजिबातच भेटायला तयार नाहीस तेव्हा मात्र मला खऱ्या अर्थाने तुझी जाणीव झाली आणि तुझे महत्व ही समजले. त्यामुळे फक्त तुझ्यासाठी आता मी आधुनिक होणार आहे. कारण तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. नुकतेच मी माझ्या संगणकावर मराठी सॉंफ्टवेअर घेतले आहे. आज हे पत्र जरी मी कागद पेन घेऊन लिहिले असले तरीही तुला पाठवताना मराठीत टायपिंग करून तुला ई-मेल करेन, माझ्या ब्लॉगवरही टाकेन आणि फेसबुक वर ही शेअर करेन.

आज तुला मी अगदी मनापासून कळकळीची विनंती करतो कि माझ्या वर अशी नाराज होऊ नकोस. तू लगेचच माझ्या आयुष्यात परत ये.

तुझी मनापासून वाट पाहणारा तुझा,

सखा. 

अश्या प्रकारे त्याने त्याच्या प्राणप्रिय सखीला...त्याच्यातल्या रुसलेल्या प्रतिभा शक्तीला....सृजनशीलतेला....मनापासून साद घातली आणि तिला आपल्या आयुष्यात परत आणले. आता लवकरच त्यांचे हे सख्य जगजाहीर होऊन साहित्य क्षेत्रात काहीतरी चमत्कार घडेल हे निश्चित. अशी ही वयापलीकडची, कालातीत सखी म्हणजेच प्रतिभाशक्ती किंवा सृजनशीलता ही आपल्या सर्वांकडेच नक्कीच असते, फक्त आपण तिला ओळखायला हवे. मग प्रत्येकाचे जगणे हे फक्त जगणं नसणार ....तर एक महोत्सव असेल.  

मंजुषा देशपांडे

Thursday, 17 January 2019

Uri: The Surgical Strike


'उरी' चित्रपट पाहिला आणि त्या विषयी लिहावे असे मनापासून वाटले. कोणताही खरा देशाभिमानी ह्या चित्रपटावर आक्षेप घेऊ शकणार नाही किंवा काही टीका करू शकणार नाही.
सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना पाहून आपल्यालाही स्फुरण चढते. हा तर एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे.
आपण आपल्या सुखासीन आयुष्यात जगताना लष्करात भरती होणाऱ्या जवानांच्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही हे मला खूप तीव्रतेने जाणवले. 
चित्रपट बघत असताना मला तो दहशतवादी हल्ला, त्यात निशस्त्र सैनिकांचे मारले जाणे हे बघवले देखील जात नव्हते. ते प्रत्यक्ष अनुभवताना सैनिकांची काय अवस्था
झाली असेल हा विचारांनी मी खूप अस्वस्थ झाले. त्यांचे खाजगी वैयक्तिक आयुष्य पाहून तर मला माझ्या कम्फर्ट झोन ची लाज वाटली.
आत्तापर्यंत मला स्वतःचे खूप कौतुक होते की, मी समाजासाठी काहीतरी करते. पण या चित्रपटाने मला ताळ्यावर आणले आणि मी करत असलेलं काम किती क्षुल्लक आहे याची जाणीव मला प्रथमच झाली. 
महत्त्वाचं म्हणजे काश्मीरमधील सैनिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने जे प्रत्युत्तर दिले, ते आजवर स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्याला जमले नव्हते. ते पाहून देशाभिमान तर जागृत होतोच पण भारताला एक करारी, स्वाभिमानी, धाडसी, कर्तुत्ववान आणि माणुसकीची जाण असलेले व्यक्तिमत्व पंतप्रधान म्हणून लाभले याचा मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो.  मोदींना फक्त बीजेपीच्या चष्म्यातून बघणे बंद केले पाहिजे. बीजेपी हे एक त्यांना पंतप्रधानपद बहाल करणारे साधन आहे. बरीचशी जनता त्या साधना वरच लक्ष ठेवून आहेत. पण या निधड्या छातीच्या माणसाकडे व्यक्ती म्हणून  डोळसपणे बघण्याची गरज आहे. 
शिवाय आपल्या लष्करी जवानांची  ताकद आणि त्यांची देशाप्रती असलेली  निष्ठा मी अनुभवली. 
त्यांचं स्वतःला झोकून देणे, जीवाची आणि कुटुंबियांची पर्वा न करता फक्त देशासाठी लढणे आणि समर्पण म्हणजे काय हे त्या सैनिकांकडे बघून कळते. शत्रूच्या गोटात स्वतः घुसायचे आहे; तिथून जिवंत परतणार कि नाही याची काहीही शाश्वती नाही तरीही मोठ्या उत्साहात आणि धैर्याने लढायला तयार!! कुठून येते धाडस त्यांच्या अंगात? 
पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून आपल्या जवानांनी जे शौर्य गाजवले ते प्रत्येकाने नक्कीच बघितले पाहिजे.  प्रखर बुद्धिमत्ता, निर्णय घेण्याची आणि तो निभवण्याची क्षमता असलेले नेतृत्व लाभले की जिंकण्याची उमेद, उत्साह आणि देशाप्रतीचा अभिमान कसा उत्पन्न होतो याची झलक या चित्रपटात पहायला मिळते.
कोणी यावर टीका करेल की आता निवडणुका जवळ आल्या म्हणून असे चित्रपट दाखवले जात आहेत. पण आजपर्यंत असा स्वाभिमान जागृत होईल असे काही घडले आहे का? असले तरी ते दाखवणारा कोणी मज्जाव केला होता का?
आणि ज्यांच्यामुळे हे घडले त्यांनी ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे चुकीचे आहे का? 
मी काही राजकारणी व्यक्ती नाही कोणत्याही पक्षाची पुरस्कर्ती नाही. पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. 
पूर्ण चित्रपट बघताना टाळ्यांचा गडगडाट, भारतमाता की जय अशा घोषणांनी चित्रपटगृह दणाणून गेले होते. सर्वसामान्यांमध्ये देशाभिमान जागृत करण्याची क्षमता या चित्रपटात आहे.
याचे श्रेय या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला तर आहेच पण हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे हे विसरून चालणार नाही. संगीत, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी सगळ्याच बाबतीत हा चित्रपट खूप उजवा आहे.
विकी कौशल ने मेजर विहान ची प्रमुख भूमिका ज्या प्रकारे साकारली आहे त्याला तोडच नाही.
आज मला अभिमान वाटतो की मी भारतीय आहे आणि एक कणखर  नेतृत्वाची भक्कम फळी आपले संरक्षण करत आहे. 
आता उर्वरित आयुष्यात सैनिकांसाठी जे काय करता येईल ते करायचे असा निश्चय मी केला आहे.

