तो माझ्यावर खूप चिडला होता. रागारागात बडबडत होता," काय ग हे? किती वेळा तुला तुझ्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची जाणीव करून दिली, पण तुझ्यात काही फरकच नाही.”
ए, असे नको ना बोलू, तुझ्याशिवाय माझे अस्तित्वच नाही रे... असं रागावू नकोस ना!! मी त्याची समजूत घालण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते.
अर्थात त्याचे रागावणे स्वाभाविकच होते. मी माझ्या धुंदीत जगत होते. संसारामध्ये मी स्वतःला इतके गुंतवून घेतले होते की त्याच्याशी काही संबंध नसल्यासारखेच वागत होते. त्याची बडबड मला वेळोवळी जाणीव करून द्यायची की तू चुकीचे वागत आहेस. अजूनही भानावर ये. मीच तुझी खरी काळजी घेणारा आहे, असे दुर्लक्षित करू नकोस.
पण मी नेहमी प्रमाणे दुर्लक्षच केले.
पण त्या दिवशी अशी काही घटना घडली की मी खडबडून जागी झाले आणि मला त्याच्या उपदेशाचे शब्दन् शब्द आठवत होते.
असे नक्की काय झाले होते..... अचानक माझी तब्येत बिघडली. हृदयातील धडधड वाढली आणि ती काही केल्या थांबेना. त्यामुळे थेट दवाखान्यात भरती व्हावे लागले.
वयानुसार धडधडीचे अर्थ कसे बदलत जातात ना? तरुण वयात ” घडी घडी मोरा दिल धडके, क्यू धडके” याचा अर्थ गुलाबी दिवस, प्रेम,आनंद, सुख याची अनुभूती, या धडधडीत असते. थोडक्यात काय सर्व सकारात्मक भावना.
पण चाळिशीनंतरची धडधड मात्र “घडी घडी मोरा दिल धडके ,क्यू धडके” याचा अर्थ शोधायला आयसीयूत नेऊन ठेवते याचे प्रत्यंतर मी घेतले. या धडधडीत हवेत तरंगण्याची ऐवजी कृत्रिम हवा घ्यावी लागली. कारण दरदरून घाम फुटला आणि अंगातले त्राण गेले.
वेळेवर माझी भाची डॉक्टर प्रियंकाने प्रसंगावधान दाखवून ताबडतोब दवाखान्यात दाखल केले. काय घडते हे कळेपर्यंत मी स्वतःला आयसीयूमध्ये पाहिले.
तिथे मात्र “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा” याची जाणीव झाली. आपण इतके असहाय्य असतो की जे घडतेय ते स्वीकारण्या पलीकडे काही उरत नाही. वेगवेगळ्या चाचण्या, सलाईन, ऑक्सिजन, डॉक्टरांची धावपळ हे सर्व मी उघड्या डोळ्यांनी पहात होते.
बऱ्याच वेळानंतर माझ्या हृदयाची धडधड पूर्ववत झाली. पतीच्या आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा ताण बघून माझ्या मनात कालवाकालव झाली. अन मला त्याची आठवण झाली. पाहते तर काय तो माझी मजा बघत होता. माझ्या डोळ्यांतून सतत पाणी वाहत होते. माझी असहाय्यता मला सहन होत नव्हती. का नाही त्याचे ऐकले? तो कितीतरी वेळा मला धोक्याची जाणीव करून देत होता..... पण मी का दुर्लक्ष केले? का स्वतःला इतके गुरफटून घेतले? मला काहीच सुचत नव्हतं. आपण त्याच्याशी किती बेपर्वाईने वागलो ह्याची जाणीव मनाला अस्वस्थ करत होती. डॉक्टरांनी सांगितले की कोणताही ताण घेऊ नका, एकदम आराम करा. बोलणे, चालणे, दगदग सर्वकाही बंद. सक्तीची विश्रांती घेणे भाग होते. पण हे रिकामपण मला काहीच सुचू देत नव्हते. आयुष्याची गती अचानकपणे मंदावल्याने मन खूप विषण्ण झाले होते. एका वेगळ्या प्रकारची भयाण शांतता मी अनुभवत होते. सतत भावनाविवश होऊन रडू यायचे. मन तर खूपच कमकुवत झाले होते. मला स्वतःला तर त्रास होतच होता; पण आपल्यामुळे साऱ्या कुटुंबीयांवर ताण येतोय आणि त्यांनाही खूप त्रास होतोय हे पाहून जास्त वाईट वाटले. काय अधिकार आहे मला माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माणसांना त्रास देण्याचा? निव्वळ स्वतःकडे झालेले दुर्लक्ष खूप महागात पडले.
