लेख मंजुषा

Happy Anniversary “हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?” ती लगेच म्ह...

Sunday, 1 December 2019

माझा बबड्या


त्या अग्गंबाई मधील बबड्यामुळे माझ्या डोक्यात वेगळाच किडा वळवळू लागला. तो बबड्या शब्दच  खूप गोड वाटू लागला. अरे यार, आपल्यालाही कोणीतरी बबड्या म्हणावे असे उगीचच वाटू लागले. पण आपल्याला असे बबड्या म्हणणारे कोणी उरलेच नाही. अर्थात आता पन्नाशीत अशी अपेक्षा करणे कोणाला हास्यास्पद वाटू शकेल. पण वाटले त्याला काय करणार. त्या बबड्याने मला अस्वस्थ केले हे खरं!!! मालिकेतील तो बबड्या कसा आहे ह्याच्याशी मला काही घेणेदेणे नव्हते. 
बरं हा वयाचा बुरखा कोणाला कसे सांगणार होता की मला बबड्या म्हण ना...नाहीतर राजा, सोन्या, राणी, बेटा असे काहीही चालेल.....छे, हे वय ना जिथे तिथे नडतं!!!
खरं तर वय हा फॅक्टर शरीराशी संबंधित आहे. लहानपण...तरुणपण...मोठेपण.. ह्या सर्व शारीरिक अवस्था आहेत. मन कसे कायम चिरतरुण असते. पण शारीरिक वय वाढले की ते वय नकळत मनावर लादले जाते. आपण त्या मनालाही उगीच सो कॉल्ड मॅच्युअर्ड करत मोठेपणाच्या ओझ्याखाली दाबून टाकतो. पण त्या बबड्या नावाने माझ्यातल्या बालीश मनाला जागे केले आणि लाडिक हाक ऐकायला कान आसुसले. पण आई-वडील नसताना तर ही हाक ऐकणे मुश्किलच होते. अशावेळी आत्याची पण खूप आठवण झाली. कायम राजा, बेटा म्हणणार्‍या माझ्या आत्यानेदेखील या जगाचा निरोप घेतला. काय करावे कळत नव्हते.
मग एकदम क्लिक झाले की अरे आम्ही मैत्रिणी तर जवळपास सारख्याच वयाच्या आहोत. चला तर आता निदान ग्रुप मध्ये तरी जाहिर करावे की आपण आता एकमेकींना मस्तपैकी सोनू, मोनू, बेटा, रानी, राजा आणि बबड्या म्हणायचे. पुरे झाला आता तो मोठेपणाचा आव. कल्पनेनेच मन अगदी हलकेफुलके झाले. पण आम्ही सर्व मैत्रिणी तर महिन्यातून एकदाच भेटतो. मग काय महिन्यातून एकदाच बबड्या??? नॉट फेयर...काय करावे सुचत नव्हते. विचार करून करून डोक्याचा भुगा झाला.
अचानक एक भन्नाट कल्पना सुचली. अर्थात ही फक्त आपल्यातच ठेवा हं. जगभर सांगू नका...नाही तर सगळे टिंगल करतील. तर ती कल्पना अशी आहे की आपणच आपल्याशी लाडाने बोललो तर?....
काय बरे म्हणावे???....शेवटी त्या अग्गोबाईचा प्रभाव वरचढ झाला आणि बबड्या म्हणायचे पक्के ठरले.
मग काय अंगात उत्साह संचारला आणि कल्पना प्रत्यक्षात आणणे सुरू केले. पण सुरूवातीस स्वतःला बबड्या बबड्या म्हणणे वेगळेच वाटायचे. मग काही दिवस आयुष्यातील सर्व मोठया व्यक्तींचे स्मरण करत त्यांच्यावतीने  स्वतःला बबड्या म्हणायला लागले. हळूहळू मीच मला लाडिक हाक द्यायला शिकले. काय मस्त अनुभव येतो ....पण परत सांगते ...नो बोभाटा...फक्त आपल्यातच ठेवायचे बरं हे सिक्रेट...प्रॉमिस ना?.. तर माझा गुपचुप गुपचुप बबड्याचा प्रयोग सुरू झाला. काय आश्चर्य शरीराच्या कुरबुरी कमी होऊ लागल्या. सकाळी उठावेसे वाटायचे नाही. चांगली सात तासांची झोपदेखील पुरेसी नसायची. खूप थकले आहे म्हणून लवकर उठायचेच नाही. मग एकदा सकाळचे सात वाजून गेले की व्यायाम, फिरणे बंद आणि स्वयंपाक घरात कामे सुरू. आपण चुकतो आहोत, हे वागणे एक दिवस फार महागात पडेल असे रोज स्वतःला रागवायची. पण मनावर कसलाही परिणाम होत नव्हता. पण प्रेमाचे बोल ऐकण्यासाठी आसुसलेल्या मनाला बबड्या संबोधलेले खूप आवडले. सकाळी सकाळी शरीराला जाग आल्यावर जे झोप झोप म्हणणारे मन असते ना त्याची मनधरणी करायला सुरुवात केली. त्याला रोज म्हणावे लागते," बबड्या, ए बबड्या, उठ ना आता, आपले आरोग्य चांगले ठेवायचे आहे ना? की जायचे आहे परत आय.सी.यू.मध्ये? शहाणा आहेस ना तू? मग चल आवर बरं लवकर. बबड्या, तुला अजून एक गोष्ट सांगते, तू वॉक करताना ती जुनी गाणी, प्रवचन, कथा वगैरे ऐकतेस ना तर त्याऐवजी तू मस्त झिंगाट गाणी लावून चालून बघ. कसं असतं की गाण्याच्या गतीप्रमाणे आपण चालतो. त्यामुळे तुला फास्ट चालण्याची सवय होईपर्यंत तरी तू हा प्रयोग करून बघ. उठ बरं आता, आपल्याला तब्येत चांगली ठेवायची आहे ना? माहिती आहे सोन्या, तू सर्व कामे करून थकून जातेस. पण चालणेही आवश्यक आहे ना? तुझी तब्येत तुलाच सांभाळावी लागणार आहे ना?”