_मंजुषा देशपांडे, पूणे.

Tuesday, 1 January 2019

संकल्पांचे घोडे

१ जानेवारी जशी जशी जवळ येऊ लागते तसे मला संकल्पांचे वेध लागतात. आता ह्या नवीन वर्षात आपण कोणकोणत्या संकल्पांच्या घोड्यांना गंगेत न्हाऊ घालायचे ह्यावर माझे विचार मंथन सुरू झाले.

पण यावेळी अजबच घडले. माझ्या संकल्पांचा एकही घोडा पुढे येत नव्हता. सगळे एकी करून माझ्यावर जणू रुसून बसले होते.
पण नवीन वर्ष सुरु होणार असल्याने माझ्या अंगातला उत्साह ओसंडून वाहत होता.
त्यामुळे मी काही माझ्या संकल्पांच्या घोड्यांना शांत बसू देणार नव्हते.
एकेका घोड्याला जाब विचारायचे ठरवले. पहिला संकल्पाचा घोडा दरवर्षीप्रमाणे अर्थातच वजन कमी करणारा होता. त्याने मला निरखून पाहिले आणि स्पष्टपणे सुनावले," काय कमाल बाई आहे तू !!! दरवर्षी वजन कमी करण्याचे ठरवते आणि दरवर्षी वाढतच जात आहे. तरीही निर्लज्जपणे परत माझ्या मागे येते.
ते काही नाही. आता नवीन वर्ष येवो अथवा आणखीन काहीही येवो मी काही हलणार नाही"
मला तर त्याच्या स्पष्ट बोलण्याचा रागच आला आणि गेला उडत म्हणत मी माझा मोर्चा दुसऱ्या घोड्याकडे नेला.
हा संकल्पचा घोडा होता माझ्या लिखाणाचा. रोज काहीतरी लिहायचेच संकल्प दरवर्षी घेत असते. त्यात मागील वर्षी तर ब्लॉगवरही जाहीर केले की दर महिन्याला आता वेगवेगळ्या विषयावर लिहिणार!!! अर्थातच तेही मी साध्य केले नाही. माझ्या ह्या  खोट्या आश्वासनांना मुळीच बळी पडायचे नाही असा ठाम निश्चय सर्वच संकल्पांच्या घोड्यांनी केला असल्यामुळे माझ्या लिखाणाच्या घोडाही ढीम्म बसला होता. मी त्याला ओंजारले, गोंजारले पण काहीही उपयोग झाला नाही. तो मला म्हणाला," तुला एवढेच लिहावेसे वाटते ना, मग थेट लिही की. कशाला उगाच सर्वांनी समक्ष आमचे प्रदर्शन मांडतेस! तू तर आम्हाला पुढे करून मोकळी होतेस. नंतर आमच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीस.खरं सांगायचे तर तुला संकल्पांची ऐशी कि तैशी करून मी जैशी थी रहाण्यात जे भूषण वाटते ना त्याचे आम्हालावाईट वातेय."  त्याला पुष्कळ मनवले; पण त्याने काही भीक घातली नाही.
परंतु मी काही पटकन हार मारणारी नव्हती. त्यामुळे माझ्या संकल्पाच्या तिसऱ्या घोड्याकडे गेले. तो तर अगदी निराश होऊन मान खाली घालून बसला होता. हा घोडा होता फाडफाड इंग्रजी बोलणे शिकण्याचा! त्याची अवस्था इतर घोड्यां पेक्षा वेगळी नव्हती. उलट बाकी घोड्यांना मार्च महिन्यापर्यंत तरी उधळायचे; पण इंग्रजीचे घोडं मात्र कधी १ जानेवारी च्या पुढे गेलेच नाही. त्यामुळे ह्या घोड्याला पुढे दामटणे खूप अवघड आहे याची जाणीव होऊन त्याचा नाद मी सोडून दिला.
