लेख मंजुषा

Happy Anniversary “हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?” ती लगेच म्ह...

Wednesday, 27 March 2019

"I is"


तो माझ्यावर खूप चिडला होता. रागारागात बडबडत होता," काय ग हे? किती वेळा तुला तुझ्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची जाणीव करून दिली, पण तुझ्यात काही  फरकच नाही.”
ए, असे नको ना बोलू, तुझ्याशिवाय माझे अस्तित्वच नाही रे... असं रागावू नकोस ना!! मी त्याची समजूत घालण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते.
अर्थात त्याचे रागावणे स्वाभाविकच होते. मी माझ्या धुंदीत जगत होते. संसारामध्ये मी स्वतःला इतके गुंतवून घेतले होते की त्याच्याशी काही संबंध नसल्यासारखेच वागत होते. त्याची बडबड मला वेळोवळी जाणीव करून द्यायची की तू चुकीचे वागत आहेस. अजूनही भानावर ये. मीच तुझी खरी काळजी घेणारा आहे, असे दुर्लक्षित करू नकोस.
पण मी नेहमी प्रमाणे दुर्लक्षच केले.

पण त्या दिवशी अशी काही घटना घडली की मी खडबडून जागी झाले आणि मला त्याच्या उपदेशाचे शब्दन् शब्द आठवत होते.
असे नक्की काय झाले होते..... अचानक माझी तब्येत बिघडली. हृदयातील धडधड वाढली आणि ती काही केल्या थांबेना. त्यामुळे थेट दवाखान्यात भरती व्हावे लागले.
वयानुसार धडधडीचे अर्थ कसे बदलत जातात ना? तरुण वयात ” घडी घडी मोरा दिल धडके, क्यू धडके” याचा अर्थ गुलाबी दिवस, प्रेम,आनंद, सुख याची अनुभूती, या धडधडीत असते. थोडक्यात काय सर्व सकारात्मक भावना.
पण चाळिशीनंतरची धडधड मात्र “घडी घडी मोरा दिल धडके ,क्यू धडके” याचा अर्थ शोधायला आयसीयूत नेऊन ठेवते याचे प्रत्यंतर मी घेतले. या धडधडीत हवेत तरंगण्याची ऐवजी कृत्रिम हवा घ्यावी लागली. कारण दरदरून घाम फुटला आणि अंगातले त्राण गेले.
वेळेवर माझी भाची डॉक्टर प्रियंकाने  प्रसंगावधान दाखवून ताबडतोब दवाखान्यात दाखल केले. काय घडते हे कळेपर्यंत मी स्वतःला आयसीयूमध्ये पाहिले.
तिथे मात्र “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा” याची जाणीव झाली. आपण इतके असहाय्य असतो की जे घडतेय ते स्वीकारण्या पलीकडे काही उरत नाही. वेगवेगळ्या चाचण्या, सलाईन, ऑक्सिजन, डॉक्टरांची धावपळ हे सर्व मी उघड्या डोळ्यांनी पहात होते.
बऱ्याच वेळानंतर माझ्या हृदयाची धडधड पूर्ववत झाली. पतीच्या आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा ताण बघून माझ्या मनात कालवाकालव  झाली. अन मला  त्याची आठवण झाली. पाहते तर काय तो माझी मजा बघत होता. माझ्या डोळ्यांतून सतत पाणी वाहत होते. माझी असहाय्यता मला सहन होत नव्हती. का नाही त्याचे ऐकले? तो कितीतरी वेळा मला धोक्याची जाणीव करून देत होता..... पण मी का दुर्लक्ष केले? का स्वतःला इतके गुरफटून घेतले? मला काहीच सुचत नव्हतं. आपण त्याच्याशी किती बेपर्वाईने वागलो ह्याची जाणीव मनाला अस्वस्थ करत