'साहित्य मंजुषा' म्हणजे मी स्वतः लिहिलेले साहित्य म्हणजेच मंजुषाचे साहित्य. दुसरे म्हणजे मंजुषा म्हणजे खजिन्याची पेटी. या ब्लॉगवर लेख, कथा, कविता, अभंग, हायकू, गजल आणि चारोळी अशा विविध साहित्याचा खजिना वाचकांना लाभणार आहे. तसेच कौटुंबिक, सामजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि मानसशास्त्र अशा विविधांगी विषयांच्या साहित्यिक खजिन्याची मंजुषा ब्लॉगवर असणार आहे. माझ्यात साहित्याची आवड व प्रेरणा निर्माण करणाऱ्या माझ्या वडिलांना हा ब्लॉग समर्पित आहे. वाचकांच्या प्रतिक्रियांचे मनापासून स्वागत.
लेख मंजुषा
Happy Anniversary “हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?” ती लगेच म्ह...
Sunday, 14 February 2021
व्हॅलेंटाईन डे’ (तीन पिढ्यांचा)
Sunday, 6 December 2020
सुख म्हणजे नक्की काय असतं
विशेष असं काही नाही... असंच..
हे असंच असंच फार झालं तुझं...नक्की सांग काय विचार चालू आहेत?
खरं तर मलाही कळत नाहीये.... पण कधी कधी एकटे छान वाटते तर कधी कधी खूप गोतावळा हवाहवासा वाटतो... असे का होतेय हे खरंच कळत नाही.
तुला एक सांगू का? तुला सर्व कळतं पण वळत नाही..
म्हणजे?
म्हणजे आज तुझा वाढदिवस... आज आपल्याला एकही मेसेज किंवा फोन नाही आला तर...... भीती वाटते ना तुला?
तुला कसं कळलं?
न कळायला काय झाले.... तुझी कर्मेच तशी आहेत. लॉक डाउन होऊन सर्व सुरळीत झाले... पण तुझी गाडी काही अजून रुळावर आली नाही. तू तर स्वतःला असे काही लॉक करून ठेवले आहेस की सगळ्या जगाशी संपर्क तोडलास. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नाही, कोणाशीही काहीही संपर्क नाही का वागतेस असं?
वेळच नसतो. दिवस कुठे संपतो कळतच नाही.9
काय म्हणालीस? इकडे माझ्याकडे बघून बोल. ...खरंच वेळ नसतो??? हे तू मला सांगतेस? अगं तू ठरवलेस ना तर दिवसभर ऍक्टिव्ह राहू शकशील. पण कामे संपल्यावर टाइमपास कोण करेल?
ए, असं काही नाही हं! थकून जाते ना मी, मग येतो कंटाळा.
तुला कनेक्ट राहण्याचा कंटाळा येतो ना??? मग इतरांनी तरी का कनेक्ट राहावे? तुला सर्व हवे असतात, पण तू सर्वांसाठी नसतेस... हे कसे शक्य होईल??
मग आता आज खरंच मला मेसेज किंवा फोन काही येणार नाही?असं होईल?
खरं सांगू का तुझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारे खूप लोकं आहेत त्यामुळे शुभेच्छा देणार नाही असे तर काही नक्कीच होणार नाही. पण तरीही तू कसा संपर्क ठेवतेस याचा विचार करायलाच हवा.
बरोबर आहे तुझे म्हणणे... पण माझी सर्वांशी अगदी मनापासून मैत्री आहे.. फक्त ती मैत्री टिकवण्याची जी माध्यमं आहेत, त्यांच्याशी माझे फारसे जमत नाही. त्याचा परिणाम मी सर्वांसाठी संपर्क क्षेत्राच्या बाहेर जाण्यामध्ये होतो.
हे बघ, काळाप्रमाणे बदलायला हवे. या काळात मैत्री टिकविण्याची जी माध्यम आहेत त्या माध्यमांशी तुला फ्रेंडली रहावेच लागेल. बरं तुला काही ही माध्यम हाताळता येत नाही असंही नाही. सगळे येत असून फक्त तू दुर्लक्ष करतेस. आधी निदान वाढदिवसाला तरी तू सर्वांना शुभेच्छा द्यायचीस. आता तर तुझे सर्व मेसेजेस बिलेटेड असतात. यावर काय बोलू तुला....
बरं असं नाराज होऊ नको. आता घेईन मी काळजी. पण मला तर खरे टेन्शन आजच्या माझ्या वाढदिवसाचे आहे.
