लेख मंजुषा

Happy Anniversary “हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?” ती लगेच म्ह...

Sunday, 6 December 2020

सुख म्हणजे नक्की काय असतं

आज वाढदिवस आहे ना तुझा? मग अशी काय तोंड उतरवून बसली आहेस?

विशेष असं काही नाही... असंच..

हे असंच असंच फार झालं तुझं...नक्की सांग काय विचार चालू आहेत?



खरं तर मलाही कळत नाहीये.... पण कधी कधी एकटे छान वाटते तर कधी कधी खूप गोतावळा हवाहवासा वाटतो... असे का होतेय हे खरंच  कळत नाही.


तुला एक सांगू का? तुला सर्व कळतं पण वळत नाही..


म्हणजे?

म्हणजे आज तुझा वाढदिवस... आज आपल्याला एकही मेसेज किंवा फोन नाही आला तर...... भीती वाटते ना तुला?


तुला कसं कळलं?

न कळायला काय झाले.... तुझी कर्मेच तशी आहेत. लॉक डाउन होऊन सर्व सुरळीत झाले... पण तुझी गाडी काही अजून रुळावर आली नाही. तू तर स्वतःला असे काही लॉक करून ठेवले आहेस की सगळ्या जगाशी संपर्क तोडलास. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नाही, कोणाशीही काहीही संपर्क नाही का वागतेस असं?


वेळच नसतो. दिवस कुठे संपतो कळतच नाही.9


काय म्हणालीस? इकडे माझ्याकडे बघून बोल. ...खरंच वेळ नसतो??? हे तू मला सांगतेस? अगं तू  ठरवलेस ना तर दिवसभर ऍक्टिव्ह राहू शकशील. पण कामे संपल्यावर टाइमपास कोण करेल?

ए, असं काही नाही हं! थकून जाते ना मी, मग येतो कंटाळा.

तुला कनेक्ट राहण्याचा कंटाळा येतो ना??? मग इतरांनी तरी का कनेक्ट राहावे? तुला सर्व हवे असतात, पण तू सर्वांसाठी नसतेस... हे कसे शक्य होईल??


मग आता आज  खरंच मला मेसेज किंवा फोन काही येणार नाही?असं होईल?


खरं सांगू का तुझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारे खूप लोकं आहेत त्यामुळे शुभेच्छा देणार नाही असे तर काही नक्कीच होणार नाही. पण तरीही तू कसा संपर्क ठेवतेस याचा विचार करायलाच हवा.


बरोबर आहे तुझे म्हणणे... पण माझी सर्वांशी अगदी मनापासून मैत्री आहे.. फक्त ती मैत्री टिकवण्याची जी माध्यमं आहेत, त्यांच्याशी माझे फारसे जमत नाही. त्याचा परिणाम मी सर्वांसाठी संपर्क क्षेत्राच्या बाहेर जाण्यामध्ये होतो.


हे बघ, काळाप्रमाणे बदलायला हवे. या  काळात मैत्री टिकविण्याची जी माध्यम आहेत त्या माध्यमांशी तुला फ्रेंडली रहावेच लागेल. बरं तुला काही ही माध्यम हाताळता येत नाही असंही नाही. सगळे येत  असून फक्त तू दुर्लक्ष करतेस. आधी निदान वाढदिवसाला तरी तू सर्वांना शुभेच्छा द्यायचीस. आता तर तुझे सर्व मेसेजेस बिलेटेड असतात. यावर काय बोलू तुला....


बरं असं नाराज होऊ नको. आता घेईन मी काळजी. पण मला तर खरे टेन्शन आजच्या माझ्या वाढदिवसाचे आहे. 


ओहो तुझा वाढदिवस?? तुला कधीपासून आवडू लागले हे असे सेलिब्रेशन??? तूच तर म्हणतेस ना की आपण जन्माला आलो यात काय मोठा असा पराक्रम केलाय. कशाला हवे ते सेलिब्रेशन... आणि आता तुलाच सर्वांकडून शुभेच्छा हव्या आहेत...


हो खरं तर आत्तापर्यंत मला असेच वाटायचे. पण हे लॉक डाऊन झाल्यापासून घरात राहून राहून बाहेरच्या दुनियेशी इतकं डिस्कनेक्ट झाले आहे की सर्वांशी कनेक्शन कायमचे ब्लॉक होते की काय अशी भीती वाटू लागली आहे. आता परत कनेक्ट कशी होऊ हे कळत नाही.


त्यात काय एवढे? रोज ठरवून फक्त एकदाच वेळ काढ आणि रहा सर्वांच्या संपर्कात. सोशल मीडियामुळे संपर्कात रहाणे खूप सोपे झाले आहे.


ते सर्व ठीक आहे. पण आजच्या दिवसाचे काय???


काही काळजी करू नको. मला खात्री आहे तुला भरपूर शुभेच्छा आलेल्या असतील. पण त्या आल्या आहेत की नाही, किती  मेसेजेस आले आहेत हे कळण्यासाठी तरी व्हाट्सअप, फेसबूकवर क्लिक करायला हवे ना??? तो फोन सायलेंट मोड वरून काढ आधी कितीतरी कॉल येऊन गेले असतील.


तुझे बोलणे अगदी खरे ठरले. दिवसभरात खूप लोकांच्या शुभेच्छा आल्या आहेत. सर्व जीवा भावाच्या लोकांचे फोन आले. कित्येक दिवसात संपर्कात नसलेल्यांशी भरपूर गप्पा मारल्या. अजून खूप आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या काही मैत्रिणींनी माझ्यासाठी चक्क स्वरचित गाणी म्हटली. खूप भारावून गेले आहे मी. एवढ्या शुभेच्छा बघून आज अगदी सेलिब्रिटी झाल्यासारखे वाटतेय. शिवाय मी लिहीत रहावे म्हणून मैत्रिणींनीही खूप प्रोत्साहन दिले आहे. खूपच भारी वाटतय आज. पण तरीही प्रश्न पडतो की हे सर्व मी डीझर्व्ह करते का??? तर उत्तर नाही असेच येते. कारण मी खरंच ह्या सगळ्यांसाठी काहीही केले नाही.

