लेख मंजुषा

Happy Anniversary “हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?” ती लगेच म्ह...

Sunday, 25 November 2018

कचरा

सध्या कचर्‍याच्या गंभीर प्रश्नाने मला भंडावून सोडले आहे. दिवाळीच्या निमित्ताने सर्व घराची साफसफाई झाली. पण गॅलरीकडे लक्षच गेले नाही. दिवाळीच्या गडबडीनंतर जेव्हा गॅलरीत डोकवायला गेले, बाप रे! केवढा ढीग जमा झाला आहे!! यात माझा स्वतःचा कचरा तर होताच, पण त्याहूनही चौपट कचरा बाहेरून आलेला होता. गॅलरीत ढीग करणारी माणसे देखील आपलीच प्रेमाची, त्यामुळे कोणालाच काही बोलता येणार नव्हतं. शेवटी आपणच रोज थोडं थोडं आवरून ढीग कमी करावा म्हणून आवरायला घेतले. पण छे!! रोज जेवढा ढीग साफ करायला जायचे त्याच्या पाचपट ढीग जमा होऊ लागला. आता कामाची गती वाढवणे आवश्यक झाले. शेवटी एक संपूर्ण दिवस त्यात घालवून गॅलरीतला कचरा एकदाचा साफ केला.
पण हा कचरा आला कोणामुळे? तर माझ्या अर्धवट ज्ञानामुळे. वास्तविक हा कचरा थोपवणे माझ्या हातात होते. पण निव्वळ दुर्लक्ष केल्याचा परिणाम असा झाला की शुभेच्छा संदेश, ज्ञानवर्धक, मनोरंजक लेख, पाककृती, आरोग्यविषयक टिपणी अशा सर्व गोष्टींनी माझी गॅलरी गच्च भरून गेली. खरंतर हे सर्व पाठवणार्यांचा उद्देश खूप चांगला होता. ह्या गोष्टी मला परिपूर्ण करणाऱ्याच होत्या. पण त्याचे प्रमाण इतके जास्त झाले की त्याच्या ओझ्याखाली मी दबले गेले. आणि अर्थातच मी स्वतः  वाचले तरच मी हे सर्व वाचू शकणार होते. इतका ढीग जमा  झाल्यावर त्यातून चांगले वाईट निवडणं पण अवघड होऊन गेले. शेवटी सर्वच गोष्टी कचरा म्हणून टाकून द्यावा लागल्या.
आता ही गॅलरी माझ्या भ्रमणध्वनीची म्हणजे माझ्या मोबाईलची होती हे एव्हाना आपणा सर्वांच्या लक्षात आलेच असेल.
वास्तविक व्हाट्सअप, फेसबूक अशा सोशल मीडियाच्या माध्यमांशी माझी काही फारशी गट्टी नाही. पण त्यांचा योग्य उपयोग केल्यास हीच माध्यमे संवाद साधण्यासाठी आणि अनुभव संपन्न होण्यासाठी खूप उपयोगी आहेत. त्यामुळे काळाची गरज म्हणून मी त्यांच्याशी जमवून घेण्याचा प्रयत्न करते. पण आमची मैत्री होण्याआधीच आमच्या नीतिमूल्यांवर हल्ला होतो आणि आम्ही परत परत दुरावले जातो.
या मैत्रीतले अंतर दूर करण्यासाठी मी आधी व्हाट्सअपचे ऑटो डाउनलोडिंग बंद केले आणि मला आणि माझ्या मोबाईलरुपी सख्याला झेपतील तेच संदेश आणि ज्ञान घ्यायचे मी निश्चित केले.
आता तर व्हाट्सअप वर फक्त ऍडमिनच मेसेज पाठवू शकेल अशीही सोय आहे. मग एडमिनला योग्य वाटेल तेव्हा तो समूह सर्वांसाठी खुला करण्यात येतो. पण तेव्हाही पाण्याच्या पाइपमध्ये बोळा  घालून पाणी थांबवले आणि तो बोळा काढला की ते पाणी जसे धो धो वाहू लागते तसेच धो-धो संदेश मोबाईलवर येऊन धडकतात. यामध्ये तर पुष्कळसे संदेश या समूहात आधी आले आहेत का हे देखील बघितले जात नाही. अन तसेच पुष्कळसे संदेश तर स्वतःही न वाचताच पुढे पाठवले जातात. बिचारे ॲडमिन तर हया ग्रुप वर इतर विषयावर शेअर करू नका म्हणून सांगून हैराण होतात. पण पाठवणार्यांचा उत्साह मात्र अजिबात कमी होत नाही.कोणतेही सणवार किंवा काही विशेष दिवस असेल तर  पुन्हा ढीग गोळा होणार ह्याची धडकीच भरते.                                                  
त्यामुळे कोणतीही गोष्ट शेअर करताना प्रत्येकाने स्वतःला मर्यादा  घालाव्यात असे मला वाटते. समूहामध्ये तर नियम व अटी घालूनच समूह तयार करावा आणि त्या व्यवस्थित पाळाव्यात असे माझे स्पष्ट मत आहे. सणावारांना समूहामध्ये एकच शुभेच्छा सर्व समूहाकडून सर्वांना देण्यात यावी. तसेच कोणाच्या दुःखद निधनाची बातमी आली तरी एकच श्रद्धांजली संपूर्ण समूहाकडून देण्यात यावी.
कोणत्याही माध्यमांचा वापर योग्य रित्या झाला तर त्या विषयीची गोडी टिकून राहते.  प्रत्येकाने दिवसभरात आलेल्या संदेशांमधून एखादा चांगला संदेश निवडला आणि तोच फक्त पाठवला तर संदेशांची भाऊगर्दी आपोआप कमी होईल. शिवाय एकच संदेश पाठवायचा असल्याने त्याचे चिंतन आणि मनन होऊन तो पाठवला जाईल.
माझ्या मोबाईलची गॅलरी स्वच्छ करण्यात माझा अख्खा दिवस गेल्यामुळे अंतर्मनातून आलेली ही एक प्रतिक्रिया आहे. यामध्ये कोणाच्याही लिखाणाला केव्हा संदेशांना कचरा म्हणण्याचा माझा हेतू नाही. कारण मी देखील आलेले चांगले संदेश, माझे लेख ह्याच माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवत असते.त्यामुळे स्मार्टफोन वापरताना आपणही त्याविषयीचे ज्ञान स्मार्टपणे घेतलं पाहिजे हे मला नक्कीच समजले आहे. असे केले तर हया माध्यमातून मिळणारे ज्ञान हे कचरा न वाटता आपल्या जीवनपटावर उगवलेले ज्ञानाचे कमळ असेल.
प्रतिक्रियांचे स्वागत.
© मंजुषा देशपांडे, पुणे.

