लेख मंजुषा

Happy Anniversary “हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?” ती लगेच म्ह...

Wednesday, 19 August 2020

पंडित जसराज

 आदरणीय प्रिय पंडित जसराज जी, 

काल 17 ऑगस्ट 2020 रोजी तुमचे शरीररुपी अस्तित्व संपले आणि मन सुन्न झाले. 

जगासाठी तुम्ही संगीत मार्तंड, सूरमणी, पद्मविभूषण, संगीत सूर्य असे बरेच काही होता. पण तुमच्या गाण्यापुढे ह्या सर्व पदव्या खूपच छोट्या आहेत. कारण आत्म्याला आत्म्याशी एकरूप करणारं असं तुमचे गाणे आहे. जेव्हा ही तादात्मता येते तेव्हा त्यापुढे भौतिक जगातलं अस्तित्व शिल्लक राहत नाही. त्यामुळे या सन्मानांच्या पलीकडे असलेल्या तुमच्या गाण्याची अनुभूती मी घेतली आहे.

वास्तविक आपले नात काय होते? तर लौकिक अर्थाने काहीही नाही. ना कधी मी शास्त्रीय संगीत शिकले, ना कधी तुम्ही माझे गुरु होतात, ना कोणते मानलेलं नातं ... ना रक्ताचं नातं...

तरीही तुम्ही माझ्यासाठी खूप जवळचे माझ्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहात.

त्याला कारण म्हणजे तुमचं ईश्वरीय शक्तीशी एकरूप करणारे गाणं.

खरंतर जवळ जवळ तीस एक वर्षांपूर्वी म्हणजे माझ्या लग्नाआधी पर्यंत मला शास्त्रीय संगीत अजिबात आवडत नव्हतं. पण तुम्हाला माहितच आहे माझे मिस्टर तुमचे परम भक्त. गाणं शिकायचं तर तुमच्याकडेच म्हणून तासंतास ते तुमच्या भेटीसाठी तुमच्या घरा बाहेर थांबलेले आहेत. लग्नानंतर आमचा दिवस सुरु होणार तो तुमच्या गाण्याने आणि संपणार तोही तुमचाच आवाज ऐकत!!!

शास्त्रीय संगीतातले कळत नव्हते तरी नकळतपणे तुमच्या आवाजशी कनेक्ट झाले. तुमचं गाणं आहे फक्त गाणं वाटत नाही तर अंतरात्म्याशी जोडणारी एक अनुभूती असते. असं आत्म्याशी जुळलं गेलेलं एक अजब नातं होतं आपल्यात. 

मला आठवते ती तुमची नाशिक मधील गाण्याची मैफिल. मिस्टरांबरोबर मी देखील तुमचे गाणे ऐकायला आले होते. तेव्हा मैफिल सुरू होण्याआधी आम्ही सर्व तुम्हाला भेटायला आलो. तुमच्या चेहर्‍यावरचे तेज, ग्रेस किंवा ओरा पाहून भान हरपले. हे सर्व पेलण्याची पात्रातच नव्हती माझी. त्यामुळे मी स्तब्ध होऊन नुसतेच बघत राहिले. नमस्कार करणे पण नाही सुचले नाही. डोळ्यातून नकळत घळाघळा पाणी वाहत होते. तेव्हापासून जे काही कनेक्शन निर्माण झाले ते मी शब्दात कसे मांडू तेच कळत नाहीये. पण आपलं हे नातं म्हणजे खूप जवळचे असे आहे. या नात्याला कोणतीही ओळख किंवा कोणतेही नाव असण्याची गरजच भासली नाही. अगदी रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळचे असे बंध जुळले गेले. 

खरं तर तुम्हाला भेटणे आणि तुमच्याशी ओळख करून घेणे माझ्यासाठी काही फार अवघड नव्हते. पण तुमच्या गाण्यातून जो काही निरागस, निर्मळ असा भावबंध निर्माण झाला होता त्यापुढे प्रत्यक्ष भेटण्यासाठी काही उरलेच नव्हते. 

