लेख मंजुषा

Happy Anniversary “हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?” ती लगेच म्ह...

Saturday, 6 April 2019

गुढी पाडवा

चैत्र शुक्ल प्रतिपदा हा दिवस नववर्षाचा पहिला दिवस म्हणून भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
ह्या दिवशी दारोदारी रांगोळ्या काढून गुढ्या उभारल्या जातात म्हणून या सणाला गुढीपाडवा असे म्हणतात. मागच्या वर्षीची गोष्ट.
मी गुढी उभारण्याची तयारी करत होते. माझी तयारी बघून मुलाने मला पहिला प्रश्न विचारला, “ आई, गुढी का उभारतात?"
आता मी काही कधी एखादी गोष्ट आपण का करतो हे जाणून घेण्याच्या फंदात पडले नव्हते.
त्यामुळे मला जे माहित होते त्याप्रमाणे मराठी माणसांचे नवीन वर्षाचे साजरीकरण, श्री राम चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परत आले उत्सव म्हणून गुढी उभारतात आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक त्यामुळे शुभकार्याची सुरुवात वगैरे वगैरे मी मुलाला सांगितले. पण त्याचे काही फारसे समाधान झालेले दिसले नाही. उलट आपण लोक या गोष्टी फार वेळ घालवतो असे स्पष्ट मत मांडून तो मोकळा झाला.
पण तेव्हापासून माझ्या मनात आलाच की खरच नक्की काय उद्देश असेल गुढी उभारण्यामागे?
एक दिवस अचानक मला ह्या प्रश्नावर समाधानकारक असे उत्तर मिळाले.
पुण्यात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सत्संग मध्ये गेले असताना गुरुजींनी म्हणजे श्री श्री रविशंकर यांनी नेमके विषय घेतला की तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की आपण गुढी का उभारतो?
मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळणार म्हणून अगदी खुश होऊन मी लक्षपूर्वक त्यांचे बोलणे ऐकू लागले.
तेव्हा ते म्हणाले रामाने विजय मिळवला, नववर्षाची सुरुवात हे सर्व ठीक आहे. पण आपले पूर्वज खूप बुद्धिमान होते. प्रत्येक सणांच्या कृतीमागे काहीतरी जीवन उपयोगी अर्थ असतो. तो आपण समजून घेऊन जर ते सण साजरे केले तर खरा आनंद लुटता येतो.
पुढे गुरुजींनी गुढी उभारण्याचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध खूप छान उलगडून सांगितला. ते म्हणाले की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लाकडी बांबूवर तांब्या उलटा का घातला जातो? कारण तांब्या हे डोक्याचे प्रतीक आहे. नवीन वर्षाचे स्वागत तांब्या पालथा घालून म्हणजेच डोके रिकामे करून केले पाहिजे.
डोक्यातील सर्व भूतकाळातील विचार, मतभेद, भांडण, जीवनाविषयीची आसक्ती, सुखदुःख असे सर्वकाही रिकामे करून नवीन वर्षाचे स्वागत एकदम ताज्या डोक्याने केले पाहिजे.
वास्तविक हिंदू संस्कृतीत कोणाचा मृत्यू झाला तरच तांब्या उलटा करून ठेवतात. पण गुढी उभारताना आपण काठीला नवीन वस्त्र घालून सजवून वर तांब्या उलटा ठेवतो.
येथे नवीन कपडा हे नवजीवनाचे प्रतिक आहे. डोके रिकामे करून नववर्षात नव्या जीवनात प्रवेश केला पाहिजे.
ह्या गुढीला लावली जाणारी कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, गोड हार हे जीवनाचे रस आहेत. जीवन सगळ्या रसांनी परिपूर्ण असले पाहिजे. कडुलिंब हे तर शरीर रक्षण करणारे आहे. सर्व आजारांपासून दूर ठेवणारी रोगप्रतिबंधक शक्ती कडुनिंबाचा असते. गुढी बरोबर कडुलिंब लावल्याने वातावरण निर्जंतुक होते; पण हा कडुलिंबाचा पाला आपल्याला जीवनात कितीही कटू प्रसंग, प्रतिकूल परिस्थिती आली तरी त्यावर मात करायला शिकवतो. कडूलिंब हा आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.
गुढीला घातला जाणारा गोड साखरेचा हार हा जीवनातील मधुरतेचे प्रतिक आहे. जीवन विशाल होण्यासाठी दोन्ही गोष्टी पचवण्याची ताकद आपल्यात असायला हवी हेच कडुलिंब आणि गोड हार सांगतो.
त्यामुळे अशी ही गुढी उभारून तिची पूजा करणे म्हणजे आपल्या जीवनाची पूजा करणे होय.
सर्वार्थाने रिकामे झाल्याचा आनंद साजरा करणे म्हणजे गुढी उभारणे होय.
स्वतःचा सन्मान करणे म्हणजे गुढी उभारणे होय.
अशी ही गुढी प्रत्येक घर आपापल्या दारात उभारून जणू सांगत असतो की आम्ही मागील सर्व काही विसरून आता रिकामे झालो आहोत. आता आमच्या मनात कुठलीही अढी नाही, मतभेद नाही. त्याचेच प्रतीक म्हणून ही गुढी उभारली आहे.

