लेख मंजुषा

Happy Anniversary “हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?” ती लगेच म्ह...

Wednesday, 3 July 2019

बाप माणूस

एखाद्या मोठ्या व्यक्तीसाठी ' बाप माणूस' हे विशेषण लावले जाते. माझ्या आयुष्यातही असा बाप माणूस होता. दुर्दैवाने आता होता असेच म्हणावे लागेल. सामाजिक दृष्ट्या ती एक सर्वसामान्य व्यक्ती होती. प्रसिद्धीचे फार काही मोठे वलय त्या व्यक्तीभोवती नव्हते. पण माझ्यासाठी आदर्श असे ते व्यक्तिमत्व होते.
लहानपणापासूनच त्या व्यक्तीविषयी एक आदरयुक्त भीती होती. त्यांना आपण आवडलो पाहिजे, त्यांनी आपले कौतुक करावे ह्यासाठी मी धडपड करायचे. त्यामुळे त्यांना आवडणारी के. एल. सैगल, तलत मेहमूदची मी देखील मनापसून ऐकायचे. त्यांची वाचनाची आवड मलाही लागली. त्यांनी आयुष्यात कधी तोंडावर कौतुक केले नाही. पण त्यांचा चेहरा खूप बोलका होता. जे मनात ते चेहेऱ्यावर लगेच दिसायचे. त्यामुळे आपली कोणती गोष्ट त्यांना आवडते आणि कोणती नाही हे मी नकळत शिकत गेले.
वास्तविक त्यांचा सर्व उमेदीचा काळ कर्ज फेडण्यातच गेला. पण सर्वसाधरण परिस्थितीशी झुंज देत आपली आवड, आपला स्पष्टवक्तेपणा आणि आपला स्वभिमान जपलेली ही व्यक्ती माझ्यासठी खूप अभिमानस्पद होती. आपली चित्रपट आणि साहित्याविषयीची आवड जपताना त्यांनी घरातली एकही जबाबदारी नाकारली नाही. कधी आपल्या परिस्थितीबद्दल कुरबुर केली नाही. पैसे वाचवून वाचवून बँकेतले आकडे नाही वाढवले. तर त्या पैशांतून साहित्य संमेलन आणि चित्रपट, विशेषतः राज कपूरचे चित्रपट एव्हढी चैन मात्र अगदी मनापसून केली. चोरी चोरी ह्या चित्रपटाची किती पारायणे झाली असतील हे त्यांचे त्यांनाच ठाऊक!!!
आज प्रत्येकजण आनंद... सुख ...शोधत निव्वळ पैशांच्या मागे धावताना पहिले कि वाटते माझ्या बाप माणसाला जीवन खऱ्या अर्थाने कळले होते.
त्यांचे हसणे मनापासून, बोलणे मनापासून आणि चिडणेही अगदी मनापासून होते. अंतर्बाह्य स्वच्छ, नितळ असा हा माणूस. जगताना लोकं काय म्हणतील ह्याची त्यांनी कधीच पर्वा केली नाही. एखादा चित्रपट आवडला तर चार चार वेळा जाऊन पाहून येणार! राजकारणावर परखडपणे बोलणार आणि एखादी गोष्ट नाही पटली तर तोंडावर सांगून मोकळे होणार. आता वरवर पाहता वाटेल कि असे काय विशेष होते ह्या व्यक्तीमत्वात?
पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात जी परिस्थिती येईल ते ती स्वीकारत गेले आणि त्यातूनही स्वतःचा आनंद शोधत राहिले. आनंदी आणि सुखी जगण्यासठी पैसा महत्वाचा नसतो तर आहे त्या परिस्थितीला स्वीकारत आपले छंद जोपासणे महत्वाचे असते हे त्यांनी त्यांच्या उदाहरणातून दाखवले. आपले मत मांडताना ते  कधी कचरले नाही. मनात एक आणि बाहेर एक असे कधीच वागले नाही. आपली चूकही अगदी मोकळेपणाने मान्य करायचे. जेव्हा मुलेबाळे सर्व काही स्थिरस्थावर होऊन निवृत्तीचे आयुष्य जगण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या नजरेने त्यांना धोका दिला. डोळ्यांच्या पडद्या संबंधीचा विकार असल्याने त्यावर काहीही इलाज नाही असे निदान झाले. एक डोळा पूर्ण निकामी झाला होता आणि दुसऱ्या डोळ्याची दृष्टी फक्त ४०% राहिली होती. ती देखील हळूहळू जाऊन पूर्ण अंधत्व येईल असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे निवृत्तीनंतरचे भरपूर वाचन करणे, लिखाण करणे, नाटके बघणे असे रचलेले सर्व मनोरे जमीनदोस्त झाले. पण सहजासहजी हार मानणारे ते व्यक्तिमत्वच नव्हते.