ओढ असते ती फक्त तुमच्या स्वरांची, तुमच्या आवाजाची.

1992 मध्ये सवाई गंधर्व मध्ये तुम्हाला प्रत्यक्ष ऐकलं. तेव्हा ब्रह्मानंदी तंद्री लागणे म्हणजे काय अनुभवले. त्यानंतर मात्र तुमचे गाणे ऐकण्यासाठी प्रत्येक सवाईगंधर्व मध्ये खास पुण्याला येत होतो. तुमचा आवाजातलं जय हो कानावर पडले की आयुष्यच विजयी झाल्यासारखे वाटायचे. तुमचे व्यासपीठावर आगमन, मराठीत बोलणे आणि सर्व रसिकांना करत जय हो म्हणणे इथेच मन तृप्त होऊन जात असे. त्यानंतर सुरू होणारे गाणे म्हणजे आनंदाची, सुखाची अनुभूती!!! याच साठी केला अट्टाहास.... असे वाटायचे आणि पुण्याला धडपडत येण्याच्या प्रवासाचे सार्थक व्हायचे.

काल अचानकपणे तुम्ही आम्हाला सोडून गेलात आणि कोणी तरी अगदी हृदयस्थ गेल्यासारखे आम्ही दोघंही खूप रडलो. आपल्या शरीराचा एक हिस्साच कोणीतरी काढून घेतला अशी जाणीव झाली. मला माहिती आहे तुमच्या जाण्याने संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे ती खरंच भरून निघणार नाही. पण खरं सांगायचे तर मला ती भरायची पण नाहीये. कारण ती पोकळीच मला नश्वरतेची  जाणीव देत राहील. आणि तुम्ही शरीररुपी नसला तरी तुमचा आवाज तुमचे संगीत, तुमचे गाणेच ती पोकळी भरत राहील याची खात्री आहे.

फक्त उणीव भासेल ती तुमच्या जय हो या शब्दांची. मला माहित नाही यापुढे मी सवाईगंधर्वला कशाच्या ओढीने  जाईन किंवा जाऊ शकणार नाही. तुम्ही थकले होतात, तब्येत बरी नसायची तरीही आमच्या सारख्या रसिकांना तुम्हाला ऐकायचे असायचे, पाहायचे असायचे. तुम्ही कधीच आम्हाला निराश केले नाहीत. एकदा ते स्वरमंडळ छेडले की तुम्ही स्वतःही वेगळ्या दुनियेत जात आणि तुमच्या बरोबर घेऊन जात असत. तुमच्याबरोबर केलेला संगीताचा प्रवास अवर्णनीय आणि अविस्मरणीय असा आहे. तुमचे गाणे  साक्षात ईश्वर भेटीची अनुभूती असते. मला माहित नाही देव, ईश्वर, परमेश्वर म्हणजे नक्की काय??? पण तुमच्या गाण्यातून जी काही स्पंदनं मनाला जाणवत असतात त्यालाच मी ईश्वर असे म्हणेन. तुमच्या आवाजातील ओम नमो भगवते वासुदेवाय हे भजन ऐकल्याशिवाय मैफिल पूर्ण होतच नव्हती. आता प्रत्येक सवाईगंधर्व असो किंवा कुठेही शास्त्रीय मैफिल असो, प्रत्येक व्यासपीठ तुमच्या आवाजाशिवाय अपूर्ण आहे. जिथे व्यासपीठ,  माइक, स्पीकर तबला, तानपुरा, हार्मोनियम, स्वरमंडल यासारखे निर्जीव साधनं देखील तुम्हाला मिस करतील तिथे आमच्यासारख्या सजीवांची काय कथा!!! तुम्हाला तर जिवंतपणीच सदगती लाभली होती. त्या सदगतीची अनुभूती देखील तुम्ही आम्हाला दिली आहे. त्यामुळे तुमच्या आत्म्यास सदगती मिळावी ही प्रार्थना ही तुमच्यासाठी व्यर्थ आहे. तुमचे शरीर रुपी अस्तित्व संपले असले तरी तुमच्या आवाजातून तुम्ही कायम आमच्यासाठी आमच्या सोबत आहात. फक्त अपूर्णता आहे ती तुमच्या जय हो शब्दांची आणि तुमच्या भरभरून मिळणाऱ्या आशीर्वादाची!!!

