काल 'आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट फर्स्ट दे फर्स्ट शो पाहून आले.
खरंतर मी काशिनाथ घाणेकर यांचे काम कधी पाहिले नाही. फक्त त्यांच्या नाटकांची आणि चित्रपटांची नावे ऐकून होते. त्यामुळे त्यांना जाणून घेण्याची उत्सुकता तर होतीच पण त्याहूनही जास्त उत्सुकता सुबोध भावेला त्यांची भूमिका साकारताना बघण्याची होती.
चित्रपटात सुबोध भावे चे काम एकदम कडक असे आहे. काशिनाथ घाणेकरांचे जीवन चरित्र दाखवताना त्या काळातील त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या इतर मातब्बर कलाकारांच्या व्यक्तिरेखाही वेशभूषा, अभिनय आणि चित्रीकरण अशा सर्वच बाबतीत अतिशय उत्कृष्ट चित्रित झाल्या आहेत.
चित्रपटात करमणुकीसाठी कुठलाही अतिरिक्त मसाला न घालता काशिनाथ घाणेकरांना जसे रंगभूमीचे सुपरस्टार दाखवले गेले आहे, तसेच प्रसिद्धीची हवा डोक्यात गेल्याने आलेला उर्मटपणा, बेफिकिरी आणि दारूचे व्यसन या गोष्टीमुळे त्यांच्या आयुष्याची झालेली वाताहत अगदी स्पष्टपणे मांडली आहे. चित्रपटात कुठेही काशिनाथ घाणेकर यांच्या चुकांवर पांघरूण घातले नाही. प्रेक्षक एका चांगल्या कलाकाराला त्याच्या चुकांमुळे, वाईट व्यसनांमुळे नाकारू शकतात हा बोध या झगमगत्या दुनियेतचे आकर्षण असणाऱ्यांना नक्कीच घेण्यासारखा आहे.
एकूण काय तर सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी,नंदिता धुरी, प्रसाद ओक, वैदेही परशुरामी या सर्वांचे अभिनय उत्तम. शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा चित्रपट. दिग्दर्शन, वेशभूषा, कथेची मांडणी, नाट्यप्रसंग सर्वच बाबतीत कडक असा चित्रपट. मी स्वतः पाचपैकी 4.5 स्टार्स नक्कीच देईन.
आज ९ नोव्हेंबर २०१८ रोजी सुबोध भावेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एवढेच सांगेन की तुझ्या बालगंधर्व, लोकमान्य टिळक, तुला पाहते रे आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर ह्या सर्व भूमिका बघितल्यास तुझेही नाव शेवटी लिहून 'आणि सुबोध भावे' असा योग येणे दूर नाही.
©मंजुषा देशपांडे, पुणे.
No comments:
Post a Comment