लेख मंजुषा

Happy Anniversary “हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?” ती लगेच म्ह...

Sunday, 29 September 2019

मैत्रीची परिभाषा



“काय झाले आई? तुझा मूड का ऑफ आहे आज? काय घडलेय?”
“काही नाही ग असंच!”
“कुछ तो हुआ है मॉम... नही तो तुम ऐसी गुमसुम नही बैठती
लेकीच्या ह्या वाक्याने नेहाच्या डोळ्यांत टचकन पाणी आले. स्वतःला कसेबसे सावरत ती लेकीला म्हणाली, “तुम्हा मुलांचा एवढा मोठा मित्र परिवार असतो, सर्वांशी तुम्ही अगदी जीवश्च-कंठश्च असल्यासारखे वागतात. खरंच तुम्ही एवढे क्लोज्ड असतात?”
“ हो...अर्थात! सगळे क्लोज्ड असतात; पण त्या त्या विषयापूरते. बाकी सर्व विषयांच्या संबंधित किंवा सर्वस्व म्हणता येईल असे फार थोडे असतात.
“म्हणजे? मला नाही कळाले. अशी विषयाप्रमाणे मैत्री असते? ती ही जिवाभावाची?” नेहाने आश्चर्याने विचारले.
“ अरे जमाना बदल गया है भाई. तो दोस्ती की परिभाषा भी बदलनी चाहिये ना मॉम.”
“ जरा मला समजेल अशा भाषेत बोलाल का मॅडम!!!! आधीच माझा मूड ठीक नाहीये.”
“ मी तर आधीच तुला विचारले ना की काय झालेय तुला?”
अगं, सगळं कसं अचानक बदलल्यासारखे वाटते. कोण आपला आणि कोण परका काहीच कळत नसल्यासारखे वाटते. कोणासोबत राहावे, कोणावर विश्वास ठेवावा काहीच कळत नाही ग. माणसं अशी बदलू शकतात ह्याचा विचार करून खूप त्रास होतो.” नेहा अजूनही खूप अस्वस्थ होती.
“कम ऑन मॉम, किती विचार करतेस ग प्रत्येक गोष्टीचा? खरं सांगू का आई, व्यक्ती बदलत नसते. पण आपण त्या व्यक्तीला ओळखण्यात चुकलेलो असतो आणि आपली ती चूक आपल्याला मान्य नसते. म्हणून मग खापर दुसर्‍यावर फोडले जाते. तुझे वागणे म्हणजे मैत्री करायची तर शंभर टक्के नाहीतर लगेच तू अंतर्मुख होतेस आणि सगळ्यांपासून तुटल्यासारखी बाजूला होतेस. दॅट्स नॉट फेअर मॉम. यू हॅव टु अॅडजस्ट विथ ऑल टाइप्स ऑफ पीपल.”
“ कळते ग मलाही ते, पण कसे? अॅडजस्ट होणे आणि अप्रामाणिक असणे हयातला फरकच मला कळत नाहीये.” नेहा खूपच वैतागली होती.
“आईड्या, तुझा गोंधळ कुठे होतो सांगू का? तू ना मैत्रीचे ते जूनेच समीकरणे डोक्यात घेऊन बसली आहेस. अमुक एक व्यक्ती आपली मैत्रीण म्हणजे तिच्याशी सर्व काही शेअर करायचे. बरं, शेअर करणेही ठीक आहे, पण तुला लगेच वाटायला लागते की तिने पण तुझ्याशी तसेच राहावे.”
“बरोबरच आहे ना मग??? मी तर आजवर अशीच मैत्री केली आहे प्रत्येकाशी.” नेहा ठामपणे बोलली.
यही तो लोच्या है न भाई, जमाना किधर जा रहा है और तू वही अटक के पडी है. सून भाई,
“एक मिनिट, तू तुझे ते भाई बी आधी थांबव आणि नीट बोल माझ्याशी”. नेहा चिडून बोलली.
“अगं माते मी काय सांगते ते नीट ऐक आधी. आता काळाप्रमाणे तू स्वतःच्या राहणीमनात बदल केलेस ना??? तशी आता मैत्रीची परिभाषाही बदलून बघ. तू काय कर, माझ्यासारखे मैत्रीचे वेगवेगळे कप्पे मनात तयार कर. कोणतीही मैत्रीण किंवा मित्र भेटला की पहिल्यांदा कप्पा आठवायचा. मग पटकन तो कप्पा उघडून मनोसक्त मजा करायची. बाकी त्या व्यक्तीच्या आयुष्यात ती काय करते, कोणाबरोबर राहते त्याच्याशी आपला काहीही संबंध नसतो. मग बघ तुलाही प्रत्येक मैत्रीचा आनंद लुटता येईल.”