ओहो तुझा वाढदिवस?? तुला कधीपासून आवडू लागले हे असे सेलिब्रेशन??? तूच तर म्हणतेस ना की आपण जन्माला आलो यात काय मोठा असा पराक्रम केलाय. कशाला हवे ते सेलिब्रेशन... आणि आता तुलाच सर्वांकडून शुभेच्छा हव्या आहेत...
हो खरं तर आत्तापर्यंत मला असेच वाटायचे. पण हे लॉक डाऊन झाल्यापासून घरात राहून राहून बाहेरच्या दुनियेशी इतकं डिस्कनेक्ट झाले आहे की सर्वांशी कनेक्शन कायमचे ब्लॉक होते की काय अशी भीती वाटू लागली आहे. आता परत कनेक्ट कशी होऊ हे कळत नाही.
त्यात काय एवढे? रोज ठरवून फक्त एकदाच वेळ काढ आणि रहा सर्वांच्या संपर्कात. सोशल मीडियामुळे संपर्कात रहाणे खूप सोपे झाले आहे.
ते सर्व ठीक आहे. पण आजच्या दिवसाचे काय???
काही काळजी करू नको. मला खात्री आहे तुला भरपूर शुभेच्छा आलेल्या असतील. पण त्या आल्या आहेत की नाही, किती मेसेजेस आले आहेत हे कळण्यासाठी तरी व्हाट्सअप, फेसबूकवर क्लिक करायला हवे ना??? तो फोन सायलेंट मोड वरून काढ आधी कितीतरी कॉल येऊन गेले असतील.
तुझे बोलणे अगदी खरे ठरले. दिवसभरात खूप लोकांच्या शुभेच्छा आल्या आहेत. सर्व जीवा भावाच्या लोकांचे फोन आले. कित्येक दिवसात संपर्कात नसलेल्यांशी भरपूर गप्पा मारल्या. अजून खूप आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या काही मैत्रिणींनी माझ्यासाठी चक्क स्वरचित गाणी म्हटली. खूप भारावून गेले आहे मी. एवढ्या शुभेच्छा बघून आज अगदी सेलिब्रिटी झाल्यासारखे वाटतेय. शिवाय मी लिहीत रहावे म्हणून मैत्रिणींनीही खूप प्रोत्साहन दिले आहे. खूपच भारी वाटतय आज. पण तरीही प्रश्न पडतो की हे सर्व मी डीझर्व्ह करते का??? तर उत्तर नाही असेच येते. कारण मी खरंच ह्या सगळ्यांसाठी काहीही केले नाही.
मग कर ना अजूनही!!! इतके दिवस सर्व तुझ्या कानीकपाळी ओरडून थकले की थोडी टेक्नोसावी हो... सर्व ग्रुप्स मध्ये पण ॲक्टिव्ह राहा... सेल्फी काढ.... आपले स्टेटस जपण्यासाठी रोज सोशल मीडियावर स्टेटस टाकत जा... पण ऐकशील तर शप्पथ...तुला स्टेटस टाकणे आवडत नाही, सेल्फी कधी काढत नाहीस, तो डीपी तर कित्येक वर्षांत बदलला नाहीस... आजच्या काळाप्रमाणे ही सर्व म्हातारपणाची लक्षणे आहेत बरं!!!!
चल काहीही काय....मी नाही हं म्हातारी!!! पण खरे सांगते आज मला सोशल मीडिया मधील खरा आनंद कळला.त्यामुळे बघ ना आज सेल्फी मैने ले लिया आणि बर्थडे चे फोटो पण काढले आणि ते पोस्ट देखील केलेत. आज मला प्रशांत दामले च्या या ओळी गुणगुणाव्याशा वाटतात,
'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं
काळाप्रमाणे बदलत लोकांना जोडण्यात ते गवसतं'
'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं
भरपूर मित्र मैत्रिणींशी कनेक्ट राहण्यात असतं'
'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं
वाढदिवस सोशल मिडियावर साजरा होण्यात असतं'
कळले ना आता तुला सोशली कनेक्ट राहण्याचे महत्व!!!आता मात्र तुला ही शेवटची वॉर्निंग... अजूनही ही तुझी माणसं तुला आपली मानत आहे तुझे भाग्य समज. त्यामुळे आता तरी त्यांच्यापासून लांब लांब राहू नकोस. तुला म्हणतेस ना की सोशल मिडियाचा अतिरेकी वापर वाईट... ते बरोबर आहे... पण बाळा, ही माध्यमें अजिबात न वापरणे हा ही अतिरेकच आहे हे तुला कसे कळत नाही??? कोणतीही अतिरेकी कृती ही वाईटच असते हे कळतेय का तुला????
हो रे, चांगलेच कळले आहे मला!! आज हमारे जनम दिन पर हमे रुलायेगा क्या?? बस कर ना अभी.....