होती. डॉक्टरांनी सांगितले की कोणताही ताण घेऊ नका, एकदम आराम करा. बोलणे, चालणे, दगदग सर्वकाही बंद. सक्तीची विश्रांती घेणे भाग होते. पण हे रिकामपण मला काहीच सुचू देत नव्हते. आयुष्याची गती अचानकपणे मंदावल्याने मन खूप विषण्ण झाले होते. एका वेगळ्या प्रकारची भयाण शांतता मी अनुभवत होते. सतत भावनाविवश होऊन रडू यायचे. मन तर खूपच कमकुवत झाले होते. मला स्वतःला तर त्रास होतच होता; पण आपल्यामुळे साऱ्या कुटुंबीयांवर ताण येतोय आणि त्यांनाही खूप त्रास होतोय हे पाहून जास्त वाईट वाटले. काय अधिकार आहे मला माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माणसांना त्रास देण्याचा? निव्वळ स्वतःकडे झालेले दुर्लक्ष खूप महागात पडले.
पण वाईटातून चांगले म्हणतात ते असे की माझ्या प्रेमाच्या माणसांच्या आग्रहाखातर आमच्या कामवाल्या बाईने माझी दृष्ट काढली. म्हणजे आपण अजूनही दृष्ट लागण्याइतपत सुंदर आहोत त्याचे वेगळेच अप्रूप वाटले. अशा वेळी मात्र कटाक्षाने स्वतःला आरशात बघणे टाळले. दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एरव्ही फारसे व्यक्त न होणाऱ्या नवर्याच्या भरभरून प्रेमाची अनुभूती मला या दुखण्याने दिली. आजवर त्यांचे भरपूर गाण्यांचे कार्यक्रम झाले आहेत. पण आयुष्यात पहिल्यांदा भर कार्यक्रमात " फूलों के रंग से
दिल की कलम से....लेना होगा जनम हमे कई कई बार " हे गाणे चक्क मला अर्पण केले. आता तर हे गाणं फक्त माझं आहे आणि माझ्या ह्रदयावर कायमचे कोरले गेले आहे. एवढ्यात त्यांना खुप वेळा भावनाविवश होताना पाहून मला स्वतःची किती काळजी घ्यायला हवी याची चांगली जाणीव झाली.
गरमागरम आयते जेवण, जेवण करून हात धुवून आडवे होणे, गाणे ऐकणे, वाचन करणे वगैरे वगैरे अगदी स्वर्गीय सुख. जीवलग मैत्रिणीने, अंजूने तर तिचा किमती टॅबच माझ्याकडे सोपवला. त्यावर मस्तपैकी मालिका, चित्रपट बघत आनंद लुटला. किती सहजतेने एवढी किमती वस्तू माझ्या ताब्यात दिली. तसेच मितू , तू मलेशियाहून फोनवर बोलून जो काही मला आधार दिलास ना, त्या वर मी शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. बरं हे सर्व एवढे आपले आहेत ना की या सर्वांचे आभार मानण्यापेक्षा माझ्या या सर्व (नवरा, मुले, सून, बहिण, भाऊ, भावजया, भाचे कंपनी आणि माझ्या सख्या) प्रियजनांना परत कोणालाही त्रास होऊ नये म्हणून मी तब्येतीची काळजी नक्कीच घेईन असे आश्वासन देते.अशा सर्वांच्या शुभेच्छांनी आणि प्रेमाच्या वर्षावाने मी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सावरत होते. पण मनातल्या मनात कुठेतरी कुढणं चालूच होतं. खूप उहापोह झाल्यावर एक गोष्ट लक्षात आली की आपण दुनियेला माफ करतो. पण स्वतःच्या चुकांच्या बाबतीत मात्र," चुकीला माफी नाही" या अविर्भावात स्वतःला माफ करायला कधी तयारच होत नाही. मी असं का नाही केलं, मी तसं काही नाही केलं, मी का शिस्तबद्ध नाही, मी का स्वतःला वेळ दिला नाही, मी का त्याचे ऐकले नाही वगैरे वगैरे.... बाप रेे!!! स्वतःवर आरोपांच्या फैरी झाडत होते. शारीरिक तासापेक्षा हा त्रास जास्त होत होता. माझे जवळचे असे सर्व लोक खूप समजावत होते. पण मनातली खळबळ काही केल्या कमी होत नव्हती.