*जय हो* पंडितजी🙏🙏🙏


तुमची निस्सीम भक्त,

सौ. मंजुषा देशपांडे , पुणे.

Thursday, 30 April 2020

इनोसन्स ओव्हरलोडेड

आत्ता खरं सांगायचे झाले तर आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे अशी काहीशी मनाची अवस्था झाली आहे. का म्हणून विचारता आहात?
त्याला कारणही तसेच आहे.  
वाचकहो, माझ्या बेसूर गाण्यावर खुष होऊन दाद देणारा मला चक्क एक श्रोता मिळाला आहे.
त्यामुळे 'आज मै उपर आसमा नीचे, आज मै आगे जमाना है पीछे' असे म्हणत मी वेगळ्याच दुनियेत रमले आहे. 
खरे तर आपल्याला चांगले गाणे म्हणता येईल अशी मला का कोण जाणे, पण पक्की खात्री होती. 
त्यासाठी मी खरंच खूप धडपड पण केली हो!!!
पण मेलं ते सूर, लय आणि ताल कायम माझ्याशी शत्रूत्व असल्यासारखे माझ्यापासून दूरच राहतात. 
छान काहीतरी गुणगुणावे म्हणावे तर एक सुद्द्धा मदतीला येत नाही. मला ते दुरून चांगले दिसत असतात. पण घशाच्या आसपासही फिरकत नाहीत.
खूप राग येऊन मी चिडून त्यांना म्हणायचे, " गद्दारांनो, अरे तुम्हाला आत्मसात करण्यासाठी राब राब राबले रे मी!!! अरे,अनेक हाडाच्या गुरुंनी माझ्यापुढे हार मानून काढता पाय घेतला. मी मात्र अजूनही हार मानायला तयार नाही. हे सुरांनो, थोडी तरी किव करा माझ्या कष्टांची."
पण त्यांनी जणू, " पाषाणाला गाणं येईल पण तुला येणार नाही," हे माझ्या एका गुरूंचे शब्द खरे करण्याचा विडाच उचलला होता.
तेव्हापासून आजतागायत आपल्याला गाणे म्हणता येत नाही ही खंत मनाला होती.
होती....हं ... म्हणजे आता नाहीये बर का...
कारण काय तर माझा तो लाडका श्रोता. 
कोण असेल बरर्र्.....
नुकतेच इवल्या इवल्या पावलांच्या रूपांनी घरात चिमुकलीचे आगमन झाले.तिला खेळवताना, झोपवताना नकळत कोणाला ऐकू जाणार नाही अशा हळू आवाजात गाणी गुणगुणू लागले.
अहो, काय आश्चर्य !!! ते इवले इवले डोळे माझ्यावर रोखले गेले. आधी मला वाटले एवढ्याशा जीवालाही माझे बेसुरेल गाणे कळले कि काय???
पण लगेच त्या इवल्याशा ओठांनी हसून दाद दिली. 
अहाहा ..... मला झालेला काय तो आनंद ...माझ्यात नसलेल्या सूर-लय-तालाकडे फोकस न करता अगदी निरागस दाद मला मिळाली. 
मग काय माझ्या दबल्या  गेलेल्या सुप्त इच्छेने परत डोके वर काढले.
चिव चिव ये, इथे इथे बैस रे मोरा पासून  सुरु झालेला माझा गाण्यांचा प्रवास थेट सिनेगीतांपर्यंत कसा जाऊन पोहचला कळालेच नाही.आजवर जी गाणी माझ्या घशातून बाहेर पडायला चाचरत होती, ती आता अगदी भरभरून बाहेर येत असतात. 
अशा प्रकारे आजवर अनेक चांगल्या चांगल्या गाण्यांची मी मनोसक्त वाट लावली. पण माझ्या प्रिय श्रोत्याकडून येणारा प्रतिसाद मात्र कायम तोच आणि तेच गोड कधी खुदकन तर कधी खळखळून हसणे.