ही उभारलेली गुढी आपण संध्याकाळी उतरवून ठेवतो. कारण उलटा तांब्या म्हणजे आपले डोके हे कायम रिकामे ठेवून चालणार नाही. तर गुढीपाडव्याला सर्वकाही खाली ( रिकामे) करून नंतर ज्ञान, प्रेम, आनंद, सुखदुःख सर्वकाही भरायला आपण तयार होत असतो.
अशा भावनेने जर सर्वांनी गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला तर आपापसातील लढाई, भांडणे, मतभेद नाहीसे होऊन आपण सर्व खऱ्या अर्थाने नव्या वर्षाचे स्वागत करू शकू.
आतापर्यंत घरोघरी गुढ्या उभारल्या गेल्या असतीलच. त्यामुळे गुढी पुढे उभे राहून प्रार्थना करू की ही सर्व प्रतीके आपल्या जीवनात यशस्वीपणे अंमलात येऊ दे आणि जीवनातील अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत स्थिर राहून आपल्याबरोबर इतरांच्याही आयुष्यात आनंद निर्माण करत गुढीपाडवा साजरा करू.
सर्वांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

@मंजुषा देशपांडे

Wednesday, 27 March 2019

"I is"


तो माझ्यावर खूप चिडला होता. रागारागात बडबडत होता," काय ग हे? किती वेळा तुला तुझ्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची जाणीव करून दिली, पण तुझ्यात काही  फरकच नाही.”
ए, असे नको ना बोलू, तुझ्याशिवाय माझे अस्तित्वच नाही रे... असं रागावू नकोस ना!! मी त्याची समजूत घालण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते.
अर्थात त्याचे रागावणे स्वाभाविकच होते. मी माझ्या धुंदीत जगत होते. संसारामध्ये मी स्वतःला इतके गुंतवून घेतले होते की त्याच्याशी काही संबंध नसल्यासारखेच वागत होते. त्याची बडबड मला वेळोवळी जाणीव करून द्यायची की तू चुकीचे वागत आहेस. अजूनही भानावर ये. मीच तुझी खरी काळजी घेणारा आहे, असे दुर्लक्षित करू नकोस.
पण मी नेहमी प्रमाणे दुर्लक्षच केले.