शेवटी अगदी साध्या सरळ अशा संकल्पाच्या घोड्याकडे गेले. तो घोडा होता रोजनिशी लिहिण्याचा. मला बघताच पुढे काय घडणार याचा त्याला बहुदा अंदाज आला असावा. त्याने लगेच जुन्या सर्व कोर्‍या करकरीत रोजनिशी माझ्यासमोर आणून आदळल्या. हया कृतीतून त्याला काय सुचवायचे आहे हे मी मनोमन समजले. मुकाटपणे सर्व रोजनिशी उचलून काढता पाय घेतला.
पण माझ्याकडे संकल्पांच्या घोड्यांची काही कमतरता नव्हती.
त्यामुळे मी पुढच्या म्हणजे सोशल मीडियाशी मैत्री करण्याच्या घोड्याकडे गेले. त्या घोड्याचे माझ्या आयुष्यात येणे तसे नवीन असल्याने त्याला माझ्या कर्तृत्वाची फरशी कल्पना नव्हती. पण मागील वर्षभरात काय दिवे लावले हे त्याने प्रत्यक्ष अनुभवले होते. परंतु अनुभव नवीनच असल्यामुळे तो मला समजुतीच्या स्वरात म्हणाला," तुला खरं सांगू का आमच्या घोड्यांच्या जातीला नेहमी उधळत राहायला आवडतं. तू मात्र आम्हाला संकल्पांचे लगाम घालून बांधून ठेवतेस. आमची घोडदौड रोखण्याचा तुला काय अधिकार आहे? तुला दरवर्षी जानेवारी महिन्यात आमची आठवण येते. फार फार तर फेब्रुवारी मार्च पर्यंत आमची आठवण ठेवतेस. नंतर मात्र तुम्ही कोण आणि मी कोण अशी अनोळखी आम्हाला होतेस. सोशल मीडियाशी मैत्री तर दूरच पण तू तर अगदी शत्रू असल्यासारखी वागतेस.त्यामुळेच आम्ही सर्व संकल्पांच्या घोड्यांनी असहकार पुकारला आहे. आम्ही तुझ्यासोबत कोणताही संकल्प पूर्ण करण्यास बांधील नाही. आता आम्हाला आमची शोभा करून घेण्याची लाज वाटते."
आता मात्र माझा नाईलाज झाला. तसे मी नवीन संकल्प हाती घेऊन चांगल्या टवटवीत, तरण्याताठ्या घोड्यांना संकल्पांच्या गंगेत न्हाऊ घातला असतं. पण हे जुने घोडे कायम मनाला बोचणी देत राहिले असते.
शेवटी ठरवले की यावर्षी एकही घोडा संकल्पाच्या गंगेत न्हाऊ घालायचा नाही. त्यांना जिथे घौडदौड करायची तिथे करू दे.
त्यामुळे खूप वर्षांनी असे नवीन वर्ष माझ्या आयुष्यात आले आहे की मी एकही संकल्प हाती घेणार नाही. या गोष्टीचे वाईट वाटतं खरं! पण दुःखात सुख असे की दरवर्षी संकल्प पूर्ण न करू शकल्याने येणाऱ्या अपराधीपणाच्या भावनेतून  मुक्ती मिळाली. कुठला ध्यास नाही, हव्यास नाही, काहीही साध्य करायचे नाही म्हणजे मोक्ष मार्गाकडे वाटचाल सुरू झाली म्हणायची.
-मंजुषा देशपांडे (पुणे)