कधी वाटायचे की आपल्या तिला खेळवण्याच्या  किंवा झोपावण्याच्या जीव तोडून केलेल्या प्रयत्नांनावर आपली दया येऊन तर ती दाद देत नाही ना???
पण छे!!! त्या निरागस मनात हे विचार येणार तरी कुठून???
तिचे ते गोड हसणे म्हणजे इनोसन्स ओव्हरलोडेड चा प्रत्यय ...
यावरून मला निरागसता म्हणजे नक्की काय याची अनुभूती आली. 
आपण सर्वसाधारणपणे कोणालाही अमुक खूप निरागस आहे असे म्हणतो.
पण खरी निरागस अवस्था कशी असते हे फक्त अगदी लहान मुलाकडे पाहूनच कळते.
आता तर खूप वेळ या निरागस मनासोबत राहत असल्याने त्याची जाणीव अगदी तीव्रतेने झाली.
कोणी काहीही बोला ... ओरडा... रागवा... गोड बोला..काहीही कळत नाही...
हसू आले कि मनोसक्त हसायचे...रडू आले कि जोरात भोकाड पसरायचे... कोण काय म्हणेल...कोण कोणत्या उद्देशाने बोलतोय ....कसलेच काहीही देणे घेणे नाही....आपल्या दुनियेत मस्त रममाण....
ही अवस्था कायम राहिली तर...
आयुष्य काय धमाल होईल ना....
कोणी काही म्हणा...मला फरक पडणार नाही...मी मस्त स्वतःच्या दुनियेत मशगुल...राग आला तर कसला राग आला सांगून मोकळे...कोणाविषयी काही चांगले वाटले.... मनमोकळे बोलून मोकळे...मनात कोणाविषयी आकस नाही...हेवेदावे नाही... रागलोभ नाही...इर्षा, द्वेष काहीही नाही...
जीवनात उरेल काय ...तर निखळ ...निर्मळ आनंद...
एवढे सोपे असते जगणे???? मग अवघड होण्यास सुरुवात कुठून होते ...शोधलेच पाहिजे...
आपण सर्रास म्हणतो की बालपण आणि म्हातारपण सारखेच असते.
मग म्हातारपण का त्रासदायक वाटत असावे किंवा वृद्ध व्यक्ती का लहान मुलासारख्या वाटत नाही...
म्हातारपणी मन बालिश होते. लहान मुलासारखं हट्ट करणे, मागण्या करणे, न ऐकणे सुरु होते..... 
त्यामुळे त्यांचे वागणे लहान मुलासारखे वाटत असावे....पण फरक कुठे असतो...तर तो निरागसपणात...
या निरागसतेमुळे लहान मुल कोणालाही पटकन आपल्याकडे ओढून घेते.
पण सर्व वृद्ध आनंदी का नसतात किंवा  लहान बाळाला पहिल्यावरआपल्याला जो आनंद अगदी नेहमीच होतो...तसाच आनंद वृद्ध व्यक्तीकडे पाहून नेहमी नाही होत .......
कारण संसारिक व्यापात आणि भौतिक जगात समजदार..जबाबदार...होण्यात  मनाची निरागसता कुठेतरी हरवली जाते....
वास्तविक आयुष्य सुखी समाधानी राहण्यासाठी ती हरवू न देणे ...ती जपणे....खुप महत्वाचे असते.
पण आपणच असं नाही करू...तसं नाही करू...लोकं हसतात...तो अमुक बघ किती छान वागतो...असे करत त्या निरागसतेला सुरुंग लावण्यास सुरुवात करतो.
मग सुरुवात होते जगण्याच्या स्पर्धेच्या तयारीला...त्यातून जन्म घेतात तुलना...इर्षा..आनंद...दु:खं....आशा ...निराशा ...हार ... जीत....
काही लोकं अशा अवस्थेतच शेवटपर्यंत जगतात....तर काही शोध घेतात निखळ न संपणाऱ्या आनंदाचा....
मग शोध सुरु होतो त्या निर्मळ...निरागस  मनाचा...
एकूण काय तर जन्म म्हणजे निरागसतेकडून निरागसतेकडे प्रवास...
जो हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करतो किंवा ही निरागसता कायम जपू शकतो त्यालाच enlightenment किंवा आत्मसाक्षात्काराची अनुभती येत असावी असं मला वाटतं.
सद्या तरी मी आता माझ्या घरात वाहणाऱ्या निरागसतेच्या धबधब्यात मनोसक्त भिजतेय....
या भिजण्यातही खरा आनंद गवसतोय .....असेच भिजून भिजून ती निरागसता माझ्यातही झिरपली तर........

