लेख मंजुषा

Happy Anniversary “हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?” ती लगेच म्ह...

Monday, 4 June 2018

अपेक्षा तेथे.....

  अपेक्षा तेथे परम दुःख म्हणतात. पण नातेसंबंधांच्या बाबतीत अयोग्य अपेक्षा तेथे परम दुःख असा अनुभव येतो. आयुष्यात अनेक व्यक्ती भेटत असतात. प्रत्येक व्यक्ती विषयी आपण आपली एक समजूत करून घेतो. त्या व्यक्तीविषयी आलेल्या अनुभवातून, तिच्या स्वभावाला बघून आणि कधीकधी आपल्या जुन्या अनुभवांतून त्या व्यक्तीविषयी विशिष्ट अशी प्रतिमा पक्की करतो. त्या प्रतिमेच्या चौकटीतून त्या व्यक्तीला कायम बघत असतो. उदाहरणार्थ आपली एखादी मैत्रीण खूप चांगली, जीवास जीव देणारी असली की आपण दुसरी एखादी मैत्रीण थोडीफार चांगली वाटली की लगेच आपण तिला जिवलग मैत्रिणी सारखे समजू लागतो. पण कधीकधी अचानक त्या व्यक्तीविषयी वेगळे अनुभव येतात. ते आपल्या चौकटीत अजिबातच बसत नाहीत. मग आपण त्या व्यक्तीला दोष देतो. आपल्याला वाटते अरे ही व्यक्ती अशी आहे??? ही व्यक्ती माझ्याशी अशी का वागली?? पण ह्या विचारांमागे नकळत त्या व्यक्तीने असंच वागलं पाहिजे असा आग्रह धरतो. म्हणजे कुठेतरी त्या व्यक्तीला गृहीत धरतो. वास्तविक चुक त्या व्यक्तीची नसते. तर आपण बांधलेल्या चौकटीत आपण तिला बंदिस्त करायला जातो. त्यामुळे ती व्यक्ती त्या चौकटीत बसणारच नसते. अशावेळी आपल्या कुठल्या प्रतिमेच्या चौकटीची त्वरित डागडुजी केली तर (म्हणजेच ती व्यक्ती अशीसुद्धा आहे हे पटकन मान्य करणे) होणारा त्रास नक्कीच कमी होतो. या दुनियेत कोणीच आपल्याला सुखी किंवा दुःखी करू शकत नाही. त्यामुळे ज्यावेळी आपण सुखात असतो तेव्हा त्याला जबाबदार आपण असतो आणि दुःखात असतो त्यालाही जबाबदार आपणच असतो. जास्तीत जास्त सुखात राहण्यासाठी योग्य अपेक्षा ठेवण्याचा अभ्यास केला पाहिजे. एखाद्या विषयी चुकीचा अनुभव आला तर आपल्या त्या व्यक्तीच्या बद्दल असलेल्या अपेक्षांमध्ये सुधारणा केली तर कोणत्याही व्यक्तीमुळे आपण दुखावले जाणार नाही. तसेच नातेसंबंध दृढ होण्यास नक्कीच मदत होईल. मग मात्र योग्य अपेक्षा तेथे परमसुखाचा अनुभव येईल.
                                  @ मंजुषा देशपांडे, पुणे.