मग विचार केला की आपण तर इतरांना मोठ्या मनाने लगेच माफ करतो. मग स्वतःच्याच बाबतीत एवढा कठोरपणा का? आधी स्वतःच्या चुकांना माफ केले. स्वतःला खऱ्या अर्थाने जशी आहे तसे स्वीकारले. मग मात्र खूप हलके वाटू लागले. मग मन "I is" म्हणजे मी आहे चा खरा आनंद घेऊ लागले.
    मला वपु काळे यांच्या कथेतील “I is" म्हणजे "मी आहे" हा शब्द खुप आवडला. खरं तर वपूंनी " I is" हा शब्द खूप गमतीने वापरला असला तरी मला तू खूप आपलासा वाटला. आय सी यु मधून सुखरूप बाहेर आल्यावर आपण अजूनही पृथ्वीतलावर अस्तित्वात आहोत ही जाणीव सुखकारक होती. डॉक्टरांनी, " आता तुम्ही सुखरूप आहात पण काळजी घ्या" हे मला सांगता क्षणी मला जोरात ओरडावेसे वाटले, "येस, I is".    
सभोवताली माझी माणसं पाहिली आणि खात्री झाली की  I is.
नंतर माझे घर, माझा फोन, माझे व्हाट्सअप, माझे फेसबुक आणि माझे नातलग, जिवलग सख्या पाहून मी मनातल्या मनातच खुश होत म्हंटले, Yes, I is.
स्वतःला अचानक उद्भभवलेल्या दुखण्यातून सुखरूप बाहेर आलेले पाहून, " एकाच ह्या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी" असच जगायच असे आता ठरवून टाकले.
कारण आयुष्यात आपण खूप काही करायचे ठरवत असतं. पण पुष्कळदा त्यासाठी वेळ काढला जात नाही. मी देखील माधुरी दीक्षितचा चित्रपट पाहून माझी " बकेट लिस्ट" बनवून ठेवली आहे. पुढे वेळ मिळाल्यावर नक्की पूर्ण करू असे मी ठरवले होते. पण माझी वेळ संपते की काय अशी माझी अवस्था झाली होती. पण नाही, मला परत संधी मिळाली आहे आणि आता या संधीचा उपयोग जर मी केला नाही तर माझ्यासारखी मुर्ख मीच असेल त्याची मला पक्की जाणीव झाली आहे.
यासाठी त्याच्याशी दिलजमाई होणे गरजेचे होते. डॉक्टरांनी प्राणायाम व व्यायाम सर्व बंद सांगितले होते. त्यातल्या त्यात ध्यान धारणा करण्यास परवानगी होती. मग काय ध्यान करून शांतपणे त्याच्याशी बोलते झाले. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचा त्याला भयानक राग आला होता.
पण प्रत्येक ध्यानानंतर त्याच्याशी संपर्क साधत एकदाचा सुसंवाद साधला. आता पक्के ठरवले ती काहीही झाले तरी त्याचे ऐकायचे. तो झोप म्हटलं की झोपायचे. उठ म्हटला की उठायचे, व्यायाम करायला लावला तर मुकाट्याने व्यायाम करायचा आगाऊपणा बंद. शहाणपणा करायचा नाही.
कारण मी त्याच्याशी म्हणजेच "माझ्या आतल्या आवाजाशी" प्रामाणिक राहिले तरच लौकिक आणि पारलौकिक जगात " I is " च्या अवस्थेत चिरतरुण राहील. हे कायम लक्षात राहण्यासाठी आपणा सर्वांच्या साक्षाने हे लिहून ठेवले.
@ मंजुषा देशपांडे, पुणे.