पण वाईटातून चांगले म्हणतात ते असे की माझ्या प्रेमाच्या माणसांच्या आग्रहाखातर आमच्या कामवाल्या बाईने माझी दृष्ट काढली. म्हणजे आपण अजूनही दृष्ट लागण्याइतपत सुंदर आहोत त्याचे वेगळेच अप्रूप वाटले. अशा वेळी मात्र कटाक्षाने स्वतःला आरशात बघणे टाळले. दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एरव्ही फारसे व्यक्त न होणाऱ्या नवर्याच्या भरभरून प्रेमाची अनुभूती मला या दुखण्याने दिली. आजवर त्यांचे भरपूर गाण्यांचे कार्यक्रम झाले आहेत. पण आयुष्यात पहिल्यांदा भर कार्यक्रमात " फूलों के रंग से
दिल की कलम से....लेना होगा जनम हमे कई कई बार " हे गाणे चक्क मला अर्पण केले. आता तर हे गाणं फक्त माझं आहे आणि माझ्या ह्रदयावर कायमचे कोरले गेले आहे. एवढ्यात त्यांना खुप वेळा भावनाविवश होताना पाहून मला स्वतःची किती काळजी घ्यायला हवी याची चांगली जाणीव झाली.
गरमागरम आयते जेवण, जेवण करून हात धुवून आडवे होणे, गाणे ऐकणे, वाचन करणे वगैरे वगैरे अगदी स्वर्गीय सुख. जीवलग मैत्रिणीने, अंजूने तर तिचा किमती टॅबच माझ्याकडे सोपवला. त्यावर मस्तपैकी मालिका, चित्रपट बघत आनंद लुटला. किती सहजतेने एवढी किमती वस्तू माझ्या ताब्यात दिली. तसेच मितू , तू मलेशियाहून फोनवर बोलून जो काही मला आधार दिलास ना, त्या वर मी शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. बरं हे सर्व एवढे आपले आहेत ना की या सर्वांचे आभार मानण्यापेक्षा माझ्या या सर्व (नवरा, मुले, सून, बहिण, भाऊ, भावजया, भाचे कंपनी आणि माझ्या सख्या) प्रियजनांना परत कोणालाही त्रास होऊ नये म्हणून मी तब्येतीची काळजी नक्कीच घेईन असे आश्वासन देते.अशा सर्वांच्या शुभेच्छांनी आणि प्रेमाच्या वर्षावाने मी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सावरत होते. पण मनातल्या मनात कुठेतरी कुढणं चालूच होतं. खूप उहापोह झाल्यावर एक गोष्ट लक्षात आली की आपण दुनियेला माफ करतो. पण स्वतःच्या चुकांच्या बाबतीत मात्र," चुकीला माफी नाही" या अविर्भावात स्वतःला माफ करायला कधी तयारच होत नाही. मी असं का नाही केलं, मी तसं काही नाही केलं, मी का शिस्तबद्ध नाही, मी का स्वतःला वेळ दिला नाही, मी का त्याचे ऐकले नाही वगैरे वगैरे.... बाप रेे!!! स्वतःवर आरोपांच्या फैरी झाडत होते. शारीरिक तासापेक्षा हा त्रास जास्त होत होता. माझे जवळचे असे सर्व लोक खूप समजावत होते. पण मनातली खळबळ काही केल्या कमी होत नव्हती.
मग विचार केला की आपण तर इतरांना मोठ्या मनाने लगेच माफ करतो. मग स्वतःच्याच बाबतीत एवढा कठोरपणा का? आधी स्वतःच्या चुकांना माफ केले. स्वतःला खऱ्या अर्थाने जशी आहे तसे स्वीकारले. मग मात्र खूप हलके वाटू लागले. मग मन "I is" म्हणजे मी आहे चा खरा आनंद घेऊ लागले.
मला वपु काळे यांच्या कथेतील “I is" म्हणजे "मी आहे" हा शब्द खुप आवडला. खरं तर वपूंनी " I is" हा शब्द खूप गमतीने वापरला असला तरी मला तू खूप आपलासा वाटला. आय सी यु मधून सुखरूप बाहेर आल्यावर आपण अजूनही पृथ्वीतलावर अस्तित्वात आहोत ही जाणीव सुखकारक होती. डॉक्टरांनी, " आता तुम्ही सुखरूप आहात पण काळजी घ्या" हे मला सांगता क्षणी मला जोरात ओरडावेसे वाटले, "येस, I is".
सभोवताली माझी माणसं पाहिली आणि खात्री झाली की I is.