आईशपथ, रोज एवढं प्रेमाने आजवर कोणी बोलल्याचे आठवत नाही. मग काय मस्तपैकी कानांत ईयर फोन, पायात बूट घालून अस्मादिक वॉकिंगला तयार!!! आजवर,” ही काय गाणी आहेत का? काही अर्थ तरी आहे का ह्या गाण्यांना?” असे म्हणणारी मी आता मस्तपैकी झिंगाट गाण्यांवर ठेका धरत अशा काही स्पीडने चालते की झिंग येऊन पडायचीच बाकी राहते. एवढं दमून भागून घरी आल्यावर थोडी विश्रांती तर हवीच असते. पण सकाळची कामे डोळ्यांसमोर येतात आणि तशीच किचन मध्ये जाऊ लागते. पण तिथेही मनाला सांगावे लागते,” अरे, बबड्या, एक पाच मिनिटे तर बस ना. किती दमली आहेस तू. थोडे निवांत बसून पाणी तरी पी आणि मग लाग कामाला.”
काय छान वाटते म्हणून सांगू.....आपणच आपली काळजी घ्यायची......कशाला पाहिजे कोण......मग मस्तपैकी पाच मिनिटे बसून सावकाश पाणी प्यायले आणि अगदी फ्रेश मूडमध्ये कामाला लागले.
ही बबड्याची जादू खूप ठिकाणी उपयोगात येऊ लागली. शरीराचे बरेचसे नखरे ह्या मनरूपी बबड्याने कमी केले.
कोणत्याही गोष्टीचा कंटाळा आला असेल तर थोडे बबड्या ...बबड्या ....करून कामे करून घेता येतात. अर्थात कंटाळा शब्दाला आयुष्यातून घालवणे काही सोपा टास्क नसतो. कारण ह्या कंटाळ्यावर शारीरिक कुरबुरी, थकवा अशी विविध भरभक्कम आवरणे असतात. सुखाने ऐसपैस पसरलेल्या देहाची ही आवरणे ओरडून किंवा ओरबाडून निघणे अवघड असते. म्हणून मग मी आपले बबड्याला हाताशी धरले.
आज कामवाली बाई नाही आली.....लगेच मूड जायला नको.....मग आज बबड्याला थोडे जास्त काम पडणार...पण.....बबड्या करून टाकणार. दुपारी खूप झोप येते ना? पण बाबू डॉक्टरांनी दुपारी झोपायला नाही संगितले ना?...मग तू असे कर खुर्चीतच वामकुक्षी घे. काय म्हणतेस लिहिण्याचा कंटाळा आला??? सोन्या, लिही ना पटकन....ऐकणार ना तू...लिहून व्यक्त होणे आवडते ना तुला मग का ग असा कंटाळा करतेस तू सोनू....लिही बरं आता लगेच...
इट्स वर्कड!!!! काय आश्चर्य, माझे सुस्तावलेले शरीर एकदम ताजेतवाने झाले आणि अगदी अर्ध्या तासात किचनला रामराम ठोकून मी अगदी शहाण्या बाळासारखी लिहायला बसले. बबड्या शब्दात एवढे वजन असेल असे अग्गंबाई चा बबड्या बघून तर अजिबात वाटले नव्हते. गंमत म्हणजे आपण आपल्याला बबड्या म्हटलेले कोणाला कळत देखील नाही. तेरी भी चूप...मेरी भी चूप.
विश्वास नाही बसत??? मग करूनच बघा.
खरेतर व्यक्ती नोकरी करणारी असो वा घरीच असो, पण रोज रोज त्याच त्याच साचेबद्ध जीवनाचा तिला कंटाळा येतो. मग अशावेळी सोन्या, राजा, बबड्या हे वरवर साधे वाटणारे शब्दही स्वयं-प्रेरणा ( self-motivation) देतात. देव जसा भावाचा भुकेला तसे मन प्रेमाचे भुकेले असते. म्हणूनच समर्थ रामदासस्वामींनी मनोबोधात मनाला सज्जन संबोधत उपदेश केला आहे. मना सज्जनाच्या ऐवजी आपण आता अधिक प्रेमाने मनाला बबड्या, सोन्या, राजा वगैरे म्हणून त्या चंचल मनाला स्थिर करू या.
कोणावर चिडलो, ओरडलो किंवा कमी लेखले तर तो आपली कामे मनापासून करेल का??? नाही ना.....तसेच आपले स्वत:चे देखील असते. आपले काम काढून घ्यायचे असेल तर जिभेवर साखर ठेवावी म्हणतात. मग ही साखरपेरणी स्वतःच्या बाबतीतपण नको का??? आपण जर आधी स्वतःशी गोड बोलू शकलो तर इतरांशी देखील बोलू शकू असे मला वाटते. हं, पण नेहमीच सतत गोड बोलून चालत नाही. कधी कधी रात्री व्हाट्सअप वर मन जास्तच रेंगाळू लागले तर थोडे दटावणीच्या सुरात सांगावे लागते,” नो बबड्या नो.....किती वाजले बघ बरं आता.....झोप बघू लवकर ......उद्या वॉकिंगला उठायचे आहे ना ....झोपा मग आता, आणि हो, ठरवल्याप्रमाणे दिवसभरात काय काय चांगले-वाईट घडले आणि काय काय चांगली कामे केली, काय चुका झाल्या....सर्व लिहिल्याशिवाय झोपायचे नाही हं.
नाही म्हटले तरी माझ्यात झालेला बदल घरात झेपणारा नव्हता. असे काय घडले की ही एवढी मोटीवेटेड झाली हे कोणालाच कळत नव्हते. सकाळी सकाळी लिहिताना पाहून जो तो टोकट होता,” आज काय विशेष सकाळीच लिहायला बसलीस.” आता त्यांना कसे सांगणार ना की माझ्या बबड्याने बसवले आहे. फुल्ली सीक्रेट आहे बाबा हे ....कळायला नको हं .....नाही तर सर्व माला बबड्या बबड्या करून चिडवतील.
शेवटी एवढच सांगेन,
                  मन शहाणं शहाणं
                  गोड शब्दांचं भुकेलं
                  नका करू गार्हाण
                  गोंजारा त्याला प्रेमानं
तर असेच कोणीतरी सोन्या, बबड्या तुमच्याही आयुष्यात येवोत हीच शुभेच्छा!!!!
@ मंजुषा देशपांडे, पुणे.