“ असे केल्याने तर आपली जीवाभावाची अशी मैत्री कशी होणार ग?” नेहाला हे सर्व वेगळेच वाटत होते.
“अरे यार ऐक तर पूर्ण. जेव्हा आपल्या आयुष्यात एखादी मैत्री येते तेव्हा लगेच तिला जवळची सखी असे मानण्याची घाई नाही करायची. तिला पटकन एखाद्या कप्प्यात टाकायचे. जसे शाळेची मैत्री, कॉलेजची मैत्री, व्यावसायिक मैत्री, सामाजिक मैत्री असे किंवा इतर अनेक विषय घेऊन कप्पे करायचे आणि त्यात त्या व्यक्तीला टाकायचे. हळूहळू काही मैत्री त्या कप्प्यापूर्तीच राहते किंवा कधीकधी खरोखर जवळची, आपली अशी वाटू लागते. मग त्या व्यक्तीला आपण जीवलग मैत्रीच्या कप्प्यात टाकायचे.”
“बाप रे... मैत्रीतही असे असते?” नेहाचा विश्वासच बसत नव्हता.
“असे काही नियम नाहीयेत ग आई....पण आपल्याला त्रास होऊ नाही म्हणून मी आपले असे करते. म्हणजे कसे होते की एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात उगाचच आपली लुडबूड नको आणि ती कोणाबरोबर कुठेही गेली तरी जोपर्यन्त आपल्या विषयाशी तिचे आपल्याशी चांगले संबंध आहेत तोपर्यंत आपणही काही वाईट वाटून घ्यायचे नाही.
पण ह्या कप्प्यांच्या नादात आपली जीवाभावाची अशी मैत्रीच झाली नाही तर?” नेहाला लेकीचे म्हणणं एकीकडे पटत होते. पण हे वास्तव स्वीकारणे जड जात होते.
“तसे तर कधी होत नाही ग आइडू. पण कधी कधी कप्पा चुकू शकतो. जेव्हा आपल्याला असे वाटते ना की समोरची व्यक्ती बदलली आहे. तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपला कप्पा चुकला आहे. मग कप्पा बदलला की आपल्या त्या व्यक्तिविषयीच्या वागण्याच्या अपेक्षाही बदलतात. पण ह्या कप्प्यांना थोडा वेळ दिला ना की त्यातूनही जिवाभावाचे सख्य होऊ शकते ग. समजा नाहीच झाले तर एकला चलो रे म्हणत जीवन आनंदात घालवायचे. आपल्या आयुष्यात आपला आनंद कायम स्वतः कडे असतो असे तूच म्हणतेस ना. तसे पाहिले तर आपण जन्माला एकटे येतो आणि जाणार पण एकटेच असतो. त्यामुळे मैत्री अमर असते, जीवास जीव देणारी असते ह्या सर्व बोलायच्या गोष्टी असतात. कोणाचेच आयुष्य कोणावाचून थांबत नसते. हेच सर्व प्रकारच्या संबंधांना लागू आहे. त्यात कौटुंबिक, सामाजिक, व्यावहारिक आणि व्यावसायिक संबंधातही असे कप्पे करून जगल्यास आयुष्य सुखकर होते. त्यामुळे काहीही चढउतार आले तरी शो मस्ट गो ऑन म्हणत जगण्याचा आनंद घेत जायचा. जीवनाच्या रंगमंचावर कायम हाऊसफूल शो करण्यासाठी यू मस्ट हॅव टू अॅडजस्ट विथ एव्हरी सिचुएशन. नाहीतर तुम्ही दुनियेच्या अशा कोपर्‍यात फेकले जाल की स्वतःच स्वतःला सापडणार नाही.”
“कुठे शिकलीस ग ही सर्व??? थॅंक्स डियर!!! असे म्हणत नेहाने लेकीला गच्च मिठी मारली, खुशीतच स्वतःभोवती एक गिरकी घेतली. “आधी शोधा कप्पा मग करा मैत्रीच्या गप्पा” असा मंत्र जपत ती मैत्रीच्या नवीन परिभाषेत स्वतःस फिट करायला सज्ज झाली.