Friday, 9 November 2018

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

काल 'आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट फर्स्ट दे फर्स्ट शो पाहून आले.
खरंतर मी काशिनाथ घाणेकर यांचे काम कधी पाहिले नाही. फक्त त्यांच्या नाटकांची आणि चित्रपटांची नावे ऐकून होते. त्यामुळे त्यांना जाणून घेण्याची उत्सुकता तर होतीच पण त्याहूनही जास्त उत्सुकता सुबोध भावेला त्यांची भूमिका साकारताना बघण्याची होती.
चित्रपटात सुबोध भावे चे काम एकदम कडक असे आहे. काशिनाथ घाणेकरांचे जीवन चरित्र दाखवताना त्या काळातील त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या इतर मातब्बर कलाकारांच्या  व्यक्तिरेखाही वेशभूषा, अभिनय आणि चित्रीकरण अशा सर्वच बाबतीत अतिशय उत्कृष्ट चित्रित झाल्या आहेत.
चित्रपटात करमणुकीसाठी कुठलाही अतिरिक्त मसाला न घालता काशिनाथ घाणेकरांना जसे रंगभूमीचे सुपरस्टार दाखवले गेले आहे, तसेच प्रसिद्धीची हवा डोक्यात  गेल्याने आलेला उर्मटपणा, बेफिकिरी आणि दारूचे व्यसन या गोष्टीमुळे त्यांच्या आयुष्याची झालेली वाताहत अगदी स्पष्टपणे मांडली आहे. चित्रपटात कुठेही काशिनाथ घाणेकर यांच्या चुकांवर पांघरूण घातले नाही. प्रेक्षक एका चांगल्या कलाकाराला त्याच्या चुकांमुळे, वाईट व्यसनांमुळे नाकारू शकतात हा बोध या झगमगत्या दुनियेतचे आकर्षण असणाऱ्यांना नक्कीच घेण्यासारखा आहे.
एकूण काय तर सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी,नंदिता धुरी, प्रसाद ओक, वैदेही परशुरामी या सर्वांचे अभिनय उत्तम. शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा चित्रपट. दिग्दर्शन, वेशभूषा, कथेची मांडणी, नाट्यप्रसंग सर्वच बाबतीत कडक असा चित्रपट. मी स्वतः पाचपैकी 4.5 स्टार्स नक्कीच देईन.
आज ९ नोव्हेंबर २०१८ रोजी सुबोध भावेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एवढेच सांगेन की तुझ्या बालगंधर्व, लोकमान्य टिळक, तुला पाहते रे आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर ह्या सर्व भूमिका बघितल्यास तुझेही नाव शेवटी लिहून 'आणि सुबोध भावे' असा योग येणे दूर नाही.

©मंजुषा देशपांडे, पुणे.