Thursday, 14 February 2019

'व्हॅलेंटाईन डे'

पाहूनि आजच्या तरुणाईचा 'व्हॅलेंटाईन डे'
काकूंनी ठरवले काकांना 'विश' करु गडे
😍😍😍😍😍😍😍
'प्रपोज' करणे तर खूप अवघड वाटले
मग नजरेच्या खेळात सांगून बघितले
😉😉😉😉😉😉😉
काकांना कळलीच नाही नजरेची भाषा
काकूंच्या पदरी आली फक्त निराशा
😞😞😞😞😞😞😞
तरीही आळवत राहिल्या त्या 'सेलिब्रेशनचा' सुर
काका मात्र लागू देत नव्हते ताकास तूर
😏😏😏😏😏😏😏
काकूंच्या या विचित्र हट्टाला काका वैतागले
धारदार शब्दांचे अस्त्र काकूंवर उपसते झाले
😡😡😡😡😡😡😡😡
अगं, चाळीस वर्ष झाली आहेत आपल्या लग्नाला
काय हे 'व्हॅलेंटाईन डे' चे 'फ्याड' डोक्याला
😣😣😣😣😣😣😣😣
आपल्या वयोमानाची तरी ठेव थोडीफार जाण
मुले सुना नातवंडांचे पण राख जरा भान
😫😫😫😫😫😫😫
काकांच्या बोलण्याने काकू जरा हिरमुसल्या
पण काहीतरी विचारानी मोबाईलकडे धावल्या
🏃‍♀🏃‍♀🏃‍♀🏃‍♀🏃‍♀🏃‍♀🏃‍♀🏃‍♀
'व्हाट्सॲप'वरुन केला काकांवर किसेसचा मारा
दिलावर दिल पाठवून केला व्हॅलेंटाईन डे' साजरा
😘😘😘😘💞💞💞💞
ह्या ई प्रेमातही काकू झाल्या लाजून लाजून चुर
काकांनी लावला होता मस्तपैकी घोरण्याचा सूर
☺☺☺☺😴😴😴😴
शेवटी कंटाळून काकूही अंथरुणात शिरल्या
उशीखाली त्यांना एक गजरा हाती लागला
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
प्रेमाच्या सुगंधाने काकूंचे डोळे पाणावले
शेवटी ई प्रेमापेक्षा अबोल प्रेमच श्रेष्ठ ठरले
                          अबोल प्रेमच श्रेष्ठ ठरले.
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

सौ. मंजुषा देशपांडे, पुणे.

Thursday, 31 January 2019

नातं मैत्रीचं वयापलिकडचं

जानेवारी महिना म्हणजे संकल्पांच्या गंगेला येणारा महापूर. त्यामुळे ह्या गंगेत हात धूत मी देखील ठरवले कि आपण आता दरमहा एका विषयावर ब्लॉगवर लिहायचे. पण ते लिहायला देखील पंधरा तारीख उजाडून गेली.पण देर से लेकीन दुरुस्त म्हणत ह्या महिन्याचा विषय ठरवला,”नाते मैत्रीचे वयापलीकडचे”. 

खरं तर ब्लॉग सुरु करून बरेच दिवस झाले. पण टायपिंगचा असलेला कंटाळा काही सुचू देत नव्हता.पेन घेऊन कागदावर खरडणे भराभर जमते. किती कागद लिहून होतात ते समजतही नाही. पण शेवटी लक्षात आले कि आता मराठी टायपिंग शिवाय पर्याय नाही. त्यावरूनच ह्या विषयाच्या संदर्भातील एका सखा आणि सखीची ही गोष्ट.                   