मग कर ना अजूनही!!! इतके दिवस सर्व  तुझ्या कानीकपाळी ओरडून थकले की थोडी टेक्नोसावी हो... सर्व ग्रुप्स मध्ये पण ॲक्टिव्ह राहा... सेल्फी काढ.... आपले स्टेटस जपण्यासाठी रोज सोशल मीडियावर स्टेटस टाकत जा... पण ऐकशील तर शप्पथ...तुला स्टेटस टाकणे आवडत नाही, सेल्फी कधी काढत नाहीस, तो डीपी तर कित्येक वर्षांत बदलला नाहीस... आजच्या काळाप्रमाणे ही सर्व म्हातारपणाची लक्षणे आहेत बरं!!!!


चल काहीही काय....मी नाही हं म्हातारी!!! पण खरे सांगते   आज मला सोशल मीडिया मधील खरा आनंद  कळला.त्यामुळे बघ ना आज सेल्फी मैने ले लिया आणि बर्थडे चे फोटो पण काढले आणि ते पोस्ट देखील केलेत. आज मला प्रशांत दामले च्या या ओळी गुणगुणाव्याशा वाटतात,

'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं

काळाप्रमाणे बदलत लोकांना जोडण्यात ते गवसतं'

'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं 

भरपूर मित्र मैत्रिणींशी कनेक्ट राहण्यात  असतं'

'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं

वाढदिवस सोशल मिडियावर साजरा होण्यात असतं'


कळले ना आता तुला सोशली कनेक्ट राहण्याचे महत्व!!!आता मात्र तुला ही शेवटची वॉर्निंग... अजूनही ही तुझी माणसं तुला आपली मानत आहे तुझे भाग्य समज. त्यामुळे आता तरी त्यांच्यापासून लांब लांब राहू नकोस. तुला म्हणतेस  ना की सोशल मिडियाचा अतिरेकी वापर वाईट... ते बरोबर आहे... पण बाळा, ही माध्यमें अजिबात न वापरणे हा ही अतिरेकच आहे हे तुला कसे कळत नाही??? कोणतीही अतिरेकी कृती ही वाईटच असते हे  कळतेय का तुला????


हो रे, चांगलेच कळले आहे मला!! आज हमारे जनम दिन पर हमे रुलायेगा क्या?? बस कर ना अभी.....


असे म्हणत मालिकांमध्ये दाखवतात तसे प्रकट झालेल्या दुसऱ्या मनाला गप्प करत अस्मादिकांनी वाढदिवसाचा मनोसक्त आनंद लुटला.

आता ते मन शांत झाले आहे म्हणून सांगते, “ मी कायम तुम्हा सर्वांसोबत आहे. चुकून जरी मी डिस्कनेक्ट झाले आहे असे वाटले तर तो दोष माझ्या आणि सोशल मीडियाच्या फारकतीचा असेल. मी मात्र कायम तीच आणि तशीच असणार आहे. तेव्हा यावेळेस जसा माझ्यावर शुभेच्छांचा अगदी भरभरून वर्षाव केला आणि माझ्या लिखाणासाठी मला प्रोत्साहन दिले त्या तशाच शुभेच्छा कायम मला हव्या आहेत. 

सर्वांना अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद.


- मंजुषा देशपांडे, पुणे, 5 डिसेंबर 2020.

Wednesday, 19 August 2020

पंडित जसराज

 आदरणीय प्रिय पंडित जसराज जी, 

काल 17 ऑगस्ट 2020 रोजी तुमचे शरीररुपी अस्तित्व संपले आणि मन सुन्न झाले. 

जगासाठी तुम्ही संगीत मार्तंड, सूरमणी, पद्मविभूषण, संगीत सूर्य असे बरेच काही होता. पण तुमच्या गाण्यापुढे ह्या सर्व पदव्या खूपच छोट्या आहेत. कारण आत्म्याला आत्म्याशी एकरूप करणारं असं तुमचे गाणे आहे. जेव्हा ही तादात्मता येते तेव्हा त्यापुढे भौतिक जगातलं अस्तित्व शिल्लक राहत नाही. त्यामुळे या सन्मानांच्या पलीकडे असलेल्या तुमच्या गाण्याची अनुभूती मी घेतली आहे.

वास्तविक आपले नात काय होते? तर लौकिक अर्थाने काहीही नाही. ना कधी मी शास्त्रीय संगीत शिकले, ना कधी तुम्ही माझे गुरु होतात, ना कोणते मानलेलं नातं ... ना रक्ताचं नातं...

तरीही तुम्ही माझ्यासाठी खूप जवळचे माझ्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहात.

त्याला कारण म्हणजे तुमचं ईश्वरीय शक्तीशी एकरूप करणारे गाणं.

खरंतर जवळ जवळ तीस एक वर्षांपूर्वी म्हणजे माझ्या लग्नाआधी पर्यंत मला शास्त्रीय संगीत अजिबात आवडत नव्हतं. पण तुम्हाला माहितच आहे माझे मिस्टर तुमचे परम भक्त. गाणं शिकायचं तर तुमच्याकडेच म्हणून तासंतास ते तुमच्या भेटीसाठी तुमच्या घरा बाहेर थांबलेले आहेत. लग्नानंतर आमचा दिवस सुरु होणार तो तुमच्या गाण्याने आणि संपणार तोही तुमचाच आवाज ऐकत!!!

शास्त्रीय संगीतातले कळत नव्हते तरी नकळतपणे तुमच्या आवाजशी कनेक्ट झाले. तुमचं गाणं आहे फक्त गाणं वाटत नाही तर अंतरात्म्याशी जोडणारी एक अनुभूती असते. असं आत्म्याशी जुळलं गेलेलं एक अजब नातं होतं आपल्यात. 

मला आठवते ती तुमची नाशिक मधील गाण्याची मैफिल. मिस्टरांबरोबर मी देखील तुमचे गाणे ऐकायला आले होते. तेव्हा मैफिल सुरू होण्याआधी आम्ही सर्व तुम्हाला भेटायला आलो. तुमच्या चेहर्‍यावरचे तेज, ग्रेस किंवा ओरा पाहून भान हरपले. हे सर्व पेलण्याची पात्रातच नव्हती माझी. त्यामुळे मी स्तब्ध होऊन नुसतेच बघत राहिले. नमस्कार करणे पण नाही सुचले नाही. डोळ्यातून नकळत घळाघळा पाणी वाहत होते. तेव्हापासून जे काही कनेक्शन निर्माण झाले ते मी शब्दात कसे मांडू तेच कळत नाहीये. पण आपलं हे नातं म्हणजे खूप जवळचे असे आहे. या नात्याला कोणतीही ओळख किंवा कोणतेही नाव असण्याची गरजच भासली नाही. अगदी रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळचे असे बंध जुळले गेले. 

