लेख मंजुषा

Happy Anniversary “हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?” ती लगेच म्ह...

Thursday, 6 December 2018

सासू मा....

आयुष्य सुखमय होण्यासाठी सासूला सुनेची आईच व्हावे लागते असे ऐकले होते, पण वास्तविक आयुष्यात हे स्थित्यंतर कसे होते याचा छोटासा अनुभव.

म्हणता म्हणता आज आदित्यच्या म्हणजे माझ्या मुलाच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झालीत. आणि दोन वर्षांपूर्वीचा  काळ माझ्या डोळ्यांसमोर आला. वास्तविक तेव्हा त्याच्या लग्नाचे कोणतेही प्रयोजन नव्हते. पण अचानक त्याने मुलगी आमच्या समोर उभी केली आणि पाच सहा महिन्यात तो बोहल्यावर चढला. खरंतर मला एवढ्यात सासुबाई व्हावयाचे नव्हते . सारखे वाटत होते आपण मस्त संपूर्ण घरावर स्वतंत्रपणे राज्य करत आहोत, लग्नानंतर लुडबूड करायला कोणी तरी येणार!!!
बरं मुलाला म्हटले की तुम्हाला वेगळा फ्लॅट घेऊन देतो तिथे तुम्ही संसार थाटा. पण छे!  मुलगाही या गोष्टीला तयार झाला नाही आणि त्यापेक्षा जास्त सून म्हणजे अमृता ही तयार नव्हती.
शेवटी मनाची तयारी केली आणि सासूच्या भूमिकेत शिरले. ठरवले होते की मी सुनेला मुलीसारखीच समजेल म्हणजे ती आपोआप सर्वांमध्ये सामावली जाईल.
पण हळूहळू लक्षात आले की सासु होणे म्हणजे देखील एक प्रकारचे प्रशिक्षण असते. आता मुलगी मानणे म्हणजे काय हे मी प्रथम शिकले. शिकले म्हणण्यापेक्षा अजूनही शिकतेच आहे.
कारण होते काय की सुनेला मुलीसारखे वागतो याचा एक वेगळा अभिमान जागृत होतो आणि त्याप्रमाणे आपल्या अपेक्षा वाढतात.
लेकीने काम नाही केले, उशीरा उठली, मूडप्रमाणे वागली तर आपण नरमाईचे धोरण घेतो किंवा तिला समजावून सांगतो.
पण सुनेने असे काही कधी केले तर???
भराभर आपल्या चांगुलपणाची यादी डोक्यात येते. मी तिला मुलीसारखे मानले पण तिला माझी जाणीव नाही, घराविषयी, माझ्याविषयी काहीच वाटत नाही वगैरे वगैरे....
कारण सुनेने हे केलेच पाहिजे अशी समजूत कुठेतरी रुजलेली असते. आपण 'सुन' हया विषयाची एक चौकट बांधलेली असते. त्यातच तिला बसवायचा प्रयत्न करतो. त्यात ती फिट झाली तर ती खूप चांगली आणि थोडीफार चौकटीबाहेर जाऊ लागली की लगेच आपण ती अशीच आहे म्हणून लेबल लावायला मोकळे!!!
पण ती चौकट आपण जोपर्यंत आपल्या लेकीच्या चौकटीसारखी बनवत नाही, तोपर्यंत आपण तिला लेक मानतो असा.आपला गैरसमज असतो.
ही गोष्ट जेव्हा माझ्या लक्षात आली तेव्हापासून मी माझ्या सुनेविषयीच्या चौकटीची डागडुजी  सुरू केली आहे. अर्थात यामध्ये मला माझ्या लेकाची म्हणजे आदित्यची खूप मदत होतेय. कारण अमृताने त्याला काहीही सांगू दे किंवा मी त्याला काहीही सांगू दे, तो सरळ आम्हाला दोघींना एकमेकींकडे उभे करतो मी म्हणतो बोला आता काय बोलायचे ते. त्यामुळे नकळत आमच्यात मोकळेपणा येत आहे. पण दोन वर्ष झाली तरीही अजूनही माझी ती चौकट पूर्णत: लेकीसारखी बनत नाहीये.
पण खरं सांगते अमृताने मात्र खरोखर तिच्या आई सारखे मानले आहे. कारण आमचे विचार खूप एक सारखे आहेत, स्वभाव खूप जुळतात असे अजिबात नाही. पण कोणत्याही गोष्टीत आम्ही टोक गाठत नाही. कधीकधी मी तिच्यावर लेकी वर चिडते तसे चिडलीही आहे. पण तिने कधीच राग धरला नाही किंवा उलटून बोलली देखील नाही. विशेषतः तिच्या माहेरच्यांनीही कधीही आमच्यात काय चालले आहे हयात लक्ष घातले नाही. अगदी पूर्णपणे मोठ्या मनाने आमच्यावर विश्वास ठेवून सर्वार्थाने आमच्या स्वाधीन केले हे देखील विशेष आहे.
खरंच खूप अभिमान आहे मला माझ्या सुनेचा आणि अर्थातच लेकाचा!!!
असेच कायम आम्हाला सांभाळून  घेवोत आणि सुखाचा संसार करो हीच आज लग्नाच्या वाढदिवशी ईश्वर चरणी प्रार्थना !!!