Monday, 26 March 2018

दुःखाची परिसीमा


आज परत खूप दिवसांनी ब्लॉग ला भेट देत आहे. खरं तर लिहिण्यासारखे बरंच काही होते. पण मध्यंतरी अशी काही घटना घडली की त्यातून सावरणे अशक्य झाले आहे. माझी खूप जवळची मैत्रीण, माझी खरी सोबतीण, माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असलेली माझी सखी  अचानक हे जग सोडून गेली. ९ फेब्रुवारी २०१८ हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. समर्थ रामदास स्वामींंच्या भक्त असलेल्या  माझ्या ह्या  जिवलग मैत्रिणीने दासनवमीच्या दिवशीच ह्या  जगाचा निरोप घेतला. मी मात्र अगदी हताश होऊन तिची मृत्यूशी चाललेली झुंज बघत होते. ही घटना मनाला हादरून टाकणारी तर होतीच पण म्रुत्यु आला की आपण किती हतबल होतो ह्याचा प्रत्यक्ष अनुभव देणारी होती. तिचे असे संसार अर्धवट सोडून जाणे अनेक प्रश्न निर्माण करून गेले.
वास्तविक माझी ही मैत्रीण,मोहिनी म्हणजे अत्यंत साधं सरळ, निरागस, प्रेमळ आणि भाबडं व्यक्तिमत्त्व. प्राथमिक शाळेपासून तर महाविद्यालयीन शिक्षण आणि आजपर्यंतचा आमच्या मैत्रीचा प्रवास अविस्मरणीय असा आहे. लहानपणी आम्ही एकत्र खेळलो, बागडलो. आमची कट्टी देखील मजेदार असायची. कट्टी असताना देखील ती मला शाळेसाठी बोलवायला यायची. फक्त पूर्ण रस्ताभर आम्ही एकही शब्द बोलायचो नाही. असे फारतर दोन दिवस चालायचे मग दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडून मनोसक्त रडायचो आणि आमची बट्टी व्हायची. आमच्या मैत्रीच्या आड कधीच आमची आर्थिक, कौटुंबिक किंवा सामाजिक परिस्थिती आली नाही. आमच्यात  कधीही वाद अथवा भांडण झालेले नाही. अर्थात ह्या गोष्टीचे संपूर्ण श्रेय मोहिनीलाच आहे. कारण तिला कधीच कोणाशीही अबोला धरणे जमलेच नाही. अशी आमच्या अनोख्या मैत्रीने लग्नानंतर ही आम्हाला एकत्र ठेवले होते. कारण मी पुण्यात आल्यावर वर्षांत ती पण आली आणि ते ही माझ्या घराजवळ. मग काय पुण्यातील कोपरा न कोपरा आम्ही तिच्या दुचाकीवर पालथा घातला. गाडीवर तर गप्पांच्या ओघात खुपदा आम्ही भलतीकडेच निघून जायचो. तसेच लिफ्टमध्ये जायचे आणि बटण चालू करायला विसरून जायचो. अशा ह्या निखळ मैत्रीच्या आड तिचे आजारपण आले आणि ती मला कायमची सोडून गेली. ती माझ्या सोबत नाही हे मला अजूनही पचनी पडत नाहीये.आता असे वाटते
 की ह्याहून वाईट आयुष्यात काय घडू शकते? आई वडील, बहिण, एकुलता एक मुलगा आणि आपल्या जीवापलिकडे जपलेल्या मैत्रीला अर्धवट सोडून जाताना तिच्या आत्म्याला ही खुप क्लेश झाले असतील. पण तिच्या म्रुत्युच्या आड तिची पुण्याई तिच्या आई वडिलांची पुण्याई, तिच्या मुलाचे अगाध प्रेम हे काहीच  का येऊ नाही? आमची सर्वांची प्रार्थना, श्रध्दा व्यर्थ ठरवत तिला ह्या जगाचा निरोप घ्यावा लागला. उत्साही असणाऱ्या ह्या मुलीला अशा रितीने हे जग सोडून जावे लागणे हे मनाला अजूनही पटतच नाहिये. मान्य आहे की जीवन मरण आपल्या हातात नसते. पण म्हणतात ना की चांगले कर्म केले तर शेवट चांगला होतो. मग तिच्या सर्व इच्छा अपूर्ण ठेवून तिच्या अंत त्रासदायक का व्हावा हे मला अजूनही उमगत नाही. कारण मेंदूतील गाठींंमुळे ती बेशुद्ध झाली. शरीर उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. शेवटी डॉक्टरांनी क्रुत्रीम श्वास थांबवायचा निर्णय घ्यायला लावला. वाटले आता संपले सर्व. पण बेशुद्ध अवस्थेतच ती धाप लागल्या प्रमाणे जोरात श्वास घेऊ लागली. तिचा श्वास थांबण्याऐवजी जोरजोरात सुरू झाला. परत आशा निर्माण झाली. पण डॉक्टरांनी सांगितले की असे होते आणि श्वास थांबतो. पण आम्हाला तिची ही अवस्था बघवत नव्हती. शेवटी तिच्या कोणाकोणात जीव अडकला असेल ती प्रत्येक व्यक्ती तिच्या जवळ जाउन बोलून येते होती. अगदी तिचे ऐंशी ओलांडलेले तिच्या आधारावर जगणारे तिचे आईवडील ही आम्ही आमची काळजी घेऊ असे सांगून आले. शिवाय श्रीराम, गणपती, गजानन महाराज, श्री श्री रविशंकर अशी सर्वांची आराधना करून झाली.पण तिचा श्वास थांबत नव्हता. खरं तर तिच्या खुप इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या. तिला आई बाबांंना फिरवण्यासाठी कार चालवायची होती, संगीत विशारदची शेवटची परीक्षा द्यायची होती, तिच्या लाडक्या लेकाला खुप मोठं झालेलं बघायचं होते आणि आम्ही दोघी मिळून आर्ट ऑफ लिव्हिंग चे शिक्षक होणार होतो. पण नियती आम्हाला तिचा श्वास कधी थांबतोय ह्याची वाट बघायला लावत होती. आईबाबांचा आक्रोश, तिच्या मुलाच्या जीवाची तगमग पाहून पराकोटीचे दुःख काय असते ते अनुभवलं. तिचा त्या जोरात चालणाऱ्या श्वासाने सर्वांना आशा होती की काही तरी चमत्कार घडेल. पण चमत्कार ही घडत नव्हता आणि श्वास ही थांबत नव्हता. ती सगळ्यांंना हवी होती, तरीही तिच्या जाण्याची वाट बघण्याची दूर्देवी वेळ आमच्यावर आली होती. शेवटी  तिच्या जीवाच्या तुकड्यानेच ह्रदयावर दगड ठेवून तिला सांगितले," आई, मी स्वतः ची काळजी घेईन, तू शांतपणे जा." हे ऐकले आणि त्या माऊलीने डोळे उघडून आपल्या लेकाकडे पाहिले आणि अखेरीस तिचा श्वास  थांबला. तिचे शिल्लक असलेले श्वास संपायला तब्बल अठरा तास लागले. दुःखाची परिसीमा गाठणारा हा प्रसंग माझ्या ह्रदयावर खोलवर रुतून बसला आहे. 
तिच्या बाबतीत असे का घडावे ह्याचे उत्तर मला अजूनही मिळत नाहीये. तिच्यासारख्या परोपकारी, आनंदी, कष्टाळू आणि समाधानी व्यक्तीचे असे जाणे मन स्वीकारतच नाहीये.त्यामुळे काही लिहावे, नवीन काही करावे असे वाटतच नाही.
आज तिच्या विषयी लिहून मन हलकं करण्याचा प्रयत्न.















