पण त्या दिवशी अशी काही घटना घडली की मी खडबडून जागी झाले आणि मला त्याच्या उपदेशाचे शब्दन् शब्द आठवत होते.
असे नक्की काय झाले होते..... अचानक माझी तब्येत बिघडली. हृदयातील धडधड वाढली आणि ती काही केल्या थांबेना. त्यामुळे थेट दवाखान्यात भरती व्हावे लागले.
वयानुसार धडधडीचे अर्थ कसे बदलत जातात ना? तरुण वयात ” घडी घडी मोरा दिल धडके, क्यू धडके” याचा अर्थ गुलाबी दिवस, प्रेम,आनंद, सुख याची अनुभूती, या धडधडीत असते. थोडक्यात काय सर्व सकारात्मक भावना.
पण चाळिशीनंतरची धडधड मात्र “घडी घडी मोरा दिल धडके ,क्यू धडके” याचा अर्थ शोधायला आयसीयूत नेऊन ठेवते याचे प्रत्यंतर मी घेतले. या धडधडीत हवेत तरंगण्याची ऐवजी कृत्रिम हवा घ्यावी लागली. कारण दरदरून घाम फुटला आणि अंगातले त्राण गेले.
वेळेवर माझी भाची डॉक्टर प्रियंकाने  प्रसंगावधान दाखवून ताबडतोब दवाखान्यात दाखल केले. काय घडते हे कळेपर्यंत मी स्वतःला आयसीयूमध्ये पाहिले.
तिथे मात्र “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा” याची जाणीव झाली. आपण इतके असहाय्य असतो की जे घडतेय ते स्वीकारण्या पलीकडे काही उरत नाही. वेगवेगळ्या चाचण्या, सलाईन, ऑक्सिजन, डॉक्टरांची धावपळ हे सर्व मी उघड्या डोळ्यांनी पहात होते.
बऱ्याच वेळानंतर माझ्या हृदयाची धडधड पूर्ववत झाली. पतीच्या आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा ताण बघून माझ्या मनात कालवाकालव  झाली. अन मला  त्याची आठवण झाली. पाहते तर काय तो माझी मजा बघत होता. माझ्या डोळ्यांतून सतत पाणी वाहत होते. माझी असहाय्यता मला सहन होत नव्हती. का नाही त्याचे ऐकले? तो कितीतरी वेळा मला धोक्याची जाणीव करून देत होता..... पण मी का दुर्लक्ष केले? का स्वतःला इतके गुरफटून घेतले? मला काहीच सुचत नव्हतं. आपण त्याच्याशी किती बेपर्वाईने वागलो ह्याची जाणीव मनाला अस्वस्थ करत होती. डॉक्टरांनी सांगितले की कोणताही ताण घेऊ नका, एकदम आराम करा. बोलणे, चालणे, दगदग सर्वकाही बंद. सक्तीची विश्रांती घेणे भाग होते. पण हे रिकामपण मला काहीच सुचू देत नव्हते. आयुष्याची गती अचानकपणे मंदावल्याने मन खूप विषण्ण झाले होते. एका वेगळ्या प्रकारची भयाण शांतता मी अनुभवत होते. सतत भावनाविवश होऊन रडू यायचे. मन तर खूपच कमकुवत झाले होते. मला स्वतःला तर त्रास होतच होता; पण आपल्यामुळे साऱ्या कुटुंबीयांवर ताण येतोय आणि त्यांनाही खूप त्रास होतोय हे पाहून जास्त वाईट वाटले. काय अधिकार आहे मला माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माणसांना त्रास देण्याचा? निव्वळ स्वतःकडे झालेले दुर्लक्ष खूप महागात पडले.
पण वाईटातून चांगले म्हणतात ते असे की माझ्या प्रेमाच्या माणसांच्या आग्रहाखातर आमच्या कामवाल्या बाईने माझी दृष्ट काढली. म्हणजे आपण अजूनही दृष्ट लागण्याइतपत सुंदर आहोत त्याचे वेगळेच अप्रूप वाटले. अशा वेळी मात्र कटाक्षाने स्वतःला आरशात बघणे टाळले. दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एरव्ही फारसे व्यक्त न होणाऱ्या नवर्याच्या भरभरून प्रेमाची अनुभूती मला या दुखण्याने दिली. आजवर त्यांचे भरपूर गाण्यांचे कार्यक्रम झाले आहेत. पण आयुष्यात पहिल्यांदा भर कार्यक्रमात " फूलों के रंग से
दिल की कलम से....लेना होगा जनम हमे कई कई बार " हे गाणे चक्क मला अर्पण केले. आता तर हे गाणं फक्त माझं आहे आणि माझ्या ह्रदयावर कायमचे कोरले गेले आहे. एवढ्यात त्यांना खुप वेळा भावनाविवश होताना पाहून मला स्वतःची किती काळजी घ्यायला हवी याची चांगली जाणीव झाली.