मंजुषा देशपांडे, पुणे....

Sunday, 25 November 2018

कचरा

सध्या कचर्‍याच्या गंभीर प्रश्नाने मला भंडावून सोडले आहे. दिवाळीच्या निमित्ताने सर्व घराची साफसफाई झाली. पण गॅलरीकडे लक्षच गेले नाही. दिवाळीच्या गडबडीनंतर जेव्हा गॅलरीत डोकवायला गेले, बाप रे! केवढा ढीग जमा झाला आहे!! यात माझा स्वतःचा कचरा तर होताच, पण त्याहूनही चौपट कचरा बाहेरून आलेला होता. गॅलरीत ढीग करणारी माणसे देखील आपलीच प्रेमाची, त्यामुळे कोणालाच काही बोलता येणार नव्हतं. शेवटी आपणच रोज थोडं थोडं आवरून ढीग कमी करावा म्हणून आवरायला घेतले. पण छे!! रोज जेवढा ढीग साफ करायला जायचे त्याच्या पाचपट ढीग जमा होऊ लागला. आता कामाची गती वाढवणे आवश्यक झाले. शेवटी एक संपूर्ण दिवस त्यात घालवून गॅलरीतला कचरा एकदाचा साफ केला.
पण हा कचरा आला कोणामुळे? तर माझ्या अर्धवट ज्ञानामुळे. वास्तविक हा कचरा थोपवणे माझ्या हातात होते. पण निव्वळ दुर्लक्ष केल्याचा परिणाम असा झाला की शुभेच्छा संदेश, ज्ञानवर्धक, मनोरंजक लेख, पाककृती, आरोग्यविषयक टिपणी अशा सर्व गोष्टींनी माझी गॅलरी गच्च भरून गेली. खरंतर हे सर्व पाठवणार्यांचा उद्देश खूप चांगला होता. ह्या गोष्टी मला परिपूर्ण करणाऱ्याच होत्या. पण त्याचे प्रमाण इतके जास्त झाले की त्याच्या ओझ्याखाली मी दबले गेले. आणि अर्थातच मी स्वतः  वाचले तरच मी हे सर्व वाचू शकणार होते. इतका ढीग जमा  झाल्यावर त्यातून चांगले वाईट निवडणं पण अवघड होऊन गेले. शेवटी सर्वच गोष्टी कचरा म्हणून टाकून द्यावा लागल्या.
आता ही गॅलरी माझ्या भ्रमणध्वनीची म्हणजे माझ्या मोबाईलची होती हे एव्हाना आपणा सर्वांच्या लक्षात आलेच असेल.
वास्तविक व्हाट्सअप, फेसबूक अशा सोशल मीडियाच्या माध्यमांशी माझी काही फारशी गट्टी नाही. पण त्यांचा योग्य उपयोग केल्यास हीच माध्यमे संवाद साधण्यासाठी आणि अनुभव संपन्न होण्यासाठी खूप उपयोगी आहेत. त्यामुळे काळाची गरज म्हणून मी त्यांच्याशी जमवून घेण्याचा प्रयत्न करते. पण आमची मैत्री होण्याआधीच आमच्या नीतिमूल्यांवर हल्ला होतो आणि आम्ही परत परत दुरावले जातो.
या मैत्रीतले अंतर दूर करण्यासाठी मी आधी व्हाट्सअपचे ऑटो डाउनलोडिंग बंद केले आणि मला आणि माझ्या मोबाईलरुपी सख्याला झेपतील तेच संदेश आणि ज्ञान घ्यायचे मी निश्चित केले.
आता तर व्हाट्सअप वर फक्त ऍडमिनच मेसेज पाठवू शकेल अशीही सोय आहे. मग एडमिनला योग्य वाटेल तेव्हा तो समूह सर्वांसाठी खुला करण्यात येतो. पण तेव्हाही पाण्याच्या पाइपमध्ये बोळा  घालून पाणी थांबवले आणि तो बोळा काढला की ते पाणी जसे धो धो वाहू लागते तसेच धो-धो संदेश मोबाईलवर येऊन धडकतात. यामध्ये तर पुष्कळसे संदेश या समूहात आधी आले आहेत का हे देखील बघितले जात नाही. अन तसेच पुष्कळसे संदेश तर स्वतःही न वाचताच पुढे पाठवले जातात. बिचारे ॲडमिन तर हया ग्रुप वर इतर विषयावर शेअर करू नका म्हणून सांगून हैराण होतात. पण पाठवणार्यांचा उत्साह मात्र अजिबात कमी होत नाही.कोणतेही सणवार किंवा काही विशेष दिवस असेल तर  पुन्हा ढीग गोळा होणार ह्याची धडकीच भरते.                                                  
त्यामुळे कोणतीही गोष्ट शेअर करताना प्रत्येकाने स्वतःला मर्यादा  घालाव्यात असे मला वाटते. समूहामध्ये तर नियम व अटी घालूनच समूह तयार करावा आणि त्या व्यवस्थित पाळाव्यात असे माझे स्पष्ट मत आहे. सणावारांना समूहामध्ये एकच शुभेच्छा सर्व समूहाकडून सर्वांना देण्यात यावी. तसेच कोणाच्या दुःखद निधनाची बातमी आली तरी एकच श्रद्धांजली संपूर्ण समूहाकडून देण्यात यावी.
कोणत्याही माध्यमांचा वापर योग्य रित्या झाला तर त्या विषयीची गोडी टिकून राहते.  प्रत्येकाने दिवसभरात आलेल्या संदेशांमधून एखादा चांगला संदेश निवडला आणि तोच फक्त पाठवला तर संदेशांची भाऊगर्दी आपोआप कमी होईल. शिवाय एकच संदेश पाठवायचा असल्याने त्याचे चिंतन आणि मनन होऊन तो पाठवला जाईल.
माझ्या मोबाईलची गॅलरी स्वच्छ करण्यात माझा अख्खा दिवस गेल्यामुळे अंतर्मनातून आलेली ही एक प्रतिक्रिया आहे. यामध्ये कोणाच्याही लिखाणाला केव्हा संदेशांना कचरा म्हणण्याचा माझा हेतू नाही. कारण मी देखील आलेले चांगले संदेश, माझे लेख ह्याच माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवत असते.त्यामुळे स्मार्टफोन वापरताना आपणही त्याविषयीचे ज्ञान स्मार्टपणे घेतलं पाहिजे हे मला नक्कीच समजले आहे. असे केले तर हया माध्यमातून मिळणारे ज्ञान हे कचरा न वाटता आपल्या जीवनपटावर उगवलेले ज्ञानाचे कमळ असेल.
प्रतिक्रियांचे स्वागत.
© मंजुषा देशपांडे, पुणे.