नातं मैत्रीचं वयापलिकडचं

तशी अगदी लहानपणापासून म्हणजे त्याला समज आल्यापासून त्याची ही सखी त्याच्या सोबत होती. पण तीच आपली जीवश्च-कंठश्च सखी आहे हे त्याच्या उशीराच लक्षात आले. त्याच्या घरातील ग्रंथालय आणि विविध विषयांवरील पुस्तकांचा खजिना त्या सुकोमल,सदाबहार अशा त्याच्या सखीला बहरण्यास मदत करत होता. ती त्याची अगदी जवळची अशी खास मैत्रीण होती.  ती सखी म्हणजे जणू एक प्रसन्न... चिरतरुण... टवटवीत आणि आनंदी असे सतत भिरभिरणारे फुलपाखरू. त्या सखीला ना वयाचे बंधन ना काळाचे. ना व्यक्त होण्याचे बंधन ना विचारांचे. प्रसंग दुःखाचा असो वा आनंदाचा ह्या सखीचे आपले त्याच्यासोबत उत्साहात बागडणे चालूच असायचे. साधारण सहावी सातवीत असताना त्याने देखील तिच्या रंगात रंगण्याचा प्रयत्न केला होता. पण तिच्याशी मैत्री????.... पात्रता आहे का तुझी? इतकी सोपी नाही आहे तिच्याशी मैत्री!!! असे बोल त्याला सुनावले गेले आणि सखीबरोबर स्वच्छंदीपणे रमण्याच्या  त्याच्या विचारांना पूर्णविराम दिला गेला.

पण ती सखी असामन्य होती. ती अशी सहजासहजी त्याची पाठ सोडणारी नव्हती. शाळेत असताना निबंधलेखन, पत्रलेखन, वाचन यामध्ये कायम त्याच्या हातात हात घालून त्याची सोबत करायची. त्याच्या या सखी मुळेच त्याला परीक्षेत उत्तम गुण आणि स्पर्धेत बक्षिसे मिळायची.

दहावीत देखील टक्केवारी वाढण्यात ह्या सखीचा अनमोल वाटा होता. पण दहावीनंतर मात्र त्याने तिची साथ सोडली. सोडली म्हणण्यापेक्षा त्याला सोडावी लागली. कारण तिच्या सोबत रमून अर्थार्जन होणे मुश्कीलच होते. त्यामुळे त्याने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला आणि तो त्याच्या सहृदय, संवेदनशील, बहुगुणी आणि कालातीत अशा त्याच्या सखीपासून दुरावला गेला. सुरवातीला बँकेत नौकरी, सी.ए अशी मोठमोठी करिअरर्स खुणावत असल्याने सखीला गमावल्याचे त्याला काही विशेष वाटले नाही. पण जसेजसे महाविद्यालयीन शिक्षण सुरु झाले तशी त्याला वाणिज्य शाखेच्या रुक्षतेची जाणीव झाली. मग मात्र वारंवार त्या प्रफुल्लीत, उत्साही अशा सखीची आठवण होऊ लागली. खरं तर त्याच्या महाविद्यालाच्या प्राचार्यानीदेखील त्याचे आणि त्याच्या सखीचे सख्य अचूक ओळखले होते. त्यामुळे त्यांनी त्याला सखी सोबतच राहता येईल अशी शाखा निवडण्याचा सल्लाही दिला होता. पण व्यवहारी जगापुढे त्याने त्या सखीला तुच्छ लेखले आणि तिच्याशी मैत्री सहज तोडून टाकली.