आपल्या अंधत्वाला कुरवाळत बसून ते कधी रडत बसले नाही. तर रेडिओवर गाणी, श्रुतिका ऐकत आपला दिवस ते आनंदात घाल वायचे. आज जेव्हा मी सकारात्मक विचारांविषयी  किंवा सिक्रेट सारखी पुस्तके वाचते तेव्हा मला लक्षात येते कि हा माणूस तर हे असेच जगला आहे.
नंतर एकदा त्यांना मी त्यांच्या वाढदिवसाला आयपोड आणि  हेडफोन भेट म्हणून दिले. त्यात त्यांना व.पु. काळे, पु. ल. देशपांडे आणि प्र. के. अत्रे अशा त्यांच्या दैवतांचे कथाकथन, भाषणे भरून दिले. हे मात्र त्यांना इतके आवडले कि एरव्ही नवीन तंत्रज्ञानाशी फारकत असलेल्या ह्या व्यक्तीने दिसत नसतानाही ते कसे चालू करायचे, काय ऐकायचे ते कसे निवडायचे हे बोटांच्या सहाय्याने व्यवस्थित शिकून घेतले. मग सकाळी लवकर उठून अन्हिकं, देवपूजा आणि नेम केलेला जप पूर्ण झाला कि आपले कानात हेडफोन घालून मस्तपैकी स्वतःच्या विश्वात रमून जायचे. प्रत्येकवेळी तेच तेच ऐकताना जणू आपण हे प्रथमच ऐकत आहोत अशी दाद देत खळखळून हसायचे. हातचे काही राखून ठेवणे त्यांना कधी जमले नाही. त्यामुळे त्यांचे हसणेही दिलखुलास होते. थोडक्यात काय ते स्वतःशी कायम प्रामाणिक राहिले. आपल्याला काय आवडते आहे त्याच्याशी त्यांनी तडजोड केली नाही. गाठीशी फार सोनं नाणे नाही ठेवले पण सोन्यासारखे जीवन जगले.खुपदा असे होते कि भविष्याच्या साठवणीत आपण स्वतःला विसरून जातो आणि नंतर अशी वेळ येते कि पैसा पुष्कळ असतो पण आपल्याकडे त्याचा उपभोग घ्यायला  दिवस कमी असतात. मग जन्मा येउनी काय केले असा पस्तावा होतो. हा पस्तावा करण्याची त्यांना कधी वेळ आली नाही. कारण त्यांचे आयुष्य ते त्यांना पाहिजे तसे जगले.
एक दिवस पहाटे अचानक छातीत कळ आली आणि काही क्षणातच त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. ते गेले त्यावेळी देखील त्यांचा चेहरा हसतमुख आणि प्रसन्न होता. माझ्या आयुष्यात प्रथमच मी गेलेला माणूस इतका प्रसन्न पहिला. ते सोडून गेल्याचे त्यावेळी खूप वाईट वाटले. पण आज जेव्हा अंथरुणाला खिळलेले लोकं पहाते  तेव्हा त्यांनी त्यांचा अंतकाळ किती चांगला साधला हे जाणवते.
म्हणजे एखादी व्यक्ती खूप प्रसिद्ध नसेल, अगदी संतही नसेल पण आहे त्या परिस्थितीत भरभरून जगू शकत असेल तर तिचा जन्म सार्थकी लागला असे म्हणता येईल. असा हा माझ्या आयुष्यातील बाप माणूस म्हणजे माझे प्राणप्रिय वडिलांचा आज ३ जुलैला वाढदिवस असतो. आयुष्यात कधीही त्यांनी जवळ घेऊन काही शिकवले नाही किंवा कधीच अभ्यासही घेतला नाही. पण त्यांचे जगणे हेच चालते बोलते पुस्तक होते. जेव्हा जेव्हा किरकोळ गोष्टींवरून मन नाराज होते, कसलाच मूड नाही असे वाटते तेव्हा मी त्यांचे जगणे डोळ्यांसमोर आणून स्वतःला आंनदी ठेवते. असे मला जगणेच नाही तर मरणही कसे असावे ह्याचा धडा शिकवणाऱ्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
 तुम्ही माझ्या मनात कायम जिवंत असल्याने मी कधीही तुमची जयंती किंवा पुण्यस्मरण करणार नाही.
-मंजुषा देश्पांडे (पुणे)