खरं तर तुम्हाला भेटणे आणि तुमच्याशी ओळख करून घेणे माझ्यासाठी काही फार अवघड नव्हते. पण तुमच्या गाण्यातून जो काही निरागस, निर्मळ असा भावबंध निर्माण झाला होता त्यापुढे प्रत्यक्ष भेटण्यासाठी काही उरलेच नव्हते. 

ओढ असते ती फक्त तुमच्या स्वरांची, तुमच्या आवाजाची.

1992 मध्ये सवाई गंधर्व मध्ये तुम्हाला प्रत्यक्ष ऐकलं. तेव्हा ब्रह्मानंदी तंद्री लागणे म्हणजे काय अनुभवले. त्यानंतर मात्र तुमचे गाणे ऐकण्यासाठी प्रत्येक सवाईगंधर्व मध्ये खास पुण्याला येत होतो. तुमचा आवाजातलं जय हो कानावर पडले की आयुष्यच विजयी झाल्यासारखे वाटायचे. तुमचे व्यासपीठावर आगमन, मराठीत बोलणे आणि सर्व रसिकांना करत जय हो म्हणणे इथेच मन तृप्त होऊन जात असे. त्यानंतर सुरू होणारे गाणे म्हणजे आनंदाची, सुखाची अनुभूती!!! याच साठी केला अट्टाहास.... असे वाटायचे आणि पुण्याला धडपडत येण्याच्या प्रवासाचे सार्थक व्हायचे.

काल अचानकपणे तुम्ही आम्हाला सोडून गेलात आणि कोणी तरी अगदी हृदयस्थ गेल्यासारखे आम्ही दोघंही खूप रडलो. आपल्या शरीराचा एक हिस्साच कोणीतरी काढून घेतला अशी जाणीव झाली. मला माहिती आहे तुमच्या जाण्याने संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे ती खरंच भरून निघणार नाही. पण खरं सांगायचे तर मला ती भरायची पण नाहीये. कारण ती पोकळीच मला नश्वरतेची  जाणीव देत राहील. आणि तुम्ही शरीररुपी नसला तरी तुमचा आवाज तुमचे संगीत, तुमचे गाणेच ती पोकळी भरत राहील याची खात्री आहे.

फक्त उणीव भासेल ती तुमच्या जय हो या शब्दांची. मला माहित नाही यापुढे मी सवाईगंधर्वला कशाच्या ओढीने  जाईन किंवा जाऊ शकणार नाही. तुम्ही थकले होतात, तब्येत बरी नसायची तरीही आमच्या सारख्या रसिकांना तुम्हाला ऐकायचे असायचे, पाहायचे असायचे. तुम्ही कधीच आम्हाला निराश केले नाहीत. एकदा ते स्वरमंडळ छेडले की तुम्ही स्वतःही वेगळ्या दुनियेत जात आणि तुमच्या बरोबर घेऊन जात असत. तुमच्याबरोबर केलेला संगीताचा प्रवास अवर्णनीय आणि अविस्मरणीय असा आहे. तुमचे गाणे  साक्षात ईश्वर भेटीची अनुभूती असते. मला माहित नाही देव, ईश्वर, परमेश्वर म्हणजे नक्की काय??? पण तुमच्या गाण्यातून जी काही स्पंदनं मनाला जाणवत असतात त्यालाच मी ईश्वर असे म्हणेन. तुमच्या आवाजातील ओम नमो भगवते वासुदेवाय हे भजन ऐकल्याशिवाय मैफिल पूर्ण होतच नव्हती. आता प्रत्येक सवाईगंधर्व असो किंवा कुठेही शास्त्रीय मैफिल असो, प्रत्येक व्यासपीठ तुमच्या आवाजाशिवाय अपूर्ण आहे. जिथे व्यासपीठ,  माइक, स्पीकर तबला, तानपुरा, हार्मोनियम, स्वरमंडल यासारखे निर्जीव साधनं देखील तुम्हाला मिस करतील तिथे आमच्यासारख्या सजीवांची काय कथा!!! तुम्हाला तर जिवंतपणीच सदगती लाभली होती. त्या सदगतीची अनुभूती देखील तुम्ही आम्हाला दिली आहे. त्यामुळे तुमच्या आत्म्यास सदगती मिळावी ही प्रार्थना ही तुमच्यासाठी व्यर्थ आहे. तुमचे शरीर रुपी अस्तित्व संपले असले तरी तुमच्या आवाजातून तुम्ही कायम आमच्यासाठी आमच्या सोबत आहात. फक्त अपूर्णता आहे ती तुमच्या जय हो शब्दांची आणि तुमच्या भरभरून मिळणाऱ्या आशीर्वादाची!!!

*जय हो* पंडितजी🙏🙏🙏


तुमची निस्सीम भक्त,

सौ. मंजुषा देशपांडे , पुणे.