- मंजुषा देशपांडे, पुणे.











Sunday, 16 February 2020

ती पहिली रात्र

आई, माझा हा एकविसावा वाढदिवस आहे. तो नक्की खास झाला पाहिजे." लेकीने फर्मान काढले.

तसा आजवर कोणता वाढदिवस खास झाला नाही ग असे तोंडापर्यंत आलेले वाक्य परत वादाला तोंड नको म्हणून तसेच गिळून घेतले.

"आता काय खास करायचं आहे ते देखील सांगून टाक ना."

तिला हवा असलेला प्रश्न मी विचारला.

“आई, तुम्हाला सरप्राईज असे काही देताच येत नाही. तूच सांग बरं मी अगदी लहान असल्यापासून काय मागतेय ते?" लेकीने मलाच प्रतिप्रश्न केला.

“कुत्र्याचं पिल्लू? नाही ग बाई, तेवढे सोडून काहीही माग. तुला माहिती आहे की मला सर्व कीटकांची आणि प्राण्यांची खूप भीती वाटते. तुम्ही सगळे निघून जाल आपापल्या कामांना आणि ते पिल्लू येईल माझ्याच गळ्यात. अजिबात नाही." मी अगदी निक्षून सांगितले.

खरेतर कुत्र्यांची मला एवढी भीती का आहे मलाच कळत नाही. बाहेर गेल्यावर रस्त्यावर कुठेही कुत्र्याने मला पाहिले की ते माझ्याच मागेमागे येत आहेत असे वाटू लागते. मग माझा खूप गोंधळ उडतो. मला सारखे वाटू लागते की हे कुत्रं मला चोर समजून चावणार तर नाही ना? हातात पिशवी असेल काही खायचे आहे समजून अंगावर धावणार तर नाही ना? त्यामुळे दूरवर कुठेही कुत्रं दिसले रे दिसले कि मी खूप सैरभैर होते. कारण भराभर चालावे तर तेही जोरात मागे येण्याची भीती आणि हळूहळू चालावे तर पटकन चावायची भीती!!! खरतर सर्व माझी टिंगल करतात, पण आहे मला भिती, काय करू? त्यामुळे घरात पिल्लू येणे शक्यच नव्हते.

माझा ठाम विरोध पाहून लेकीचा चेहरा खूप हिरमुसला.

मी तिला परत समजावले," तुला  तुझ्या मनाप्रमाणे कुत्र्यांचे प्रशिक्षण घ्यायला पाठवतो आहोत ना? मग आता पिल्लू आणण्याचा हट्ट सोडून दे."