29 comments:

  1. खूप छान मंजू..आयुष्य जगायचा कानमंत्र कृतीतून शिकवणा-या बाबांच्या स्मृती चिरंतन ह्रद्यस्थ रहातील.🙏

    ReplyDelete
  2. Khupch mast manju mavshi 😇

    ReplyDelete
  3. खूप छान मंजू...बाबांच्या स्मृतीस वंदन

    ReplyDelete
  4. खूप छान लिहलंय मंजू!

    ReplyDelete
  5. खूप छान आणि आम्ही पण त्यांचा चांगला परिचय असल्याने

    ReplyDelete
  6. श्याम देशपांडे3 July 2019 at 07:49

    ह्रदयस्पर्शी लिखाण, प.पु. नानांचे अचूक शब्दचित्र..
    प्रत्येक शब्दातील भावना आणि आदर मनास भिडतो आणि चिंब ओले करुन टाकतो.. आपणा सर्वांचे आदर्श आणि जिवनाचे दिपस्तंभ नाना उर्फ पपांना स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम ��

    ReplyDelete
  7. खरंच खूप छान. उन्हाळ्याची सुट्टी लागली की माझी एकच आवडती जागा असायची. ती म्हणजे आत्याच घर - मनमाड. विशेष आकर्षण असायचे ते मामांची लायब्ररी... तिथली वेगवेगळी पुस्तके, मासिके आणि मला वेड लावणारी लहान मुलांना आवडणारी चंपक, चाचा चौधरी आणि अशी अनेक लहान मुलांना आवडणारी गोष्टी ची पुस्तके. मामा ही ती आवडीने मला द्यायचे पण त्याचबरोबर एक ताकीद ही असायची की ती जपुन वापरायची..

    ही आणि अशा अनेक आठवणी पुन्हा ताज्या होतायत..
    मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
    ते आमच्या मनात सदैव तसेच कणखर, शिस्तबद्ध पण तेव्हढेच प्रेमळ म्हणून जिवंत आहेत आणि राहतील.🤗

    ReplyDelete
    Replies
    1. लहानपणीचे ते दिवस कधी विसरू शकत नाही आपण.. ती मजा आताच्या मुलांना नाही करता येत.

      Delete
  8. खूपच छान. वाचताना डौळ्यात पाणी आले. खूप नशीबवान आहेस तु असे वडितुला लाभले. त्यांच्याकडून यातल्या १% गोष्टी जरी आपण करायच्या प्रयत्न केला तरी आपले आयुष्य सफल होईल, नाही का? त्यांच्या स्मृतीला वंदन

    ReplyDelete
  9. Kay lihu ,khup Chan, thanchya sarkhe jagu ya. mast.

    ReplyDelete
  10. साहित्याची जाणकार व्यक्तित्व म्हणजे नाना

    त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन

    ReplyDelete
  11. Faar mast varnan aani faar kahi shikaych rahilae hey kalal. Happy Birthday Nananna. Thanks Aai.

    ReplyDelete
  12. Amazing post. It shows how beautiful can life be at any circumstances. You can't change the circumstances, but you can always change the approach and attitude towards it. ����

    ReplyDelete
  13. खुपचं छान व्यक्तीचित्र, शब्दांची सुरेख मांडणी आमचे मेव्हणे shri. मोहनराव यांचे हे सर्व गुण आमच्या प्रभाताई ने हेरले होते.त्या वेळेस राजेंद्रकुमार किंवा दिलीपकुमार भासायचे. लिटरली हसतमुख चेहऱ्याने घेतलेली या जगातून एक्सिट एक चमत्कारच
    हे भाग्य फार थोड्या लोकांच्या नशिबी असत.
    लेख खूपच हृदयस्पर्शी आहे. अशीच लिहीत रहा. आता अपेक्षा वाढल्या आहेत. मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐👍

    ReplyDelete
  14. खरी सकारात्मकता जीवनाबद्दलची समजते यातून. एक प्रेरणादायी गोष्ट म्हणून सांगू शकेन मुलांना त्यातूनच जगण्याची उत्तम कला ही शिकता येईल. आभार.

    ReplyDelete