गरमागरम आयते जेवण, जेवण करून हात धुवून आडवे होणे, गाणे ऐकणे, वाचन करणे वगैरे वगैरे अगदी स्वर्गीय सुख. जीवलग मैत्रिणीने, अंजूने तर तिचा किमती टॅबच माझ्याकडे सोपवला. त्यावर मस्तपैकी मालिका, चित्रपट बघत आनंद लुटला. किती सहजतेने एवढी किमती वस्तू माझ्या ताब्यात दिली. तसेच मितू , तू मलेशियाहून फोनवर बोलून जो काही मला आधार दिलास ना, त्या वर मी शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. बरं हे सर्व एवढे आपले आहेत ना की या सर्वांचे आभार मानण्यापेक्षा माझ्या या सर्व (नवरा, मुले, सून, बहिण, भाऊ, भावजया, भाचे कंपनी आणि माझ्या सख्या) प्रियजनांना परत कोणालाही त्रास होऊ नये म्हणून मी तब्येतीची काळजी नक्कीच घेईन असे आश्वासन देते.अशा सर्वांच्या शुभेच्छांनी आणि प्रेमाच्या वर्षावाने मी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सावरत होते. पण मनातल्या मनात कुठेतरी कुढणं चालूच होतं. खूप उहापोह झाल्यावर एक गोष्ट लक्षात आली की आपण दुनियेला माफ करतो. पण स्वतःच्या चुकांच्या बाबतीत मात्र," चुकीला माफी नाही" या अविर्भावात स्वतःला माफ करायला कधी तयारच होत नाही. मी असं का नाही केलं, मी तसं काही नाही केलं, मी का शिस्तबद्ध नाही, मी का स्वतःला वेळ दिला नाही, मी का त्याचे ऐकले नाही वगैरे वगैरे.... बाप रेे!!! स्वतःवर आरोपांच्या फैरी झाडत होते. शारीरिक तासापेक्षा हा त्रास जास्त होत होता. माझे जवळचे असे सर्व लोक खूप समजावत होते. पण मनातली खळबळ काही केल्या कमी होत नव्हती.
मग विचार केला की आपण तर इतरांना मोठ्या मनाने लगेच माफ करतो. मग स्वतःच्याच बाबतीत एवढा कठोरपणा का? आधी स्वतःच्या चुकांना माफ केले. स्वतःला खऱ्या अर्थाने जशी आहे तसे स्वीकारले. मग मात्र खूप हलके वाटू लागले. मग मन "I is" म्हणजे मी आहे चा खरा आनंद घेऊ लागले.
    मला वपु काळे यांच्या कथेतील “I is" म्हणजे "मी आहे" हा शब्द खुप आवडला. खरं तर वपूंनी " I is" हा शब्द खूप गमतीने वापरला असला तरी मला तू खूप आपलासा वाटला. आय सी यु मधून सुखरूप बाहेर आल्यावर आपण अजूनही पृथ्वीतलावर अस्तित्वात आहोत ही जाणीव सुखकारक होती. डॉक्टरांनी, " आता तुम्ही सुखरूप आहात पण काळजी घ्या" हे मला सांगता क्षणी मला जोरात ओरडावेसे वाटले, "येस, I is".    
सभोवताली माझी माणसं पाहिली आणि खात्री झाली की  I is.
नंतर माझे घर, माझा फोन, माझे व्हाट्सअप, माझे फेसबुक आणि माझे नातलग, जिवलग सख्या पाहून मी मनातल्या मनातच खुश होत म्हंटले, Yes, I is.
स्वतःला अचानक उद्भभवलेल्या दुखण्यातून सुखरूप बाहेर आलेले पाहून, " एकाच ह्या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी" असच जगायच असे आता ठरवून टाकले.
कारण आयुष्यात आपण खूप काही करायचे ठरवत असतं. पण पुष्कळदा त्यासाठी वेळ काढला जात नाही. मी देखील माधुरी दीक्षितचा चित्रपट पाहून माझी " बकेट लिस्ट" बनवून ठेवली आहे. पुढे वेळ मिळाल्यावर नक्की पूर्ण करू असे मी ठरवले होते. पण माझी वेळ संपते की काय अशी माझी अवस्था झाली होती. पण नाही, मला परत संधी मिळाली आहे आणि आता या संधीचा उपयोग जर मी केला नाही तर माझ्यासारखी मुर्ख मीच असेल त्याची मला पक्की जाणीव झाली आहे.
यासाठी त्याच्याशी दिलजमाई होणे गरजेचे होते. डॉक्टरांनी प्राणायाम व व्यायाम सर्व बंद सांगितले होते. त्यातल्या त्यात ध्यान धारणा करण्यास परवानगी होती. मग काय ध्यान करून शांतपणे त्याच्याशी बोलते झाले. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचा त्याला भयानक राग आला होता.
पण प्रत्येक ध्यानानंतर त्याच्याशी संपर्क साधत एकदाचा सुसंवाद साधला. आता पक्के ठरवले ती काहीही झाले तरी त्याचे ऐकायचे. तो झोप म्हटलं की झोपायचे. उठ म्हटला की उठायचे, व्यायाम करायला लावला तर मुकाट्याने व्यायाम करायचा आगाऊपणा बंद. शहाणपणा करायचा नाही.
कारण मी त्याच्याशी म्हणजेच "माझ्या आतल्या आवाजाशी" प्रामाणिक राहिले तरच लौकिक आणि पारलौकिक जगात " I is " च्या अवस्थेत चिरतरुण राहील. हे कायम लक्षात राहण्यासाठी आपणा सर्वांच्या साक्षाने हे लिहून ठेवले.
@ मंजुषा देशपांडे, पुणे.