 @ सौ. मंजूषा देशपांडे, पुणे





Friday, 20 September 2019

काव्य मंजुषा (कविता- जाग)

गाढ झोपेतून एकदा अचानक मला
जाग आली
माझ्या विश्वात डोकावून बघण्याची खूप
घाई झाली

आपल्याशिवाय सर्वकाही सुरळीत पाहून
मन हेलावले
उद्विग्न मनास वाटले की आजवर
कोणासाठी  जगले

कोणी रडावे कोणाचे अडावे असे
नाही वाटले
पण आपल्याशिवाय जग चालते हे
सत्य उमगले

प्रेम विरह सुख दु:खं सर्वकाही
खोटं असतं
अखेरीस आपणच आपले सोबती हेच
खरं असते

जे आपले नसते  त्यासाठी आपण
धडपडत असतो
त्या स्वप्नमय विश्वात अखेरपर्यंत
जगत असतो

वेळीच यावी जाग थांबविण्या रमणे
फसव्या विश्वात
निर्लेप होऊन  जगावे प्रत्येक सेकंद
स्व शोधात

मनस्विनी 


-मंजुषा देशपांडे, पुणे.







Wednesday, 3 July 2019

बाप माणूस

एखाद्या मोठ्या व्यक्तीसाठी ' बाप माणूस' हे विशेषण लावले जाते. माझ्या आयुष्यातही असा बाप माणूस होता. दुर्दैवाने आता होता असेच म्हणावे लागेल. सामाजिक दृष्ट्या ती एक सर्वसामान्य व्यक्ती होती. प्रसिद्धीचे फार काही मोठे वलय त्या व्यक्तीभोवती नव्हते. पण माझ्यासाठी आदर्श असे ते व्यक्तिमत्व होते.
लहानपणापासूनच त्या व्यक्तीविषयी एक आदरयुक्त भीती होती. त्यांना आपण आवडलो पाहिजे, त्यांनी आपले कौतुक करावे ह्यासाठी मी धडपड करायचे. त्यामुळे त्यांना आवडणारी के. एल. सैगल, तलत मेहमूदची मी देखील मनापसून ऐकायचे. त्यांची वाचनाची आवड मलाही लागली. त्यांनी आयुष्यात कधी तोंडावर कौतुक केले नाही. पण त्यांचा चेहरा खूप बोलका होता. जे मनात ते चेहेऱ्यावर लगेच दिसायचे. त्यामुळे आपली कोणती गोष्ट त्यांना आवडते आणि कोणती नाही हे मी नकळत शिकत गेले.
वास्तविक त्यांचा सर्व उमेदीचा काळ कर्ज फेडण्यातच गेला. पण सर्वसाधरण परिस्थितीशी झुंज देत आपली आवड, आपला स्पष्टवक्तेपणा आणि आपला स्वभिमान जपलेली ही व्यक्ती माझ्यासठी खूप अभिमानस्पद होती. आपली चित्रपट आणि साहित्याविषयीची आवड जपताना त्यांनी घरातली एकही जबाबदारी नाकारली नाही. कधी आपल्या परिस्थितीबद्दल कुरबुर केली नाही. पैसे वाचवून वाचवून बँकेतले आकडे नाही वाढवले. तर त्या पैशांतून साहित्य संमेलन आणि चित्रपट, विशेषतः राज कपूरचे चित्रपट एव्हढी चैन मात्र अगदी मनापसून केली. चोरी चोरी ह्या चित्रपटाची किती पारायणे झाली असतील हे त्यांचे त्यांनाच ठाऊक!!!
आज प्रत्येकजण आनंद... सुख ...शोधत निव्वळ पैशांच्या मागे धावताना पहिले कि वाटते माझ्या बाप माणसाला जीवन खऱ्या अर्थाने कळले होते.
त्यांचे हसणे मनापासून, बोलणे मनापासून आणि चिडणेही अगदी मनापासून होते. अंतर्बाह्य स्वच्छ, नितळ असा हा माणूस. जगताना लोकं काय म्हणतील ह्याची त्यांनी कधीच पर्वा केली नाही. एखादा चित्रपट आवडला तर चार चार वेळा जाऊन पाहून येणार! राजकारणावर परखडपणे बोलणार आणि एखादी गोष्ट नाही पटली तर तोंडावर सांगून मोकळे होणार. आता वरवर पाहता वाटेल कि असे काय विशेष होते ह्या व्यक्तीमत्वात?
पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात जी परिस्थिती येईल ते ती स्वीकारत गेले आणि त्यातूनही स्वतःचा आनंद शोधत राहिले. आनंदी आणि सुखी जगण्यासठी पैसा महत्वाचा नसतो तर आहे त्या परिस्थितीला स्वीकारत आपले छंद जोपासणे महत्वाचे असते हे त्यांनी त्यांच्या उदाहरणातून दाखवले. आपले मत मांडताना ते  कधी कचरले नाही. मनात एक आणि बाहेर एक असे कधीच वागले नाही. आपली चूकही अगदी मोकळेपणाने मान्य करायचे. जेव्हा मुलेबाळे सर्व काही स्थिरस्थावर होऊन निवृत्तीचे आयुष्य