15 comments:

  1. व्वा ! खूपच सुंदर. मनाच्या श्लोकांचा आधुनिक सारांशच आहे जणू!

    ReplyDelete
  2. As time passes, the body grows? But where does the notion of "Maturity" coming from? Why does anyone feel like commiting the horrific crime of killing the innocent, natural, and beautiful child inside them?
    It is the judgemental eyes of the society which make us this way. We all need to rise against it. No fame, no money, nothing can bring us happiness. Happiness lies within ourselves which we massacre with our own hands under different names such as: "Maturity", "responsibilities", etc.

    You have taken a great step to understand this and do something against it.

    ReplyDelete
  3. Very nicely written... Motivational...
    Preservative of natural innocence....Keep it up... For self and others... to have happy life

    ReplyDelete
  4. आता पर्यंतच्या लेखा मध्ये " माझा बबड्या " एक नंबर आहे. लेखन शैली तर अप्रतिम. एकदम नवीन विषय, शेवटच्या चारोळी मस्त. अशीच लिहीत रहा शुभेच्छा.

    ReplyDelete
  5. अगदी मनापासून धन्यवाद.असेच प्रोत्साहन काय देत रहा.

    ReplyDelete
  6. खुपच छान..मला खूप आवडला लेख..

    ReplyDelete
  7. खूपच छान मरगळ झटकून मन व शरीर उल्हसित करणारा लेख

    ReplyDelete