असे म्हणत मालिकांमध्ये दाखवतात तसे प्रकट झालेल्या दुसऱ्या मनाला गप्प करत अस्मादिकांनी वाढदिवसाचा मनोसक्त आनंद लुटला.
आता ते मन शांत झाले आहे म्हणून सांगते, “ मी कायम तुम्हा सर्वांसोबत आहे. चुकून जरी मी डिस्कनेक्ट झाले आहे असे वाटले तर तो दोष माझ्या आणि सोशल मीडियाच्या फारकतीचा असेल. मी मात्र कायम तीच आणि तशीच असणार आहे. तेव्हा यावेळेस जसा माझ्यावर शुभेच्छांचा अगदी भरभरून वर्षाव केला आणि माझ्या लिखाणासाठी मला प्रोत्साहन दिले त्या तशाच शुभेच्छा कायम मला हव्या आहेत.
सर्वांना अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद.
- मंजुषा देशपांडे, पुणे, 5 डिसेंबर 2020.
Wednesday, 19 August 2020
पंडित जसराज
काल 17 ऑगस्ट 2020 रोजी तुमचे शरीररुपी अस्तित्व संपले आणि मन सुन्न झाले.
जगासाठी तुम्ही संगीत मार्तंड, सूरमणी, पद्मविभूषण, संगीत सूर्य असे बरेच काही होता. पण तुमच्या गाण्यापुढे ह्या सर्व पदव्या खूपच छोट्या आहेत. कारण आत्म्याला आत्म्याशी एकरूप करणारं असं तुमचे गाणे आहे. जेव्हा ही तादात्मता येते तेव्हा त्यापुढे भौतिक जगातलं अस्तित्व शिल्लक राहत नाही. त्यामुळे या सन्मानांच्या पलीकडे असलेल्या तुमच्या गाण्याची अनुभूती मी घेतली आहे.
वास्तविक आपले नात काय होते? तर लौकिक अर्थाने काहीही नाही. ना कधी मी शास्त्रीय संगीत शिकले, ना कधी तुम्ही माझे गुरु होतात, ना कोणते मानलेलं नातं ... ना रक्ताचं नातं...
तरीही तुम्ही माझ्यासाठी खूप जवळचे माझ्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहात.
त्याला कारण म्हणजे तुमचं ईश्वरीय शक्तीशी एकरूप करणारे गाणं.
खरंतर जवळ जवळ तीस एक वर्षांपूर्वी म्हणजे माझ्या लग्नाआधी पर्यंत मला शास्त्रीय संगीत अजिबात आवडत नव्हतं. पण तुम्हाला माहितच आहे माझे मिस्टर तुमचे परम भक्त. गाणं शिकायचं तर तुमच्याकडेच म्हणून तासंतास ते तुमच्या भेटीसाठी तुमच्या घरा बाहेर थांबलेले आहेत. लग्नानंतर आमचा दिवस सुरु होणार तो तुमच्या गाण्याने आणि संपणार तोही तुमचाच आवाज ऐकत!!!
शास्त्रीय संगीतातले कळत नव्हते तरी नकळतपणे तुमच्या आवाजशी कनेक्ट झाले. तुमचं गाणं आहे फक्त गाणं वाटत नाही तर अंतरात्म्याशी जोडणारी एक अनुभूती असते. असं आत्म्याशी जुळलं गेलेलं एक अजब नातं होतं आपल्यात.
मला आठवते ती तुमची नाशिक मधील गाण्याची मैफिल. मिस्टरांबरोबर मी देखील तुमचे गाणे ऐकायला आले होते. तेव्हा मैफिल सुरू होण्याआधी आम्ही सर्व तुम्हाला भेटायला आलो. तुमच्या चेहर्यावरचे तेज, ग्रेस किंवा ओरा पाहून भान हरपले. हे सर्व पेलण्याची पात्रातच नव्हती माझी. त्यामुळे मी स्तब्ध होऊन नुसतेच बघत राहिले. नमस्कार करणे पण नाही सुचले नाही. डोळ्यातून नकळत घळाघळा पाणी वाहत होते. तेव्हापासून जे काही कनेक्शन निर्माण झाले ते मी शब्दात कसे मांडू तेच कळत नाहीये. पण आपलं हे नातं म्हणजे खूप जवळचे असे आहे. या नात्याला कोणतीही ओळख किंवा कोणतेही नाव असण्याची गरजच भासली नाही. अगदी रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळचे असे बंध जुळले गेले.