Sunday, 21 January 2018

नातं मैत्रीचं 'ती'चं आणि भाजीवालीचं


ती जेमतेम दीड वर्षाची चांगल्या सुखवस्तू घरातली मुलगी. तिचं घर भर भाजीबाजारात होते.  सोसायटीमध्ये तसे तिच्या बरोबरीचे कोणीच नव्हते. त्यामुळे तिचा मित्रपरिवार म्हणजे घराखाली दुकान मांडणारे भाजीवाले. त्यातील एक आजी आणि त्यांच्या मुलाशी तर तिची विशेष दोस्ती होती. रोज सकाळी अगदी लवकर उठून आवरून तयार व्हायचे आणि आपल्या दोस्तांची वाट पाहत बसायचे एवढेच तिचे रुटीन होते. आपल्या आजी आणि मामा दिसले रे दिसले की लगेच टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करणार आणि सुसाट त्यांच्याकडे धावत सुटणार. मग तिच्या त्या आजी नऊवारीच्या कमळातून कुठलेसे काजळ काढणार आणि भसाभसा तिच्या डोळ्यांत घालणार. शिवाय कोणाची नजर लागू नये म्हणून काजळाची एक मोठी तिट (तिट कसली मोठा गोळाच असायचा) कपाळाच्या कोपऱ्यात लावणार. ती पठठी पण घरी अजिबात कधी काजळ घालू द्यायची नाही पण त्या आजींकडून मात्र मुकाट्याने सर्व करून घ्यायची. नंतर समोर झालर असलेली वैशिष्टपूर्ण टोपी डोक्यावर चढवून पोरगी भाजी विकायला तयार. 
"चला कोथींबीर एकेक रुपय्या...कोथिंबीर एक रुपय्या" असे ओरडत ती भाजी विकण्याचा मनोसक्त आनंद लुटायची. मग त्यांच्या सोबतच इटुकल्या दातांनी भाकरीचा तुकडा चघळत बसायची.जेवायला देखील घरी जायला तयार नसायची. शेवटी तिची आई तिचा वरणभात त्या भाजीवाल्या आजींजवळ द्यायची तेव्हाच तिचे जेवण होत असे. नंतर तो मामा तिला गाईंच्या, बकऱ्यांच्या पाठीवरून संपूर्ण मंडईची सफर घडवून आणत असे. रम्य ते बालपण ह्याचा पुर्णपणे अनुभव ती घेत होती.
पण ह्याचा त्रास तिच्या आईला खूप सहन करावा लागला. कारण उच्चभ्रू समाजाच्या दृष्टीने हे चित्र खूप भयानक होते. लोकांचे नावं ठेवणे, समजावणे, बोल सुनावणे, ह्या सर्व गोष्टींनी ती माउली वैतागून जायची. पण लेकीला मिळणारा निखळ आनंद, निर्व्याज्य प्रेम आणि लेकीचे सुख ह्या पुढे तिने समाजाच्या बोचऱ्या नजरा आणि कुटुंबातील विरोध ह्याकडे दुर्लक्षच केले. आईला फक्त काळजी एकच होती की लेकीचे आरोग्य तर बिघडणार नाही ना? कारण प्रत्येकजण अनारोग्यपूर्ण अशा गोष्टींबद्दल तिच्या आईला सल्ला देत होता. पण आईचे अंतरमन सांगायचे की काही होणार नाही लेकीला; उलट मोकळेपणाने वाढू दिले तर प्रतिकारशक्ती चांगली होईल. आणि गंमत म्हणजे एकदाही तिची लेक आजारी पडली नाही. त्यामुळे एका आईने आपल्या लेकीसाठी आपली उच्चभ्रूपणाची शाल आपल्या अंगावरून तर काढलीच पण आपल्या लेकीला देखील पांघरू दिली नाही. म्हणूनच तिच्या लेकीचे आणि त्या भाजीवाल्या आजींचे एक वेगळेच वायापलीकडचे मैत्रीचे नातं निर्माण होऊ शकले. आणि आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे अश्या वातावरणातच तिचे बालपण खरोखरच सुखाचे झाले.
मंजुषा देशपांडे-