नंतर हळूहळू तो वाणिज्य शाखेतील व्यावहारिक विषयांमध्ये रमला आणि बँकेत ऑफिसर होऊन त्याने स्वतःला आर्थिक दृष्टीने स्थिर केले. पण आपल्या प्रिय सखीला गमावल्याची सल त्याच्या मनात खोलवर रुजली गेली होती. पुढे यथावकाश लग्न झाले आणि त्याच्या प्रापंचिक आयुष्यास सुरवात झाली. घरसंसार...मुलंबाळे ह्यात त्याने आपल्या आयुष्यातील “सखी” च्या कप्प्याला पक्के झाकण लावून टाकले. हळूहळू सर्व काही स्थिरस्थावर झाल्यावर त्याला थोडा निवांतपणा मिळू लागला. मग त्याने ग्रंथालयाचे दार ठोठावले. पुस्तकांच्या सहवासात तो परत रमु लागला. त्याला कुठेतरी आशा होती की पुस्तकांच्या सहवासात राहिलो तर आपली ती गमावलेली सखी परत आपल्याला भेटेल. अगदी तसंच घडलं. एकदा अचानक एका लेख स्पर्धेच्या निमित्त्याने दोघांची भेट झाली. दोघे एकमेकांना कडकडून भेटले. आता दोघांनाही कुठलेच भान उरले नव्हते. त्या दोघांची भेट म्हणजे एक अनोखा सोहळा होता. त्याच्या चेहेऱ्यावरील सुरकुत्या,डोळ्यांवर चाळीशीचा चष्मा आणि शरीराचा बेढब आकार अशा वय वाढल्याच्या खुणा त्याच्या शरीरावर स्पष्ट जाणवत होत्या. पण त्याची ती सखी मात्र अजूनही अगदी उत्साही, ताजीतवानी, आनंदी आणि भरभरून गप्पा मारणारी अशीच होती. सखीशी झालेली भेट त्याच्यासाठी खूप आनंददायी ठरली. त्या भेटीने त्याचे नाव लोकांपुढे आले आणि त्यांच्या मैत्री  बद्दल त्याच्यावर खूप अभिनंदनाचा वर्षाव ही झाला. ह्या दोघांची भेट बघून त्याच्या वडिलांचे डोळे पाणावले आणि त्यांनी मुलाला बजावले कि आता त्या अनमोल अशा सखीची साथ कधीच सोडू नको. खरं तर त्याच्या वडिलांची देखील त्याच्यासारखीच एक सखी होती. पण परिस्थतीमुळे त्यांची मैत्री काही फुलू शकली नाही. आता त्याच्या मनाच्या कोपऱ्यात घट्ट बसलेलं सखी विरहाच  दुःख हलकं झालं आणि हातात हात घालून दोघे बागडू लागले. संसार मुलेबाळे ह्यापेक्षा वेगळे असे त्याचे आणि त्याच्या सखीचे नवे विश्व आकार घेऊ लागले.

त्याच्या बायकोलाही त्या सखीविषयी त्याने लग्नाआधी कल्पना दिली होती. आपल्या नवऱ्याच्या सखीबद्दलच्या भावना ती जाणून होती. त्यामुळे तिलाही त्याच्या आयुष्यात सखी परत आल्याचा आनंदच झाला. आता त्याला परत पूर्वीसारखे उत्साही वाटू लागले. आपली दैनंदिन कामे भराभर उरकवून तो तिच्या सोबत वेळ घालवू लागला. दोघेही कल्पनांचे पंख लावून विविध विषयांची सफर करायचे.  कधी कधी दोघं इतके एकमेकांमध्ये रममाण होऊन जात कि त्यांना वेळे काळाचे भानही उरत नव्हते. मग मात्र सौभाग्यवतीचे ताशेरे त्याला ऐकावे लागायचे. हल्ली तर त्याची बायको त्याच्या ह्या सखीला सवतच म्हणायची. घरातले वातावरण बिघडले कि तो काही दिवस तिच्या पासून दूर राहायचा. पण तिच्याशिवाय जगणे म्हणजे त्याला आयुष्य कंटाळवाणे वाटायचे. ती रंभा तरी कुठे त्याला स्वस्थ बसू देत होती. तिचे आपले सतत त्याच्या मागे मागे बागडणे चालूच. सतत नवनवीन विषय शोधायचे आणि मनोसक्त बोलत बसायचे. प्रसंग अगदी कोणताही असो हिची आपली त्याच्याशी बडबड बडबड चालूच. अगदी कोणी हे जग सोडून गेले म्हणून जरी तो भेटायला गेला असला तरी ही तिथेही हजर राहणार. बरं हिला कधी गांभीर्य नावाची गोष्टच माहित नाही. तिथेही हिचे आपले मुक्तपणे बागडणे चालूच. मग कुणाचे रडणे बघणार, रडण्याच्या प्रकारांवर भाष्य करणार, कोणाला खरं दुःख झाले आहे आणि कोण नाटक करतंय ह्यावर भोचकपणे बोलणार. त्यामुळे त्यालाही ती कधी गंभीर होऊ द्यायची नाही. सार्वजनिक समारंभ असो वा घरगुती कार्यक्रम असो तिची सतत त्याच्या आयुष्यात लुडबुड चालूच असायची. कधी कधी त्याचे मित्रही वैतागून त्याला म्हणायचे कि तुझे हे सखी प्रकरण जरा अतीच होतंय हं! तिच्या सोबत तू कुठेतरी हरवल्यागत असतोस. पण ती त्याची जिवलग मैत्रीण खरंचच त्याला एवढे अनुभवसंपन्न करत होती कि त्यालाही तिचा सहवास कायम हवाहवासा वाटायचा.