Thursday, 30 April 2020

इनोसन्स ओव्हरलोडेड

आत्ता खरं सांगायचे झाले तर आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे अशी काहीशी मनाची अवस्था झाली आहे. का म्हणून विचारता आहात?
त्याला कारणही तसेच आहे.  
वाचकहो, माझ्या बेसूर गाण्यावर खुष होऊन दाद देणारा मला चक्क एक श्रोता मिळाला आहे.
त्यामुळे 'आज मै उपर आसमा नीचे, आज मै आगे जमाना है पीछे' असे म्हणत मी वेगळ्याच दुनियेत रमले आहे. 
खरे तर आपल्याला चांगले गाणे म्हणता येईल अशी मला का कोण जाणे, पण पक्की खात्री होती. 
त्यासाठी मी खरंच खूप धडपड पण केली हो!!!
पण मेलं ते सूर, लय आणि ताल कायम माझ्याशी शत्रूत्व असल्यासारखे माझ्यापासून दूरच राहतात. 
छान काहीतरी गुणगुणावे म्हणावे तर एक सुद्द्धा मदतीला येत नाही. मला ते दुरून चांगले दिसत असतात. पण घशाच्या आसपासही फिरकत नाहीत.
खूप राग येऊन मी चिडून त्यांना म्हणायचे, " गद्दारांनो, अरे तुम्हाला आत्मसात करण्यासाठी राब राब राबले रे मी!!! अरे,अनेक हाडाच्या गुरुंनी माझ्यापुढे हार मानून काढता पाय घेतला. मी मात्र अजूनही हार मानायला तयार नाही. हे सुरांनो, थोडी तरी किव करा माझ्या कष्टांची."
पण त्यांनी जणू, " पाषाणाला गाणं येईल पण तुला येणार नाही," हे माझ्या एका गुरूंचे शब्द खरे करण्याचा विडाच उचलला होता.
तेव्हापासून आजतागायत आपल्याला गाणे म्हणता येत नाही ही खंत मनाला होती.
होती....हं ... म्हणजे आता नाहीये बर का...
कारण काय तर माझा तो लाडका श्रोता. 
कोण असेल बरर्र्.....
नुकतेच इवल्या इवल्या पावलांच्या रूपांनी घरात चिमुकलीचे आगमन झाले.तिला खेळवताना, झोपवताना नकळत कोणाला ऐकू जाणार नाही अशा हळू आवाजात गाणी गुणगुणू लागले.
अहो, काय आश्चर्य !!! ते इवले इवले डोळे माझ्यावर रोखले गेले. आधी मला वाटले एवढ्याशा जीवालाही माझे बेसुरेल गाणे कळले कि काय???
पण लगेच त्या इवल्याशा ओठांनी हसून दाद दिली. 
अहाहा ..... मला झालेला काय तो आनंद ...माझ्यात नसलेल्या सूर-लय-तालाकडे फोकस न करता अगदी निरागस दाद मला मिळाली. 
मग काय माझ्या दबल्या  गेलेल्या सुप्त इच्छेने परत डोके वर काढले.
चिव चिव ये, इथे इथे बैस रे मोरा पासून  सुरु झालेला माझा गाण्यांचा प्रवास थेट सिनेगीतांपर्यंत कसा जाऊन पोहचला कळालेच नाही.आजवर जी गाणी माझ्या घशातून बाहेर पडायला चाचरत होती, ती आता अगदी भरभरून बाहेर येत असतात. 
अशा प्रकारे आजवर अनेक चांगल्या चांगल्या गाण्यांची मी मनोसक्त वाट लावली. पण माझ्या प्रिय श्रोत्याकडून येणारा प्रतिसाद मात्र कायम तोच आणि तेच गोड कधी खुदकन तर कधी खळखळून हसणे.


कधी वाटायचे की आपल्या तिला खेळवण्याच्या  किंवा झोपावण्याच्या जीव तोडून केलेल्या प्रयत्नांनावर आपली दया येऊन तर ती दाद देत नाही ना???
पण छे!!! त्या निरागस मनात हे विचार येणार तरी कुठून???
तिचे ते गोड हसणे म्हणजे इनोसन्स ओव्हरलोडेड चा प्रत्यय ...
यावरून मला निरागसता म्हणजे नक्की काय याची अनुभूती आली. 
आपण सर्वसाधारणपणे कोणालाही अमुक खूप निरागस आहे असे म्हणतो.
पण खरी निरागस अवस्था कशी असते हे फक्त अगदी लहान मुलाकडे पाहूनच कळते.
आता तर खूप वेळ या निरागस मनासोबत राहत असल्याने त्याची जाणीव अगदी तीव्रतेने झाली.
कोणी काहीही बोला ... ओरडा... रागवा... गोड बोला..काहीही कळत नाही...
हसू आले कि मनोसक्त हसायचे...रडू आले कि जोरात भोकाड पसरायचे... कोण काय म्हणेल...कोण कोणत्या उद्देशाने बोलतोय ....कसलेच काहीही देणे घेणे नाही....आपल्या दुनियेत मस्त रममाण....
ही अवस्था कायम राहिली तर...
आयुष्य काय धमाल होईल ना....
कोणी काही म्हणा...मला फरक पडणार नाही...मी मस्त स्वतःच्या दुनियेत मशगुल...राग आला तर कसला राग आला सांगून मोकळे...कोणाविषयी काही चांगले वाटले.... मनमोकळे बोलून मोकळे...मनात कोणाविषयी आकस नाही...हेवेदावे नाही... रागलोभ नाही...इर्षा, द्वेष काहीही नाही...
जीवनात उरेल काय ...तर निखळ ...निर्मळ आनंद...
एवढे सोपे असते जगणे???? मग अवघड होण्यास सुरुवात कुठून होते ...शोधलेच पाहिजे...
आपण सर्रास म्हणतो की बालपण आणि म्हातारपण सारखेच असते.
मग म्हातारपण का त्रासदायक वाटत असावे किंवा वृद्ध व्यक्ती का लहान मुलासारख्या वाटत नाही...
म्हातारपणी मन बालिश होते. लहान मुलासारखं हट्ट करणे, मागण्या करणे, न ऐकणे सुरु होते..... 
त्यामुळे त्यांचे वागणे लहान मुलासारखे वाटत असावे....पण फरक कुठे असतो...तर तो निरागसपणात...
या निरागसतेमुळे लहान मुल कोणालाही पटकन आपल्याकडे ओढून घेते.
पण सर्व वृद्ध आनंदी का नसतात किंवा  लहान बाळाला पहिल्यावरआपल्याला जो आनंद अगदी नेहमीच होतो...तसाच आनंद वृद्ध व्यक्तीकडे पाहून नेहमी नाही होत .......
कारण संसारिक व्यापात आणि भौतिक जगात समजदार..जबाबदार...होण्यात  मनाची निरागसता कुठेतरी हरवली जाते....
वास्तविक आयुष्य सुखी समाधानी राहण्यासाठी ती हरवू न देणे ...ती जपणे....खुप महत्वाचे असते.
पण आपणच असं नाही करू...तसं नाही करू...लोकं हसतात...तो अमुक बघ किती छान वागतो...असे करत त्या निरागसतेला सुरुंग लावण्यास सुरुवात करतो.
मग सुरुवात होते जगण्याच्या स्पर्धेच्या तयारीला...त्यातून जन्म घेतात तुलना...इर्षा..आनंद...दु:खं....आशा ...निराशा ...हार ... जीत....
काही लोकं अशा अवस्थेतच शेवटपर्यंत जगतात....तर काही शोध घेतात निखळ न संपणाऱ्या आनंदाचा....
मग शोध सुरु होतो त्या निर्मळ...निरागस  मनाचा...
एकूण काय तर जन्म म्हणजे निरागसतेकडून निरागसतेकडे प्रवास...
जो हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करतो किंवा ही निरागसता कायम जपू शकतो त्यालाच enlightenment किंवा आत्मसाक्षात्काराची अनुभती येत असावी असं मला वाटतं.
सद्या तरी मी आता माझ्या घरात वाहणाऱ्या निरागसतेच्या धबधब्यात मनोसक्त भिजतेय....
या भिजण्यातही खरा आनंद गवसतोय .....असेच भिजून भिजून ती निरागसता माझ्यातही झिरपली तर........