जगण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या नजरेने त्यांना धोका दिला. डोळ्यांच्या पडद्या संबंधीचा विकार असल्याने त्यावर काहीही इलाज नाही असे निदान झाले. एक डोळा पूर्ण निकामी झाला होता आणि दुसऱ्या डोळ्याची दृष्टी फक्त ४०% राहिली होती. ती देखील हळूहळू जाऊन पूर्ण अंधत्व येईल असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे निवृत्तीनंतरचे भरपूर वाचन करणे, लिखाण करणे, नाटके बघणे असे रचलेले सर्व मनोरे जमीनदोस्त झाले. पण सहजासहजी हार मानणारे ते व्यक्तिमत्वच नव्हते.
आपल्या अंधत्वाला कुरवाळत बसून ते कधी रडत बसले नाही. तर रेडिओवर गाणी, श्रुतिका ऐकत आपला दिवस ते आनंदात घाल वायचे. आज जेव्हा मी सकारात्मक विचारांविषयी  किंवा सिक्रेट सारखी पुस्तके वाचते तेव्हा मला लक्षात येते कि हा माणूस तर हे असेच जगला आहे.
नंतर एकदा त्यांना मी त्यांच्या वाढदिवसाला आयपोड आणि  हेडफोन भेट म्हणून दिले. त्यात त्यांना व.पु. काळे, पु. ल. देशपांडे आणि प्र. के. अत्रे अशा त्यांच्या दैवतांचे कथाकथन, भाषणे भरून दिले. हे मात्र त्यांना इतके आवडले कि एरव्ही नवीन तंत्रज्ञानाशी फारकत असलेल्या ह्या व्यक्तीने दिसत नसतानाही ते कसे चालू करायचे, काय ऐकायचे ते कसे निवडायचे हे बोटांच्या सहाय्याने व्यवस्थित शिकून घेतले. मग सकाळी लवकर उठून अन्हिकं, देवपूजा आणि नेम केलेला जप पूर्ण झाला कि आपले कानात हेडफोन घालून मस्तपैकी स्वतःच्या विश्वात रमून जायचे. प्रत्येकवेळी तेच तेच ऐकताना जणू आपण हे प्रथमच ऐकत आहोत अशी दाद देत खळखळून हसायचे. हातचे काही राखून ठेवणे त्यांना कधी जमले नाही. त्यामुळे त्यांचे हसणेही दिलखुलास होते. थोडक्यात काय ते स्वतःशी कायम प्रामाणिक राहिले. आपल्याला काय आवडते आहे त्याच्याशी त्यांनी तडजोड केली नाही. गाठीशी फार सोनं नाणे नाही ठेवले पण सोन्यासारखे जीवन जगले.खुपदा असे होते कि भविष्याच्या साठवणीत आपण स्वतःला विसरून जातो आणि नंतर अशी वेळ येते कि पैसा पुष्कळ असतो पण आपल्याकडे त्याचा उपभोग घ्यायला  दिवस कमी असतात. मग जन्मा येउनी काय केले असा पस्तावा होतो. हा पस्तावा करण्याची त्यांना कधी वेळ आली नाही. कारण त्यांचे आयुष्य ते त्यांना पाहिजे तसे जगले.
एक दिवस पहाटे अचानक छातीत कळ आली आणि काही क्षणातच त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. ते गेले त्यावेळी देखील त्यांचा चेहरा हसतमुख आणि प्रसन्न होता. माझ्या आयुष्यात प्रथमच मी गेलेला माणूस इतका प्रसन्न पहिला. ते सोडून गेल्याचे त्यावेळी खूप वाईट वाटले. पण आज जेव्हा अंथरुणाला खिळलेले लोकं पहाते  तेव्हा त्यांनी त्यांचा अंतकाळ किती चांगला साधला हे जाणवते.
म्हणजे एखादी व्यक्ती खूप प्रसिद्ध नसेल, अगदी संतही नसेल पण आहे त्या परिस्थितीत भरभरून जगू शकत असेल तर तिचा जन्म सार्थकी लागला असे म्हणता येईल. असा हा माझ्या आयुष्यातील बाप माणूस म्हणजे माझे प्राणप्रिय वडिलांचा आज ३ जुलैला वाढदिवस असतो. आयुष्यात कधीही त्यांनी जवळ घेऊन काही शिकवले नाही किंवा कधीच अभ्यासही घेतला नाही. पण त्यांचे जगणे हेच चालते बोलते पुस्तक होते. जेव्हा जेव्हा किरकोळ गोष्टींवरून मन नाराज होते, कसलाच मूड नाही असे वाटते तेव्हा मी त्यांचे जगणे डोळ्यांसमोर आणून स्वतःला आंनदी ठेवते. असे मला जगणेच नाही तर मरणही कसे असावे ह्याचा धडा शिकवणाऱ्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
 तुम्ही माझ्या मनात कायम जिवंत असल्याने मी कधीही तुमची जयंती किंवा पुण्यस्मरण करणार नाही.
-मंजुषा देश्पांडे (पुणे)