अशाप्रकारे तो सखीच्या सोबत सुखासीन आयुष्य जगत होता. त्याला आता जगण्यासाठी कारण मिळाले होते. त्याच्या बायकोलाही त्याचे सखी सोबत भिरभिरणे चालत होते. त्यामुळे तो आता खूप आनंदी, उत्साही आणि प्रसन्न राहू लागला. माणसाला जगण्यासाठी कारण हवे असते. ते जर त्याला मिळाले तर आयुष्य कधीच कंटाळवाणे होत नाही. त्याचे ही तसेच झाले होते.

तरीही त्याच्या ह्या सुखाला कोणाची तरी नजर लागलीच. हल्ली परत तो थोडा उदासीन वाटू लागला. त्याचे त्याच्या सखी बरोबर मुक्तपणे वावरणे कमी होऊ लागले.आला दिवस ढकलणे एवढंच त्याचे आयुष्य चालू होते. नकारार्थी विचारांनी डोक्यात थैमान घातले होते.त्याला काहीही करून ती सखी त्याच्या आयुष्यात परत हवी होती. त्याच्या सौभाग्यवतीच्या धूर्त नजरेलाही ही गोष्ट माहित होती.लक्षात आले. पण नेमकं काय बिनसले होते तेच समजत नव्हते. शेवटी न राहवून तिने त्याला त्या विषयी विचारलेच.

अतिशय खिन्नतेने त्याने बायकोला सांगितले, ”तुला खरं सांगू का माझ्या त्या सखीला सांभाळायचे म्हणजे सध्या खूप अवघड होऊन बसले होते.तिचे व्यक्त होणे फार आधुनिक झाले आहे आणि मी मात्र आहे तिथेच आहे. तिला घेऊन बागडायचे म्हणजे तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे लागेल.त्यामुळे मी हल्ली तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष्यच करत होतो. वाटले होते जाऊन जाऊन कुठे जाणार आहे...येईल परत आपोआप. पण आता कितीतरी दिवस झाले ती माझ्याकडे फिरकायला तयारच नाही. तुला अगदी प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही सर्व माझ्या आयुष्यात माझ्यासाठी महत्वाचे आहातच; पण ती म्हणजे माझं अस्तित्व,माझा श्वास, माझं विश्व, माझं सर्वकाही होती. ती माझ्याशी बोलतच नाहीये म्हटल्यावर काय करावे तेच समजत नाहीये. ती कायमची तर सोडून गेली नसेल ना मला ....अशा विचारांनी मी खूप अस्वस्थ आहे.

त्याच्या बायकोला त्याची खिन्न अवस्था बघवत नव्हती. मग तिनेच त्याला सांगितले कि तुम्ही बोलावूनही जर ती येत नसेल तर तिला एकदा पत्र लिहून बघा.

बायकोची ही कल्पना त्यालाही आवडली आणि विरहाने व्याकूळ होत त्याने सखीला पत्र लिहावयास घेतले.