- मंजुषा देशपांडे, पुणे.











Sunday, 16 February 2020

ती पहिली रात्र

आई, माझा हा एकविसावा वाढदिवस आहे. तो नक्की खास झाला पाहिजे." लेकीने फर्मान काढले.

तसा आजवर कोणता वाढदिवस खास झाला नाही ग असे तोंडापर्यंत आलेले वाक्य परत वादाला तोंड नको म्हणून तसेच गिळून घेतले.

"आता काय खास करायचं आहे ते देखील सांगून टाक ना."

तिला हवा असलेला प्रश्न मी विचारला.

“आई, तुम्हाला सरप्राईज असे काही देताच येत नाही. तूच सांग बरं मी अगदी लहान असल्यापासून काय मागतेय ते?" लेकीने मलाच प्रतिप्रश्न केला.

“कुत्र्याचं पिल्लू? नाही ग बाई, तेवढे सोडून काहीही माग. तुला माहिती आहे की मला सर्व कीटकांची आणि प्राण्यांची खूप भीती वाटते. तुम्ही सगळे निघून जाल आपापल्या कामांना आणि ते पिल्लू येईल माझ्याच गळ्यात. अजिबात नाही." मी अगदी निक्षून सांगितले.

खरेतर कुत्र्यांची मला एवढी भीती का आहे मलाच कळत नाही. बाहेर गेल्यावर रस्त्यावर कुठेही कुत्र्याने मला पाहिले की ते माझ्याच मागेमागे येत आहेत असे वाटू लागते. मग माझा खूप गोंधळ उडतो. मला सारखे वाटू लागते की हे कुत्रं मला चोर समजून चावणार तर नाही ना? हातात पिशवी असेल काही खायचे आहे समजून अंगावर धावणार तर नाही ना? त्यामुळे दूरवर कुठेही कुत्रं दिसले रे दिसले कि मी खूप सैरभैर होते. कारण भराभर चालावे तर तेही जोरात मागे येण्याची भीती आणि हळूहळू चालावे तर पटकन चावायची भीती!!! खरतर सर्व माझी टिंगल करतात, पण आहे मला भिती, काय करू? त्यामुळे घरात पिल्लू येणे शक्यच नव्हते.

माझा ठाम विरोध पाहून लेकीचा चेहरा खूप हिरमुसला.

मी तिला परत समजावले," तुला  तुझ्या मनाप्रमाणे कुत्र्यांचे प्रशिक्षण घ्यायला पाठवतो आहोत ना? मग आता पिल्लू आणण्याचा हट्ट सोडून दे."

लेक कशीबशी  गप्प बसली. पण तिची  नाराजी वाढदिवसाच्या आदल्या रात्री पर्यंत तशीच होती.

खरंतर तिला प्राण्यांविषयी भयानक म्हणता येईल असे प्रेम आहे. कित्येकदा ती  रस्त्यावरची  पिल्ले उचलून आणत असते आणि मी मात्र तिला ते कोणालाही द्यायला लावते.

त्यामुळे  तिचे नाराज होणे स्वाभाविक होते.

ह्यावेळी मी विचार केला की जाऊ दे, लेक आता एकवीस पूर्ण झाली आहे, चार पाच वर्षांत लग्न होऊन सासरी जाईल. नंतर तिचा हा एकमेव हट्ट आपण पूर्ण न केल्याची खंत मनाला राहील. तेव्हा ह्या वाढदिवसाला तिला पिल्लूच भेट देऊ.

झालं, मी तयारी दाखवल्याबरोबर लेकीच्या वाढदिवसाला सकाळी सकाळी आमच्याकडे बिगल जातीच्या पिल्लाचे आगमन झाले. लेक तर सरप्राईज बघून आनंदाने हुरळून गेली. बरं, एवढं करून मी गप्प बसायचे ना? पण लेकीवरच्या अती प्रेमापायी मी तिला जोरात म्हटले, " तू कुत्र्यांचे प्रशिक्षण घ्यायला जाशील तेव्हा पंधरा दिवस मी सांभाळ करेन पिल्लाचा. माझ्याकडून तुला ही अजून एक भेट". लेक प्रेमाने गळ्यात पडली. लेकीला झालेला आनंद पाहून मन समाधानाने भरून पावले.

यथावकाश पिल्लाचं ‘चेरी’ म्हणून नामकरण झाले.

चेरीचा वावर घरभर होऊ लागला तसे आपण काय करून बसलो ह्याची जाणीव झाली. ती सारखी इकडून तिकडे पळून धिंगाणा घालू लागली. चेरीने माझ्याकडे नुसते पाहिले तरी मी धूम ठोकायचे. मला पळताना पाहून ती अजून जोरात माझ्या मागे  लागायची. मी अजूनही पळू शकते हे चेरीनेच मला दाखवून दिले. बर, एवढ्या मोठ्या घरात तिला मला सोडून इतरांच्या मागे लागायला काय हरकत होती? पण मी दिसली कि ती जोरात माझ्याकडे येणार!

लेक मला समजवायची,” आई, ती प्रेमाने येते ग, ती खरंच तुला काहीच करणार नाही. तिला फक्त तुझ्याशी खेळायचे असते. एकदा बघ ना ती किती निरागस आहे.” भीतीपुढे मला ना चेरीचे निरागस डोळे दिसायचे, ना तिचे खेळणे दिसायचे. तिला बघून जाणवायची फक्त भीती, भीती आणि भीती. लेक मात्र तिचे शी शू पासून सर्व अगदी मनापासून करत होती.