लेक कशीबशी  गप्प बसली. पण तिची  नाराजी वाढदिवसाच्या आदल्या रात्री पर्यंत तशीच होती.

खरंतर तिला प्राण्यांविषयी भयानक म्हणता येईल असे प्रेम आहे. कित्येकदा ती  रस्त्यावरची  पिल्ले उचलून आणत असते आणि मी मात्र तिला ते कोणालाही द्यायला लावते.

त्यामुळे  तिचे नाराज होणे स्वाभाविक होते.

ह्यावेळी मी विचार केला की जाऊ दे, लेक आता एकवीस पूर्ण झाली आहे, चार पाच वर्षांत लग्न होऊन सासरी जाईल. नंतर तिचा हा एकमेव हट्ट आपण पूर्ण न केल्याची खंत मनाला राहील. तेव्हा ह्या वाढदिवसाला तिला पिल्लूच भेट देऊ.

झालं, मी तयारी दाखवल्याबरोबर लेकीच्या वाढदिवसाला सकाळी सकाळी आमच्याकडे बिगल जातीच्या पिल्लाचे आगमन झाले. लेक तर सरप्राईज बघून आनंदाने हुरळून गेली. बरं, एवढं करून मी गप्प बसायचे ना? पण लेकीवरच्या अती प्रेमापायी मी तिला जोरात म्हटले, " तू कुत्र्यांचे प्रशिक्षण घ्यायला जाशील तेव्हा पंधरा दिवस मी सांभाळ करेन पिल्लाचा. माझ्याकडून तुला ही अजून एक भेट". लेक प्रेमाने गळ्यात पडली. लेकीला झालेला आनंद पाहून मन समाधानाने भरून पावले.

यथावकाश पिल्लाचं ‘चेरी’ म्हणून नामकरण झाले.

चेरीचा वावर घरभर होऊ लागला तसे आपण काय करून बसलो ह्याची जाणीव झाली. ती सारखी इकडून तिकडे पळून धिंगाणा घालू लागली. चेरीने माझ्याकडे नुसते पाहिले तरी मी धूम ठोकायचे. मला पळताना पाहून ती अजून जोरात माझ्या मागे  लागायची. मी अजूनही पळू शकते हे चेरीनेच मला दाखवून दिले. बर, एवढ्या मोठ्या घरात तिला मला सोडून इतरांच्या मागे लागायला काय हरकत होती? पण मी दिसली कि ती जोरात माझ्याकडे येणार!

लेक मला समजवायची,” आई, ती प्रेमाने येते ग, ती खरंच तुला काहीच करणार नाही. तिला फक्त तुझ्याशी खेळायचे असते. एकदा बघ ना ती किती निरागस आहे.” भीतीपुढे मला ना चेरीचे निरागस डोळे दिसायचे, ना तिचे खेळणे दिसायचे. तिला बघून जाणवायची फक्त भीती, भीती आणि भीती. लेक मात्र तिचे शी शू पासून सर्व अगदी मनापासून करत होती.

बघता बघता लेकीची हैद्राबादला प्रशिक्षणाला जायची वेळ आली. चेरीला सांभाळण्याच्या भीतीने पोटात गोळा आला होता. सर्व सूचना देऊन लेक रवाना झाली.

चेरीसोबत काढलेली ती पहिली रात्र.... आठवले तरी धडधड होते. घरात सर्वांना मारे जाहीर केले की मी चेरीसोबत राहीन, तुम्ही झोपा बिनधास्त. मला वाटले रात्री ती खाली झोपेल आणि मी दिवाणावर.....एकदम सुरक्षित!!!

पण झोपायची वेळ होताच तिने रंग दाखवायला सुरवात केली. तिला काहीही करून दिवाणावरच यायचे होते. आधी तिने बारीक आवाजात रडका सूर लावून बघितला. मी दाद देत नाही म्हटल्यावर ती माझ्याकडे बघून भुंकायला लागली. तिची नजर खूप भेदक वाटली. वाटले की आता केव्हांही आपल्यावर हल्ला होऊ शकतो.