खरं तर तुम्हाला भेटणे आणि तुमच्याशी ओळख करून घेणे माझ्यासाठी काही फार अवघड नव्हते. पण तुमच्या गाण्यातून जो काही निरागस, निर्मळ असा भावबंध निर्माण झाला होता त्यापुढे प्रत्यक्ष भेटण्यासाठी काही उरलेच नव्हते.
ओढ असते ती फक्त तुमच्या स्वरांची, तुमच्या आवाजाची.
1992 मध्ये सवाई गंधर्व मध्ये तुम्हाला प्रत्यक्ष ऐकलं. तेव्हा ब्रह्मानंदी तंद्री लागणे म्हणजे काय अनुभवले. त्यानंतर मात्र तुमचे गाणे ऐकण्यासाठी प्रत्येक सवाईगंधर्व मध्ये खास पुण्याला येत होतो. तुमचा आवाजातलं जय हो कानावर पडले की आयुष्यच विजयी झाल्यासारखे वाटायचे. तुमचे व्यासपीठावर आगमन, मराठीत बोलणे आणि सर्व रसिकांना करत जय हो म्हणणे इथेच मन तृप्त होऊन जात असे. त्यानंतर सुरू होणारे गाणे म्हणजे आनंदाची, सुखाची अनुभूती!!! याच साठी केला अट्टाहास.... असे वाटायचे आणि पुण्याला धडपडत येण्याच्या प्रवासाचे सार्थक व्हायचे.
काल अचानकपणे तुम्ही आम्हाला सोडून गेलात आणि कोणी तरी अगदी हृदयस्थ गेल्यासारखे आम्ही दोघंही खूप रडलो. आपल्या शरीराचा एक हिस्साच कोणीतरी काढून घेतला अशी जाणीव झाली. मला माहिती आहे तुमच्या जाण्याने संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे ती खरंच भरून निघणार नाही. पण खरं सांगायचे तर मला ती भरायची पण नाहीये. कारण ती पोकळीच मला नश्वरतेची जाणीव देत राहील. आणि तुम्ही शरीररुपी नसला तरी तुमचा आवाज तुमचे संगीत, तुमचे गाणेच ती पोकळी भरत राहील याची खात्री आहे.
फक्त उणीव भासेल ती तुमच्या जय हो या शब्दांची. मला माहित नाही यापुढे मी सवाईगंधर्वला कशाच्या ओढीने जाईन किंवा जाऊ शकणार नाही. तुम्ही थकले होतात, तब्येत बरी नसायची तरीही आमच्या सारख्या रसिकांना तुम्हाला ऐकायचे असायचे, पाहायचे असायचे. तुम्ही कधीच आम्हाला निराश केले नाहीत. एकदा ते स्वरमंडळ छेडले की तुम्ही स्वतःही वेगळ्या दुनियेत जात आणि तुमच्या बरोबर घेऊन जात असत. तुमच्याबरोबर केलेला संगीताचा प्रवास अवर्णनीय आणि अविस्मरणीय असा आहे. तुमचे गाणे साक्षात ईश्वर भेटीची अनुभूती असते. मला माहित नाही देव, ईश्वर, परमेश्वर म्हणजे नक्की काय??? पण तुमच्या गाण्यातून जी काही स्पंदनं मनाला जाणवत असतात त्यालाच मी ईश्वर असे म्हणेन. तुमच्या आवाजातील ओम नमो भगवते वासुदेवाय हे भजन ऐकल्याशिवाय मैफिल पूर्ण होतच नव्हती. आता प्रत्येक सवाईगंधर्व असो किंवा कुठेही शास्त्रीय मैफिल असो, प्रत्येक व्यासपीठ तुमच्या आवाजाशिवाय अपूर्ण आहे. जिथे व्यासपीठ, माइक, स्पीकर तबला, तानपुरा, हार्मोनियम, स्वरमंडल यासारखे निर्जीव साधनं देखील तुम्हाला मिस करतील तिथे आमच्यासारख्या सजीवांची काय कथा!!! तुम्हाला तर जिवंतपणीच सदगती लाभली होती. त्या सदगतीची अनुभूती देखील तुम्ही आम्हाला दिली आहे. त्यामुळे तुमच्या आत्म्यास सदगती मिळावी ही प्रार्थना ही तुमच्यासाठी व्यर्थ आहे. तुमचे शरीर रुपी अस्तित्व संपले असले तरी तुमच्या आवाजातून तुम्ही कायम आमच्यासाठी आमच्या सोबत आहात. फक्त अपूर्णता आहे ती तुमच्या जय हो शब्दांची आणि तुमच्या भरभरून मिळणाऱ्या आशीर्वादाची!!!
*जय हो* पंडितजी🙏🙏🙏
तुमची निस्सीम भक्त,
सौ. मंजुषा देशपांडे , पुणे.