बघता बघता लेकीची हैद्राबादला प्रशिक्षणाला जायची वेळ आली. चेरीला सांभाळण्याच्या भीतीने पोटात गोळा आला होता. सर्व सूचना देऊन लेक रवाना झाली.

चेरीसोबत काढलेली ती पहिली रात्र.... आठवले तरी धडधड होते. घरात सर्वांना मारे जाहीर केले की मी चेरीसोबत राहीन, तुम्ही झोपा बिनधास्त. मला वाटले रात्री ती खाली झोपेल आणि मी दिवाणावर.....एकदम सुरक्षित!!!

पण झोपायची वेळ होताच तिने रंग दाखवायला सुरवात केली. तिला काहीही करून दिवाणावरच यायचे होते. आधी तिने बारीक आवाजात रडका सूर लावून बघितला. मी दाद देत नाही म्हटल्यावर ती माझ्याकडे बघून भुंकायला लागली. तिची नजर खूप भेदक वाटली. वाटले की आता केव्हांही आपल्यावर हल्ला होऊ शकतो.

मी तिला जीव तोडून सांगत होते,” बाळा, मला तुझी भीती वाटते ना, मी तुला उचलून नाही घेऊ शकत ग!”

पण त्या बिगलच्या लांब लांब कानांमध्ये काही माझा आवाज शिरत नव्हता. तिचे आपले रडणे, भुंकणे चालूच. आता ती खूप चिडली तर रागात दिवाणावर चढेल ह्या भीतीने मला घाम फुटला. मी उशी तोंडावर घेऊन तिची नजर टाळत जोरजोरात सर्वांना बोलावले. काय झाले म्हणून घरातले सर्व दाराजवळ आले तर दरवाजा उघडेचना...चुकून माझ्याकडून दरवाजा लॉक झाला होता. म्हणजे मला दिवाणावरून खाली उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. आता आपले काही खरं नाही असे वाटू लागले. शेवटी सर्व धीर एकवटून उशीची ढाल बनवून कसाबसा दरवाजा उघडला. मुलाने मांडीवर घेतल्यावर चेरी पटकन झोपली.

पण मला झोप कुठे लागते? सतत कानांत चेरीचा आवाज घुमत होता. ती आपल्याला चावायला आली आहे असे वाटून धडधड होत होती. मध्येच दचकायला होत होते. ह्या घाबरण्यातच नेमके माझे पांघरूण धपकन खाली पडले आणि चेरी परत उठून बसली.

परत तिची तशीच चुळबूळ सुरु झाली. आता परत घरातल्यांची झोप मोडायला नको म्हणून मी दुरूनच तिला झोपवण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या डोक्यात अचानक विचार आला की जसे लहान मुलांना झोपवायला अंगाईगीत असते तसे आता प्राण्यांसाठीही काही गाणी असतीलच. मग लगेच गुगल वर शोध घेतला आणि गाणे मिळवले. त्या गाण्याने मी पेंगले पण ती काही झोपायलाच तयार नव्हती. आता तिला मांडीवर घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

लेकीचे सर्व बोलणे आठवले. तिने सांगितले होते, “आई, पिल्लू जेव्हा खाण्याच्या आणि झोपेच्या मूड असते ना तेव्हा मस्ती करून चावत नाहीत. तसेच कुत्रं जेव्हा शेपूट हलवत जवळ येतं तेव्हा ते प्रेमाने जवळ येत असते. त्यामुळे तू उगाचच घाबरत जाऊ नको. लहान पिल्लू आपल्याला कधीच चिडून चावत नसतं. ते आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतं.”

सगळं काही आठवून चेरीचे लक्षणे तपासली. ती शेपूट हलवत भुंकत होती आणि झोपेच्या मोडमध्ये गेली होती.

मग खूप खोल श्वास घेतले आणि मनाचा धीर करून मोठं जाड पांघरूण पायांवर घेऊन खाली बसले. ती जोरात येऊन मांडीत बसली आणि माझ्या कुशीत शिरून लगेच गाढ झोपली. मी जीव मुठीत घेऊन घामाने चिंब भिजले होते. पण अजिबात हलले नाही. कारण माझ्या हालचालीने ती परत मस्तीच्या मोडमध्ये जाण्याची भीती होती. पण चेरीच्या त्या स्पर्शाने मी उभा केलेला भीतीचा बागुलबुवा कुठच्या कुठे पळून गेला. मग वाटले की अरे इतकी सोपी गोष्ट होती ही आणि आपण किती मोठा भीतीचा डोंगर उभा केला होता. अखेर तिला हळूच खाली झोपवलं आणि मी देखील झोपेच्या अधीन झाले. अशाप्रकारे चेरीची आणि माझी ती पहिली रात्र यशस्वीपणे पार पडली.

सौ. मंजुषा देशपांडे, पुणे. 