मी तिला जीव तोडून सांगत होते,” बाळा, मला तुझी भीती वाटते ना, मी तुला उचलून नाही घेऊ शकत ग!”

पण त्या बिगलच्या लांब लांब कानांमध्ये काही माझा आवाज शिरत नव्हता. तिचे आपले रडणे, भुंकणे चालूच. आता ती खूप चिडली तर रागात दिवाणावर चढेल ह्या भीतीने मला घाम फुटला. मी उशी तोंडावर घेऊन तिची नजर टाळत जोरजोरात सर्वांना बोलावले. काय झाले म्हणून घरातले सर्व दाराजवळ आले तर दरवाजा उघडेचना...चुकून माझ्याकडून दरवाजा लॉक झाला होता. म्हणजे मला दिवाणावरून खाली उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. आता आपले काही खरं नाही असे वाटू लागले. शेवटी सर्व धीर एकवटून उशीची ढाल बनवून कसाबसा दरवाजा उघडला. मुलाने मांडीवर घेतल्यावर चेरी पटकन झोपली.

पण मला झोप कुठे लागते? सतत कानांत चेरीचा आवाज घुमत होता. ती आपल्याला चावायला आली आहे असे वाटून धडधड होत होती. मध्येच दचकायला होत होते. ह्या घाबरण्यातच नेमके माझे पांघरूण धपकन खाली पडले आणि चेरी परत उठून बसली.

परत तिची तशीच चुळबूळ सुरु झाली. आता परत घरातल्यांची झोप मोडायला नको म्हणून मी दुरूनच तिला झोपवण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या डोक्यात अचानक विचार आला की जसे लहान मुलांना झोपवायला अंगाईगीत असते तसे आता प्राण्यांसाठीही काही गाणी असतीलच. मग लगेच गुगल वर शोध घेतला आणि गाणे मिळवले. त्या गाण्याने मी पेंगले पण ती काही झोपायलाच तयार नव्हती. आता तिला मांडीवर घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

लेकीचे सर्व बोलणे आठवले. तिने सांगितले होते, “आई, पिल्लू जेव्हा खाण्याच्या आणि झोपेच्या मूड असते ना तेव्हा मस्ती करून चावत नाहीत. तसेच कुत्रं जेव्हा शेपूट हलवत जवळ येतं तेव्हा ते प्रेमाने जवळ येत असते. त्यामुळे तू उगाचच घाबरत जाऊ नको. लहान पिल्लू आपल्याला कधीच चिडून चावत नसतं. ते आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतं.”

सगळं काही आठवून चेरीचे लक्षणे तपासली. ती शेपूट हलवत भुंकत होती आणि झोपेच्या मोडमध्ये गेली होती.

मग खूप खोल श्वास घेतले आणि मनाचा धीर करून मोठं जाड पांघरूण पायांवर घेऊन खाली बसले. ती जोरात येऊन मांडीत बसली आणि माझ्या कुशीत शिरून लगेच गाढ झोपली. मी जीव मुठीत घेऊन घामाने चिंब भिजले होते. पण अजिबात हलले नाही. कारण माझ्या हालचालीने ती परत मस्तीच्या मोडमध्ये जाण्याची भीती होती. पण चेरीच्या त्या स्पर्शाने मी उभा केलेला भीतीचा बागुलबुवा कुठच्या कुठे पळून गेला. मग वाटले की अरे इतकी सोपी गोष्ट होती ही आणि आपण किती मोठा भीतीचा डोंगर उभा केला होता. अखेर तिला हळूच खाली झोपवलं आणि मी देखील झोपेच्या अधीन झाले. अशाप्रकारे चेरीची आणि माझी ती पहिली रात्र यशस्वीपणे पार पडली.

सौ. मंजुषा देशपांडे, पुणे.