Sunday, 4 November 2018

माझी झापडी

दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव. दिवाळीचा पाडवा म्हणजे नवऱ्याकडून हमखास भेट मिळवण्याचा दिवस. नवऱ्याने नेहमीप्रमाणे विचारले, "काय द्यायचे का यंदा तुला " हे विचारतानाही त्यांना माहिती  होतं की नेहमीप्रमाणे उत्तर येणार की माझ्याकडे सगळं आहे, मला खरच काही नको.
हयावेळी मात्र माझ्या डोक्यात वेगळीच भेटवस्तू घुसली होती. त्यामुळे मी विचारले ,"मागू का? खरंच द्याल ना?"
माझ्या डोळ्यातली वेगळीच चमक बघून नवऱ्याच्या चेहऱ्याची रयाच गेली. झालं, कधी नाही ते मागत आहे म्हणजे  एवढ्या वर्षांची भरपाई होणार दिसते. नवरा स्वतःशीच पुटपुटला.
"काय घ्यायचे तुला?" पहिल्यांदा विचारण्यातला उत्साह थोडा कमी झाला होता." तशी तू समंजस आहेस. आज पर्यंत एकमेकांना समजून घेऊनच आपण यशस्वी संसार केला." नवऱ्याची खिसा वाचवण्याची केविलवाणी धडपड सुरू झाली.
पण मी आपलं सोईस्कर दुर्लक्ष करत म्हटले, "खरं आहे. पण ह्या वेळेस मला माझ्या मनातली भेटवस्तू हवी आहे. कशी आणि कुठे मिळेल हे मलाही समजत नाहीये. पण ती जर मिळाली तर माझ्या आयुष्याचे सार्थक होईल. "
ह्यावेळेस आपण पुरते लुबाडले गेलो आहोत याची जाणीव होऊन जड अंतकरणाने पतीदेव म्हणाले,"बोल ना काय हवे आहे आपण नक्कीच मिळवण्याचा प्रयत्न करू."
मग मी सरळ सांगितले की मला झापडी हवी आहेत.
नवरा बसल्या जागीच उडाला. काय? झापडी?  म्हणजे काय?जनावरांना घालतात ती? तुला कशाला हवीत ?
अहो, त्या दिवशी नाही का दूरदर्शन वरच्या कार्यक्रमात अशोक सराफ म्हणाले,"आयुष्यात इतरत्र कुठेही डोकावले नाही. घोड्याला लावतात ना तशी झापडी लावून फक्त अभिनय एके अभिनय केला." अभिनयाच्या दिशेने लावलेल्या झापडींनीच त्यांना यशाच्या उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवले.
त्यावरून माझ्याही लक्षात आले की आपण आजवर कोणत्याही क्षेत्रात  यशस्वी का नाही झालो, तर आपण दिशाहीन भरकटत आहोत. अजूनही आयुष्याची दिशा नीट समजत नाहीये. एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली आहे. खरंतर लहानपणी झापडी घातलीत का डोळ्यांना? हे वाक्य नकारात्मक अर्थानेच वापरले जायचे. त्यामुळे झापड्यांचा सकारात्मक अर्थ कधी कळलाच नाही. नाहीतर प्रसिद्ध आणि यशस्वी व्यक्तींच्या रांगेत आपण ही असतो असे उगाचच मनाला वाटून गेले.
म्हणूनच मला यंदा दिवाळीत लक्षवेधक अशी झापडी हवी आहेत. ही झापडी घालून अंदाधुंदपणे सैरभैर धावणाऱ्या मनाला, विचारांना दिशा देणार आहे. द्याल ना मला, मला हवी तशी झापडी घेऊन? मी आपला लाडीक हेका चालूच ठेवला.
नवर्याचा खिसा सुरक्षित राहिल्याने त्याने सुटकेचा श्वास सोडला. पण झापडीच्या खुळाचे काय करावे हे काही समजत नव्हते .शेवटी नाईलाजाने पतिराजांनी ऑनलाइन झापडी शोधायला सुरुवात केल्याचे मी केल्याचे पाहिले. झापडी शोधता-शोधता डोळ्यांवर झापड येऊन ते गाढ झोपी गेले. आता माझ्या पुढील आयुष्याची दिशा पाडव्याला ठरणार आहे. बघूया काय होते ते.
चला, त्यामुळे ह्या वेळेसचा पाडवा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. एकदा का ही कोरी करकरीत झापडी लावून त्या दिशेने बेछूट धावत सुटले की जीवनाच्या वाटेतील संसार, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मूड, अनुत्साह आणि आळस हे सर्व अडथळे आपोआपच दूर होऊन जीवन खऱ्या अर्थाने सुखी समाधानी,आनंदी आणि यशस्वी होईल अशी आशा मला आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐन दिवाळीत मी हे काय घातलयं असा प्रश्न तुम्हाला पडायला नको म्हणूनच हा लेख प्रपंच.