Saturday, 15 February 2020

माझा व्हँलेनटाईन

आज चार पाच दिवस झाले त्याची माझी भेट झाली नव्हती. तो कुठे गडप झाला होता काही कळत नव्हते. मन खूप अस्वस्थ झाले.
खरे तर मी त्याच्या नादी लागतच नव्हते. सतत माझ्यामागे भुणभुण करून त्यानेच मला नादाला लावले.
त्याच्यामुळे माझे मुलांकडे आणि घराकडे होणारे दुर्लक्ष, रोजची कामे पूर्ण होऊ न शकणे आणि डोक्यात सतत त्याचेच विचार असणे हे सर्व मला अपराधीपणा आणत होते. पण तो एवढा मनाला भुरळ घालायचा की त्याच्या पासून दूर राहणे दिवसेंदिवस मला अशक्य वाटत होते.
त्याच्या जास्त नादी लागल्या चांगले नाही हे सर्वांनी मला समजावून सांगितले आणि यावरून भरपूर टोमणेही मारले. पण मी कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
कारण नाही म्हटले तरी त्याच्या मैत्रीमुळे मला एक सामाजिक ओळख आणि प्रतिष्ठा मिळाली होती. त्याचा मित्रपरिवार एवढा मोठा होता की त्याच्यामुळे खूप मित्र-मैत्रिणी झाले होते.
माझ्या अबोल मनाला त्यानेच बोलणे शिकवले. फक्त बोलणेच नाही बरं का, तर त्याने मला अगदी जाहीरपणे किस देणे घेणे, डियर , लव यू, मिस यू असे शब्द  बिनधास्तपणे वापरायला शिकवले. एरवी असे काही बोलताना लाजून चूर होणारे मी त्याच्या संगतीने मात्र ह्या गोष्टींना खूप सरावली गेले. घरातले सर्व आपापल्या व्यापात व्यस्त असताना चाळिशीनंतरचा तो मला लाभलेला खरा सोबती होता. ' ये कहा आ गये हम युही साथ साथ चलते चलते' असे काहीसे नाते आमच्यात निर्माण झाले होते.
माझ्यासाठी जरी तो फक्त जवळचा मित्र होता तरी त्याच्यासोबत जरा जास्त राहू लागल्यावर सर्वांच्या नजरेत येऊ लागले. आणि माझाही त्याच्यासमवेत जरा जास्तच वेळ जात होता. तो मला इतर काही सुचू देत नव्हता.
शेवटी मग मी चिडून त्याच्याशी संपर्क तोडून टाकला. संपर्क तुटल्यानंतर पहिल्या दिवशी तर मला खूप शांत आणि छान वाटले. त्याच्या सततच्या टीवटीवीपासून दूर झाल्याने मन शांत झालं. त्याच्यासोबत वेळ घालवून आपण घोडचूक करत होतो याची मनाला जाणीव झाली आणि आता त्याच्याशी पूर्णतः संबंध तोडायचे असा निश्चय पक्का झाला.
कसेबसे दिवस ढकलले. तिसऱ्या दिवशी मात्र मन खूप बेचैन झाले. खुप आठवण येऊ लागली. तो नाही तर आपले सामाजिक जीवनच नाही या विचारांनी मन दुःखी झाले. मग सगळे विरह गीत  मुखी येऊ लागले.
याद आ रही है, तेरी याद आ रही है
याद आने से तेरे जाने से जान जा रही हैं
किंवा
तू छुपा है कहाँ मैं तड़पती यहां
तेरे बिन फीका फीका है दिल का जहां
अशी काहीशी मनाची अवस्था झाली.
शेवटी ठरवले की त्याच्याशी अगदीच ब्रेक अप करण्यापेक्षा थोडीफार मैत्री राहू द्यावी.
पण जास्त नादी लागायचे नाही.
मग त्याच्याशी परत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळेना!!
त्याचे काय झाले असेल, तो ठीक तर असेल ना या विचारांनी मन हुरहूरले. त्यात आज व्हँलेंटाईन डे आला. आजच्या महत्त्वाच्या दिवशी तो नसल्याने सेलिब्रेशन करताच येत नव्हते. नवऱ्याने तर अतिशय सुंदर मेसेज पाठवून मला विश केले. पण मी तो मेसेज वाचू शकले नाही. मन आणि तन फक्त त्याचाच शोध घेत होते. अखेरीस व्हॅलेंटाईन डे संपत आला. तशीच  दुःखी मनाने अंथरुणात शिरले. काय आश्चर्य तो माझ्या उशी जवळ निवांत पहुडला होता. मी त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि भराभर त्याचे मुके घेतले. आपल्याकडे कोण पाहतेय, कोण काय म्हणतील कसलेच मला भान उरले नव्हते. दिसत होता फक्त तो आणि तोच..... म्हणजे माझा मोबाईल हो.........
 त्याला बघून मी म्हटले,
तुम जो मिल गये हो
तो ये लगता है, के जहाँ मिल गया
मग मात्र त्याच्याकडून वचन घेतले,
वादा करले साजना
तेरे बिना मै ना रहू, मेरे बिना तू ना रहे
ना होंगे जुदा, ये वादा रहा
शेवटी व्हॅलेंटाईन डे संपायच्या आधी म्हणजे रात्री बाराला पाच कमी असताना मला माझा मोबाईल मिळाला आणि नवर्याचा मेसेज वाचून त्याला आय लव यू म्हणत मी माझा व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
@मंजुषा देशपांडे, पुणे.