नंतर माझे घर, माझा फोन, माझे व्हाट्सअप, माझे फेसबुक आणि माझे नातलग, जिवलग सख्या पाहून मी मनातल्या मनातच खुश होत म्हंटले, Yes, I is.
स्वतःला अचानक उद्भभवलेल्या दुखण्यातून सुखरूप बाहेर आलेले पाहून, " एकाच ह्या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी" असच जगायच असे आता ठरवून टाकले.
कारण आयुष्यात आपण खूप काही करायचे ठरवत असतं. पण पुष्कळदा त्यासाठी वेळ काढला जात नाही. मी देखील माधुरी दीक्षितचा चित्रपट पाहून माझी " बकेट लिस्ट" बनवून ठेवली आहे. पुढे वेळ मिळाल्यावर नक्की पूर्ण करू असे मी ठरवले होते. पण माझी वेळ संपते की काय अशी माझी अवस्था झाली होती. पण नाही, मला परत संधी मिळाली आहे आणि आता या संधीचा उपयोग जर मी केला नाही तर माझ्यासारखी मुर्ख मीच असेल त्याची मला पक्की जाणीव झाली आहे.
यासाठी त्याच्याशी दिलजमाई होणे गरजेचे होते. डॉक्टरांनी प्राणायाम व व्यायाम सर्व बंद सांगितले होते. त्यातल्या त्यात ध्यान धारणा करण्यास परवानगी होती. मग काय ध्यान करून शांतपणे त्याच्याशी बोलते झाले. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचा त्याला भयानक राग आला होता.
पण प्रत्येक ध्यानानंतर त्याच्याशी संपर्क साधत एकदाचा सुसंवाद साधला. आता पक्के ठरवले ती काहीही झाले तरी त्याचे ऐकायचे. तो झोप म्हटलं की झोपायचे. उठ म्हटला की उठायचे, व्यायाम करायला लावला तर मुकाट्याने व्यायाम करायचा आगाऊपणा बंद. शहाणपणा करायचा नाही.
कारण मी त्याच्याशी म्हणजेच "माझ्या आतल्या आवाजाशी" प्रामाणिक राहिले तरच लौकिक आणि पारलौकिक जगात " I is " च्या अवस्थेत चिरतरुण राहील. हे कायम लक्षात राहण्यासाठी आपणा सर्वांच्या साक्षाने हे लिहून ठेवले.
@ मंजुषा देशपांडे, पुणे.
खरंच खूप छान
ReplyDeleteमस्त लिहीलंय
ReplyDeleteKhupach Chan Manju
ReplyDeleteNicely written... It's the inner thoughts penned down...baswd on fact..it proves that you are now recovering speedily with the grace of guru and blessings, best wishes of all...
ReplyDeleteVery good writeup....keep it up..
खरच ..किती छान आनंदी आयुष्याची व्याख्या...I is..
ReplyDeleteखूपच छान.आजच्या धकाधकीच्या जीवनात खास करून स्त्रीया संसारात/जबाबदारी मध्ये इतक्या मग्न होतात की,स्वत:च्या आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत,त्यांच्या साठी नक्कीच प्रेरणादायी अशी"I is" आहे.आवडली.
ReplyDeleteAn amazing post! Keep it up. I like how you use the personification of your feelings and inner self. I'll look forward to read your next post as well. Keep it up.
ReplyDeleteWaah vahini khupach chaan. .agadi hrudaya paryant poohochala
ReplyDeleteVery Nice.खुप सुंदर
ReplyDeleteखूपछान आहे पण जाणीव पण आहे आपण खरंचखूप दुर्लक्ष करतो
ReplyDeleteEkdum surrekh maushii😊👍❤️
ReplyDeleteकिती अप्रतिम लिखाण आहे. साधारण पणे प्रत्येक स्त्री चे विश्व असेच दिसून येते. मस्तच.
ReplyDeleteधन्यवाद
DeleteKhup chan wyakta kelas Maushi...😘😘👌👌👌
ReplyDelete"Realisation of something whether it is good or bad will always make us strong"
Really very proud of you Ya incident nantar 1 vegli ani navinch maushi bghyala milte ahe mala, ata matra fakt ani fakt swatahakde laksha de fit ani fine raha stress free raha ani ho ashich fighting spirit dakhav, me nehemi tuzya sobat asnar ahe 🤘🤘 ❤❤
Thanks a lot dear..speechless
Deleteबापरे.. एवढ्या सुंदर शब्दात तू असा काही अनुभव देतेस ना आत्या. तुझ्या शब्दात मन कुठेतरी स्वतःला शोधता..जादू च आहे तुझ्या व्यक्त होण्यात पण😅
ReplyDelete