माझी प्रिय जिवलग सखी प्रतिभा, 

तू माझ्याशी बोलणे बंद केल्यापासून मी पार उध्वस्त झालो आहे. माझं जगणं निरस झाले आहे. तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. मला माहित आहे कि मी तुला खूप गृहीत धरू लागलो होतो. मला वाटायचे कि ही काय नुसती रिकामटेकडी!!! सतत आपले ह्या विषयावरून त्या विषयावर हुंदडणे चालू. लहानपणी तुला जाणले नाही आणि मोठं झाल्यावर करिअरच्या नावाखाली तुझा नाद सहज सोडून दिला. तरीही तू माझी साथ सोडली नाहीस. माझ्या आयुष्याच्या मध्यावर परत आपण बहरू लागलो होतो. तुझ्याशी जोडलो गेल्याने माझ्या बेचव आयुष्यात रंगांची उधळण सुरु झाली आणि ह्याचसाठी केला होता सारा अटटाहास असे वाटू लागले होते. खरं तर तशी तू सर्वांबरोबर असतेस.ज्याला तू गवसतेस,त्याच्या जगण्याचे सार्थक होत असते.पण फार थोड्या लोकांना ह्याची जाणीव असते. पण माझ्या वडिलांच्या कृपेमुळे म्हणा किंवा त्याच्या सुप्त इच्छेमुळे म्हणा माझी तुझी अगदी सहजच दोस्ती झाली. वडील गेल्यानंतर मला अगदी एकटे पडल्यासारखे वाटत होते, तेंव्हाही तूच माझ्या सोबत होतीस. तू मला समजावले होतेस कि वडिलांचेही तुझ्यावर खुप प्रेम होते. तू माझी साथ कधीच सोडू नकोस म्हणजे वडिलांबरोबर असल्याचे समाधान तुला कायम मिळेल.

पण तरीही आज आपण बोलत नाही आहोत. पण तुला खरं सांगू का? तुझे हे आधुनिक रूप काही मला फारसे रुचले नाही. तुझ्याशी संबंध टिकवायचे म्हणजे मराठी टायपिंग शिका,फेसबुक, ब्लॉग, ई-मेल, ई-पुस्तके ह्या सर्वांशी मैत्री करा हे माझ्यासाठी खूप अवघड होते. आधी आपल्या मैत्रीला कागद पेन पुरायचा; पण आता तुझे व्यक्त होणे खूप आधुनिक झाले आहे. त्यामुळेच आपल्या मैत्रीत खूप तफावत आली .

पण आता जेव्हा तू अजिबातच भेटायला तयार नाहीस तेव्हा मात्र मला खऱ्या अर्थाने तुझी जाणीव झाली आणि तुझे महत्व ही समजले. त्यामुळे फक्त तुझ्यासाठी आता मी आधुनिक होणार आहे. कारण तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. नुकतेच मी माझ्या संगणकावर मराठी सॉंफ्टवेअर घेतले आहे. आज हे पत्र जरी मी कागद पेन घेऊन लिहिले असले तरीही तुला पाठवताना मराठीत टायपिंग करून तुला ई-मेल करेन, माझ्या ब्लॉगवरही टाकेन आणि फेसबुक वर ही शेअर करेन.

आज तुला मी अगदी मनापासून कळकळीची विनंती करतो कि माझ्या वर अशी नाराज होऊ नकोस. तू लगेचच माझ्या आयुष्यात परत ये.

तुझी मनापासून वाट पाहणारा तुझा,

सखा. 

अश्या प्रकारे त्याने त्याच्या प्राणप्रिय सखीला...त्याच्यातल्या रुसलेल्या प्रतिभा शक्तीला....सृजनशीलतेला....मनापासून साद घातली आणि तिला आपल्या आयुष्यात परत आणले. आता लवकरच त्यांचे हे सख्य जगजाहीर होऊन साहित्य क्षेत्रात काहीतरी चमत्कार घडेल हे निश्चित. अशी ही वयापलीकडची, कालातीत सखी म्हणजेच प्रतिभाशक्ती किंवा सृजनशीलता ही आपल्या सर्वांकडेच नक्कीच असते, फक्त आपण तिला ओळखायला हवे. मग प्रत्येकाचे जगणे हे फक्त जगणं नसणार ....तर एक महोत्सव असेल.  

मंजुषा देशपांडे