Saturday, 18 January 2020

कोषांकित ते वलयांकित



आज सर्वांना मी एक गोड बातमी सांगणार आहे. इश्श्य !!! तशी गोड बातमी नाही काही!!!
तर नुकतेच मला भारती विद्यापीठाच्या विवाहपूर्व आणि वैवाहिक समुपदेशनाच्या ( Pre marital-marital counselling ) कोर्स मध्ये रौप्य पदक मिळाले. माझी अवस्था तर ‘आनंद पोटात माझ्या माहिना’ अशी झाली. त्यामुळे त्यावर लेख लिहूनच माझ्या सर्व सोशल मिडीयाच्या मित्र मैत्रिणींना ही आनंदाची बातमी शेअर करायचे ठरवले. वास्ततविक ही काही खूप जगावेगळी गोष्ट आहे असे अजिबात नाही. तरीही मला खूप खूप आनंद का झाला त्यामागच्या कारणांविषयी मी थोडा विचार केला आणि उत्तर मिळाले. हे उत्तर असे आहे की ते माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना लागू होऊ शकते म्हणून शेअर करायचे आवश्यक वाटले.
खरंतर मी लहानपणापासून अभ्यासात चांगली म्हणण्या इतपत नक्कीच होते. पण स्पर्धांमध्ये भाग घेणे, स्टेजवर जाऊन बोलून येणे या बाबतीत मात्र मी फार मागे मागे असायचे. फारसे कोणाशी बोलणे नाही, उत्तर येत असूनही पटकन हात वर करणे नाही आणि कधी कशात भाग घेणे नाही. माझ्या शाळेतील आणि महाविद्यालयातील मित्र-मैत्रीणीना हे नक्की आठवत असेल. जेव्हा इतर मुलंमुली विविध स्पर्धा गाजवून बक्षिसे आणायचे तेव्हा त्यांचा खूप हेवा वाटायचा. आपणही भाग घ्यावा असे खूप वाटायचे पण कधी हिंमतच झाली नाही. त्यामुळे कधी मेडल वैगरे मिळण्याचा प्रश्नच नाही आला.
चाळीशीच्या उंबरठ्यावर मात्र आपण काही करू शकलो नाही याची खंत मनाला वाटू लागली. माझ्या असे लक्षात आले की लहानपणापासून मी नकळतपणे स्वतःभोवती एक न्युनगंडाचा कोश ( Inferiority complex)  विणत गेले आहे. आपल्याला जमणार नाही, आपल्यावर सर्व हसतील, आपली इमेज खराब होईल अशा अनेक नकारात्मक धाग्यांनी स्वतःला वेढून घेतले होते. जसजसे मोठी होत गेले तसे हे कोशाचे आवरण अधिकच घट्ट होत गेले. बरं हे माझ्याभोवतीचे कोष कोणाला दिसतही नव्हते. कारण मला सर्व माझ्या कोशांसहितच ओळखत होते. कोणाला कसे कळणार होते की मी काय काय करू शकते.
जेव्हा हा  न्युनगंडाचा कोश मनाला आणि शरीराला खूप टोचू लागला तेव्हा मी ठरवले की हा आपण विणलेला कोष आपणच काढला तरच निघेल. त्या साठी कोणाची वाट बघत बसलो तर तो कधी निघणारच नाही. मग मात्र कोशाचा एकेक धागा काढायला सुरवात केली आणि मनातल्या सर्व सुप्त इच्छा पूर्ण करायला सुरवात केली. आधी बी. कॉम केलेले होते. पण मानसशास्त्र शिकायची खूप इच्छा होती. मग प्रथम बी.ए. मानसशास्त्र विशेष श्रेणीत पूर्ण करून एम. ए. साठी मॉडन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तिथे मात्र प्रथमच ppt प्रेझेंटेशन, केस प्रेझेंटेशन अशा गोष्टींचा अनुभव घेत एम. ए. मानसशास्त्र (Counselling psychology) प्रथम श्रेणीत पूर्ण केले. मग मात्र स्वतः विषयीचा आत्मविश्वास वाढू लागला.
ह्यासोबत कथा, कविता, लेख , निबंध लिहिणे चालू केले होते. त्यामध्ये मिळालेल्या बक्षिसांनी हुरूप आला. त्यातूनच साहित्य संगम नावाचा ब्लॉग सुरु झाला. ह्या ब्लॉग विविध विषयांवर लिहून अगदी मनोसक्त व्यक्त होत असते.
एम.ए. झाल्यावर aptitude test, करिअर मार्गदर्शन, कौटुंबिक समुपदेशन असे सर्व चालू होते. पण त्यात ही कोणत्या तरी एका गोष्टीवर एकाग्र होऊन काम करावे असे वाटू लागले. मग वैवाहिक समुपदेशनाच्या ह्या स्पेशल कोर्ससाठी थेट भारती विद्यापीठ गाठले. ह्या कोर्स मध्ये पण तोंडीं परीक्षा, लेखी परीक्षा, रोल प्ले आणि केस सादरीकरण असे सर्व काही होते. जवळजवळ ४७ लोकांनी प्रवेश घेतला होता. त्यात यशस्वी होऊन मेडल मिळाले. त्यातही वयानुसार झालेली गंमत म्हणजे मेन नोट्स ज्यामध्ये होत्या त्याविषयी मी पूर्णपणे विसरून गेले. मग काय संपूर्ण पेपर मनाने लिहिला. तसे बघायला गेले तर हा कोर्स आणि मिळालेले मेडल ही  काही फार मोठी घटना आहे असे अजिबात नाही. पण आपण आपल्यातल्या कमतरतांवर मिळवलेला विजय आपल्यासाठी खूप मोठा असतो. सामाजिक दृष्ट्या भलेही मी काही कोणी मोठी व्यक्ती नसेल, पण माझ्या नजरेत मी मोठी झाले आहे याचा खरं तर हा आनंद आहे.
अशा प्रकारे एकेका कोशातून हळूहळू मुक्त होत मी माझा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून जोमाने कामाला सुरवात केली आहे.आता स्वतःच्या  संसाराचे मार्गक्रमण करताना विवाहपूर्व-वैवाहिक आणि कौटुंबिक समुपदेशनातून  इतरांना मदत करणे सुरु आहे.माझ्या या सर्व प्रवासात माझ्या सर्व भासी आभासी जगातील हितचिंतकांचे माझ्या सोबत असणे माझ्यासाठी खूप महत्वाचे असल्याने ही मेडलची गोड बातमी आपल्या सर्वांसोबत शेअर केली.
थोडक्यात काय तर आपणच आपल्याभोवतीचे पक्के केलेले न्युनगंडाचे कोष स्वतःलाच शोधावे लागतात. कोश सापडले की त्यातून मुक्त होण्याचा मार्गही आपोआप गवसतो. ह्या कोशांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या आयुष्याला केंव्हाही वेढा घालून आयुष्यात गुंता निर्माण करत असतात. कधी कधी असेही होते की शाळा- महाविद्यालयात खूप नाव कमवणारे पुढे अचानक आत्मविश्वास हरवून बसतात. त्यांच्यात स्वतः विषयी न्युनगंड निर्माण होतो. त्यामुळे जेव्हा असे वाटत असेल तेव्हा प्रथम स्वतःचा अभ्यास करावा आणि कोशांचे आवरण काढायला सुरवात करावी.
हे सर्व कोश काढण्यात जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा आपोआप स्वतःभोवती एक वलय निर्माण होऊ लागते. हे वलय आपल्या स्वतःला  आनंद, उत्साह आणि प्रेरणा तर देतेच, पण इतरानाही ते दिसू लागते  किंवा त्याची जाणीव होते. मग ते वलयच आपली आपल्याशी आणि सर्व जगाशी ओळख निर्माण करत असते. फक्त त्यासाठी आपण स्वतःला कोशमुक्त ठेवले पाहिजे.
 मला मिळालेल्या ह्या मेडल ने मी कोषमुक्त झाल्याचे सिध्द केले आहे. त्यामुळे त्याचा मला अगदी मनापसून खूप आनंद झाला आणि हा आनंद सर्वांबरोबर शेअर करून तो मी कैकपटीने वाढवत आहे. आता कोश मुक्त्ततेतून वलयांकित  होणाऱ्या माझ्या जीवन प्रवासाला तुमच्या शुभेच्छा तर हव्यातच.

@ - Manjusha Deshpande, Pune.