Friday, 9 November 2018

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

काल 'आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट फर्स्ट दे फर्स्ट शो पाहून आले.
खरंतर मी काशिनाथ घाणेकर यांचे काम कधी पाहिले नाही. फक्त त्यांच्या नाटकांची आणि चित्रपटांची नावे ऐकून होते. त्यामुळे त्यांना जाणून घेण्याची उत्सुकता तर होतीच पण त्याहूनही जास्त उत्सुकता सुबोध भावेला त्यांची भूमिका साकारताना बघण्याची होती.
चित्रपटात सुबोध भावे चे काम एकदम कडक असे आहे. काशिनाथ घाणेकरांचे जीवन चरित्र दाखवताना त्या काळातील त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या इतर मातब्बर कलाकारांच्या  व्यक्तिरेखाही वेशभूषा, अभिनय आणि चित्रीकरण अशा सर्वच बाबतीत अतिशय उत्कृष्ट चित्रित झाल्या आहेत.
चित्रपटात करमणुकीसाठी कुठलाही अतिरिक्त मसाला न घालता काशिनाथ घाणेकरांना जसे रंगभूमीचे सुपरस्टार दाखवले गेले आहे, तसेच प्रसिद्धीची हवा डोक्यात  गेल्याने आलेला उर्मटपणा, बेफिकिरी आणि दारूचे व्यसन या गोष्टीमुळे त्यांच्या आयुष्याची झालेली वाताहत अगदी स्पष्टपणे मांडली आहे. चित्रपटात कुठेही काशिनाथ घाणेकर यांच्या चुकांवर पांघरूण घातले नाही. प्रेक्षक एका चांगल्या कलाकाराला त्याच्या चुकांमुळे, वाईट व्यसनांमुळे नाकारू शकतात हा बोध या झगमगत्या दुनियेतचे आकर्षण असणाऱ्यांना नक्कीच घेण्यासारखा आहे.
एकूण काय तर सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी,नंदिता धुरी, प्रसाद ओक, वैदेही परशुरामी या सर्वांचे अभिनय उत्तम. शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा चित्रपट. दिग्दर्शन, वेशभूषा, कथेची मांडणी, नाट्यप्रसंग सर्वच बाबतीत कडक असा चित्रपट. मी स्वतः पाचपैकी 4.5 स्टार्स नक्कीच देईन.
आज ९ नोव्हेंबर २०१८ रोजी सुबोध भावेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एवढेच सांगेन की तुझ्या बालगंधर्व, लोकमान्य टिळक, तुला पाहते रे आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर ह्या सर्व भूमिका बघितल्यास तुझेही नाव शेवटी लिहून 'आणि सुबोध भावे' असा योग येणे दूर नाही.

©मंजुषा देशपांडे, पुणे.