Thursday, 14 February 2019

'व्हॅलेंटाईन डे'

पाहूनि आजच्या तरुणाईचा 'व्हॅलेंटाईन डे'
काकूंनी ठरवले काकांना 'विश' करु गडे
😍😍😍😍😍😍😍
'प्रपोज' करणे तर खूप अवघड वाटले
मग नजरेच्या खेळात सांगून बघितले
😉😉😉😉😉😉😉
काकांना कळलीच नाही नजरेची भाषा
काकूंच्या पदरी आली फक्त निराशा
😞😞😞😞😞😞😞
तरीही आळवत राहिल्या त्या 'सेलिब्रेशनचा' सुर
काका मात्र लागू देत नव्हते ताकास तूर
😏😏😏😏😏😏😏
काकूंच्या या विचित्र हट्टाला काका वैतागले
धारदार शब्दांचे अस्त्र काकूंवर उपसते झाले
😡😡😡😡😡😡😡😡
अगं, चाळीस वर्ष झाली आहेत आपल्या लग्नाला
काय हे 'व्हॅलेंटाईन डे' चे 'फ्याड' डोक्याला
😣😣😣😣😣😣😣😣
आपल्या वयोमानाची तरी ठेव थोडीफार जाण
मुले सुना नातवंडांचे पण राख जरा भान
😫😫😫😫😫😫😫
काकांच्या बोलण्याने काकू जरा हिरमुसल्या
पण काहीतरी विचारानी मोबाईलकडे धावल्या
🏃‍♀🏃‍♀🏃‍♀🏃‍♀🏃‍♀🏃‍♀🏃‍♀🏃‍♀
'व्हाट्सॲप'वरुन केला काकांवर किसेसचा मारा
दिलावर दिल पाठवून केला व्हॅलेंटाईन डे' साजरा
😘😘😘😘💞💞💞💞
ह्या ई प्रेमातही काकू झाल्या लाजून लाजून चुर
काकांनी लावला होता मस्तपैकी घोरण्याचा सूर
☺☺☺☺😴😴😴😴
शेवटी कंटाळून काकूही अंथरुणात शिरल्या
उशीखाली त्यांना एक गजरा हाती लागला
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
प्रेमाच्या सुगंधाने काकूंचे डोळे पाणावले
शेवटी ई प्रेमापेक्षा अबोल प्रेमच श्रेष्ठ ठरले
                          अबोल प्रेमच श्रेष्ठ ठरले.
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

सौ. मंजुषा देशपांडे, पुणे.